scorecardresearch

‘देवमाणूस’ पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ‘देवमाणूस २’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.

‘देवमाणूस’ पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि ‘देवमाणूस’मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका ‘देवमाणूस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मालिकेचा दुसऱ्या भागाचा टीझर प्रेक्षकांनी वाहिनीवर पाहिला आणि सोशल मिडीयावर चर्चेला उधाण आलं. हा नवीन सीजन लवकरचं सुरू होणार असून यातील कलाकारांची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. तसंच देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लुक या नवीन भागात कसा असणार आहे याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना आहे. लवकरच ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ‘देवमाणूस २’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.

काय होता पहिल्या भागाचा शेवट?
डिंपलच्या घरात सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली होती. या पुजेला बसण्यासाठी मंगल आणि बाबू यांनी डॉक्टरला विनंती केली. या विनंतीचा मान राखत देवीसिंग पूजेला बसतो. पूजेत चंदा दिसत नसल्याने देवीसिंग तिच्या शोधात बाहेर पडतो. त्याला डिंपल भेटते आणि पळून जाण्याविषयीचा नवीन प्लॅन त्याला सांगते. देवीसिंग तिचा प्लॅन ऐकून रात्री आठ वाजता भेट मग आपण पळून जाऊ असं सांगतो. त्यानंतर देवीसिंग रिंकी भाभीचा जीव घेतो. एवढंच नाही तर तिच्या कडे असलेला संपूर्ण पैसा आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा त्याचा प्लॅन असतो.

दुसरीकडे डिंपल देवीसिंगची वाट बघून थकते आणि चंदाकडे जाऊन हा सगळा प्लॅन सांगते. देवीसिंग पळण्याची तयारी करत असताना तिथे चंदा आणि डिंपल पोहोचतात आणि चंदा देवीसिंगकडून पैसा हिसकावून त्याच्या डोक्यात दगड घालते. देवीसिंग मेला अस समजून चंदा आणि डिंपल तिथून निघून जातात. मात्र, डिंपल चंदावर वार करत तिचा जीव घेते आणि पैशांची बॅग घेऊन निघून जाते.

डॉक्टर बराच वेळापासून परतला नाही म्हणून गावकर त्याच्या शोधात बाहेर पडतात. गावा बाहेर त्यांना आग लागलेली दिसते. त्यात चंदाचा मृतदेह त्यांना दिसतो, तर जवळच डॉक्टरचा चष्मा, घड्याळ आणि पेन दिसतो, हे पाहता तो ही मेला असेल असे गावकऱ्यांना वाटते. एका रात्री सगळे झोपले असताना डिंपल बॅग घेऊन बाहेर पडते आणि रुग्णालयात जाते. तेथे एका माणसाला भेटते. तो माणूस मरोत आणि डॉक्टर त्या माणसाला मृत असल्याचे घोषित करतो. हा माणूस दुसरा कोणी नाही तर देवीसिंग असतो. डॉक्टर बाहेर जाताच तो जीवतं होतो आणि मालिका अशा प्रकारे प्रेक्षकांचा निरोप घेते. त्यामुळे आता मालिकेचा दुसरा सिझनमध्ये काय पाहायला मिळाणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2021 at 11:58 IST

संबंधित बातम्या