‘दशावतार’ चित्रपटानंतर कोकणातील कला, पारंपरिक खेळे, काही धार्मिक प्रथा आणि तिथले गूढ वातावरण यांची एकमेकांत गुंफण करत नवनव्या कथा वेबमालिका आणि चित्रपटस्वरूपात येणं हे साहजिक आहे. मात्र, अशा लाटेत अनेकदा ओढूनताणून केलेल्या गोष्टी, विनाकारण कोकणी संस्कृती आणि प्रथांबाबत पसरणारे गैरसमज आणि आशयातला तोचतोचपणा कलाकृती म्हणून वाट्याला येण्याची भीती अधिक असते. झी ५ ॲपवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘देवखेळ’ ही वेबमालिका वरवर पाहता कोकणातल्या शंकासुर आणि त्याचे खेळे यावर आधारित आहे, असं वाटतं. मात्र, या प्रथेचा धागा पकडून भीतीपोटी अंधश्रद्धेचा डोंगर कसा उभा राहतो याचे थरारक चित्रण करणारी कथा या वेबमालिकेत पाहायला मिळते.

कोकणात गुहागरमधील देवतळी नामक एका काल्पनिक गावात या वेबमालिकेचे कथानक घडते. गावात विश्वास सरंजामे नामक नव्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होते. त्याचा गावातला प्रवेश आणि शिमग्याची सुरुवात असल्याने नेहमीच्या पोलीस बंदोबस्ताचे व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समोरासमोर येतात.

रत्नागिरीतील अनेक गावांमध्ये पंधरा दिवस शिमग्याचा उत्सव सुरू असतो. या उत्सवात शंकासुराचे खेळे असतात. देवाची पालखी निघते. पालखी नाचवणं, मिरवणूक, घरोघरी येणारी पालखी आणि शंकासुर हा सगळा पारंपरिक आनंदसोहळा सुरू असतो. त्यामुळे गावा-गावात सणाला कुठे गालबोट लागू नये म्हणून पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गावात आल्या आल्या विश्वासकडे देवतळीत दरवर्षी शिमग्याला होणाऱ्या खून प्रकरणाचा तपास दिला जातो आणि नेमकं बंदोबस्ताच्या यादीतून देवतळी हे नाव गायब असल्याचं त्याच्यासमोर येतं. गावातल्या पापी माणसाला दरवर्षी शंकासुर शिक्षा देतो.

रात्रीतच हा खेळ होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तळं, नदी किंवा पाणवठ्याच्या जागी एकतरी प्रेत सापडतं. पंधरा वर्षांपासून सुरू असलेलं हे हत्यासत्र आता गावकऱ्यांसाठी श्रद्धेचा भाग ठरलं आहे. त्यामुळे शिमग्याच्या उत्सवात देवतळीमध्ये पोलीस बंदोबस्त नको, शंकासुराच्या खेळात व्यत्यय नको, हा गावकऱ्यांचा १५ वर्षांचा हट्ट विश्वास मोडून काढतो. विश्वासने बंदोबस्त ठेवलेला असतानाही नव्याने हत्या घडते. आणि मग या हत्येचा धागा पकडत विश्वास त्याच्या सहकाऱ्यांसह या प्रकरणाच्या मुळाशी कसा पोहोचतो? याची रहस्यमय कथा म्हणजे ‘देवखेळ’ ही वेबमालिका म्हणता येईल.

या वेबमालिकेचं कथालेखन दिग्दर्शक चंद्रकांत लता गायकवाड, निखिल पालांडे आणि गौरव रेळेकर यांनी केलं आहे. चंद्रकांत गायकवाड यांनी याआधी अनेक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर लेखक म्हणून निखिल पालांडे आणि गौरव रेळेकर हे तुलनेने नवीन आहेत. मात्र, या तिघांनी अत्यंत हुशारीने शंकासुराची मूळ गोष्ट, त्याचा सर्वसामान्यांना वाटणारा आधार याची पेरणी करत श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा हा खेळ रहस्यमय शैलीत शेवटपर्यंत खेळवत ठेवला आहे. शंकासुर हा खरंतर राक्षस, तरीही कोकणात त्याला देवरूपात पुजलं जातं. तो अन्याय करणाऱ्याला, पाप करणाऱ्याला त्याच्या हातातल्या वेताच्या पट्ट्याने शिक्षा देतो, असं म्हटलं जातं. आपण पाप केलं तर शंकासुर आपल्याला मारून टाकेल, ही भीती कुठेतरी देवतळीतल्या प्रत्येक पुरुषाच्या मनात आहे. म्हणजे गावात कोणी पाप करणारं, अन्याय करणारं नाही असंही नाही.

छोट्या-मोठ्या चुका करत देवाकडे हे पाप नाही ना म्हणत आपल्या कृत्याचं मोजमाप करणारे, देवा शंकासुराला सांग मला मारू नको म्हणत साकडं घालणारे गावकरीही आपल्याला दिसतात. तर या प्रथेमुळे गावात पाप वाढत नाही आहे, असं मानून गप्प बसणाऱ्या गावकऱ्यांची ही शंकासुरावरची श्रद्धा म्हणायची की भीती? मुळात कुठल्यातरी भीतीने या प्रथेची सुरुवात झाली, याची जाणीव करून देतानाच महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे, अंधश्रद्धेला नाही, असं ठणकावून सांगणारा पोलीस अधिकारी, पुण्याचं सोंग घेऊन समाजात वावरणारं पाप अशा कितीतरी गोष्टी थेटपणाने या वेबमालिकेतून लेखकद्वयी आणि दिग्दर्शकाने समोर ठेवल्या आहेत. त्यामुळे फक्त रहस्यकथेचं मर्यादित रूप धारण न करता त्यातून आता महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांवर सहजपणे केलेलं भाष्य अधिक रंजक आणि गरजेचं ठरतं.

चित्रपटाचा कुठलाही अनुभव नसला तरी अत्यंत सफाईदारपणे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी ही कथा खेळवली आहे. कोकणातलं सौंदर्य हे फक्त समुद्रकिनाऱ्यांमध्ये नाही. ते इथल्या घरांमध्ये आहे, माणसांमध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे, गावच्या वातावरणात आहे, सोहळ्यांमध्ये आहे ते सुरेखपणे टिपलं गेलं आहे. गोष्टीचा धागा कुठेही भरकटणार नाही, याची काळजी घेतली आहे.

एकीकडे आत्ता देवतळीत सुरू असलेली गोष्ट आणि त्याला समांतर सुरू असलेली आणखी एका पात्राची गोष्ट हळूहळू पुढे नेत हा खेळ रंगवत नेला आहे. त्यामुळे म्हटलं तर दुसऱ्या-तिसऱ्या भागातच या सगळ्यामागे कोण आहे? हे आपल्या लक्षात येतं आणि तरीही तपासाच्या आधारे दिग्दर्शकाने संशयाचा काटा दोन-तीन ठिकाणी सरकवला आहे. इतकी रंजक कथा शेवटाकडे येताना मात्र पुरती गोंधळते. वेबमालिकांमध्ये छोट्यातलं छोटं पात्र खुलवायला वेळ मिळतो. तरीही विश्वास आणि सानिकाची कथा गरजेपुरती येते. विश्वासचे वडील अधूनमधून डोकावतात.

गुरवांना स्वत:च्या मुलाविषयी काय वाटतं, हे काही आकळत नाही. आणि नेमकं शेवटच्या दृश्यात अगदी काही सेकंदांपुरत्या दिसणाऱ्या विश्वासच्या तपासातून नेमकं नवं काय गूढ उकलतं? हाही गोंधळ आहे. शिवाय, ‘कांतारा’चा प्रभाव शंकासुराच्या चित्रणावर अधिक ठळकपणे जाणवतो. पार्श्वसंगीताचा उत्तम वापर गूढ वाढवण्याच्या दृष्टीने केला आहे.

ही मालिका खऱ्या अर्थाने अंकुश चौधरीची आहे. अंकुशने खूप वेगळ्या पद्धतीने विश्वास साकारला आहे. तो विनाकारण ‘दबंग’ नाही, उथळही नाही की हिरोगिरी करणाराही नाही. तरीही त्याचा दरारा जाणवतो तो त्याच्या तत्त्वातून, शांत चेहऱ्याने वावरण्यातून… आतल्या आत काहीतरी खोल उराशी बाळगून असावं अशा पद्धतीने वावरणारा विश्वास खूप प्रभावी आहे. प्राजक्ता माळीने तिची भूमिका उत्तम साकारली असली तरी तिला अजून वाव मिळायला हवा होता. यतीन कार्येकर, मंगेश देसाई, वीणा जामकर यांच्या बरोबरीने ‘गाव गाता गजाली’मधील रोहन सुर्वेसारख्या काही नव्या चेहऱ्यांमुळेही मालिकेत ताजेपणा आला आहे. अंधश्रद्धेवर रंजकपणे भाष्य करणारा हा ‘देवखेळ’ अनुभवायला हरकत नाही.

 देवखेळ

दिग्दर्शक – चंद्रकांत गायकवाड

कलाकार – अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, सायली देवधर, वीणा जामकर, मंगेश देसाई.