दूरदर्शनवर १९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘रजनी’ या छोटय़ा पडद्यावरील गुप्तहेर नायिकेने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य केलं होतं. कित्येक वर्षांनंतर छोटय़ा पडद्यावर पुन्हा एका नव्या गुप्तहेर नायिकेने पदार्पण केले आहे.
‘झी वाहिनी’वर अनेक वर्षांनंतर गुप्तहेरावरची मालिका प्रदर्शित होत आहे. या वेळी ही गुप्तहेर महिला आहे. सामान्य घरातली, टोपीवाला कुर्ता परिधान करणारी, ही सायकलस्वार डिटेक्टिव्ह दीदी पाठीवर बॅग लावून तिच्या शोधक नजरेने, तर्क बुद्धीचा उपयोग करीत गुन्ह्य़ांचा शोध घेताना दिसणार आहे. या कामात तिच्यासोबत भीम सिंग भुल्लर नावाचा पोलीस अधिकारीही असणार आहे. अर्थात, तो तिला मदत कमी आणि तिच्या कामात आडकाठी करण्याचं काम जास्त करणार आहे. ‘डिटेक्टिव्ह दीदी’ नावानेच सुरू झालेल्या या मालिकेत डिटेक्टिव्ह दीदीची भूमिका सोनिया बलानी साकारणार असून भीम सिंग भुल्लरची भूमिका मनीष गोपलानी साकारणार आहे.
‘मर्दानी’, ‘अकिरा’ या स्वसंरक्षणाचा वसा घेतलेल्या नायिका मोठय़ा पडद्यावर राज्य करीत आहेत. मोठय़ा पडद्यावरील नायिकांच्या मांदियाळीत छोटय़ा पडद्यावरील नवी डिटेक्टिव्ह दीदी कशा प्रकारे आपलं स्थान निर्माण करते हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. मालिकेचं चित्रीकरण दिल्लीमध्ये सुरू आहे. सोनियाने यात अॅक्शन दृश्येही के ली आहेत. यासाठी तिने आतापर्यंत विशेष प्रशिक्षण घेतलं नसलं तरी यापुढील भागांसाठी ‘मर्दानी’ चित्रपटासाठी प्रशिक्षण देणाऱ्या अॅक्शन मास्टरकडून प्रशिक्षण घेणार असल्याचे तिने सांगितले. ती जरी काटक दिसत असली तरी यासाठी व्यायाम, योगा, अॅरोबिक्स आणि आहाराद्वारे शारीरिक तंदुरुस्तीवरही ती मेहनत घेते आहे. जेसिका जॉन्सचा आदर्श ठेवत संवेदनशील गुप्तहेर साकारण्याची इच्छा तिने व्यक्त केली.
मालिकेच्या निर्मात्या इला बेदी दत्ता यांनी महिला, बालकांवरील वाढते लैंगिक अत्याचार, लहान मुलांची तस्करी या गुन्ह्य़ांविषयी वाचताना या मालिकेची कल्पना सुचल्याचे सांगितले. वास्तवाचा स्पर्श असलेली काल्पनिक मालिका प्रेक्षकांना आवडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘डिटेक्टिव्ह दीदी’ ही नवी मालिका ‘झी वाहिनी’वर शनिवारी ९ डिसेंबरपासून प्रदर्शित झाली आहे. याचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ही मालिका आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आठवडय़ाच्या शेवटी एक तास ही मालिका प्रदर्शित करण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना ‘झी’ वाहिनीचे व्यवसायप्रमुख दीपक राजाध्यक्ष यांनी आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशीही प्रेक्षकांना छोटय़ा पडद्यावर विरंगुळा हवा असतो. तसेच डिटेक्टिव्ह मालिका बारकाव्यांसकट दाखवणं एका तासात शक्य होतं, त्यामुळे या स्लॉटमध्ये ही मालिका सुरू केल्याचं मत व्यक्त केलं.