Devoleena Bhattacharjee Divya Mittal IAS Resignation: उत्तर प्रदेश केडरच्या २०१३ च्या बॅचच्या अत्यंत धडाडीच्या माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल सध्या त्यांच्या राजीनाम्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. रविवारी त्यांनी प्रशासकीय सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, स्वतः इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या निर्णयाची माहिती दिली. मे २०२६ मध्ये देवरियाच्या जिल्हाधिकारी (DM) पदावरून त्यांची उचलबांगडी करत महसूल विभागात विशेष सचिव या कमी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पदावर बदली करण्यात आली होती. या बदलीमुळे त्या गेल्या काही काळापासून नाराज होत्या, असंही म्हटलं जातंय. आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने त्यांच्या राजीनाम्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर नेहमीच बेधडक भाष्य करणारी देवोलीना भट्टाचार्जी सध्या सोशल मीडियावर भलतीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करणाऱ्या देवोलीनाच्या नव्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

देवोलीना भट्टाचार्जीची पोस्ट

दिव्या मित्तल यांच्याशी संबंधित एका व्हायरल पोस्टवर कमेंट करताना देवोलीनाने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. या पोस्टमध्ये दिव्या मित्तल यांच्या फोटोबरोबर काही ओळी लिहिलेल्या आहेत. “उत्तर प्रदेशातील लाहुरीया गावात तब्बल ७५ वर्षांपासून पाण्याचे भीषण संकट होते. नवीन आयएएस अधिकारी दिव्या यांनी अथक प्रयत्न करून गावात नळाने पाणी पोहोचवले. मात्र, या पाण्याच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात स्थानिक आमदाराला आमंत्रित केले गेले नाही. याच रागातून आमदाराने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि दिव्या यांची तडकाफडकी बदली झाली. पुढे अज्ञातांनी त्या नळ योजनेच्या पाइपलाइनची तोडफोडही केली.”

ही पोस्ट एक्सवर शेअर करत देवोलीनाने लिहिलं, “या देशात प्रामाणिक लोक आणि प्रामाणिकपणाची नेहमीच थट्टा केली जाते.”

Devoleena Bhattacharjee Comment On Divya Mittal IAS Resignation
देवोलीना भट्टाचार्जीची पोस्ट (सौजन्य – एक्स)

आयआयटी ते प्रशासकीय सेवा: दिव्या मित्तल यांचा प्रवास

दिव्या मित्तल यांनी आपल्या १३ वर्षांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशातील मिर्झापूर, संत कबीर नगर आणि बस्ती या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेल्या कामाचे नेहमीच कौतुक झाले.

शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत हुशार असलेल्या दिव्या यांनी आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बेंगळुरू यांसारख्या देशातील सर्वोच्च संस्थांमधून शिक्षण पूर्ण केले होते. भारतीय प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्या लंडनमध्ये नोकरी करत होत्या. देशात परत येऊन जनसेवा करणाच्या उद्देशाने त्या आयएएस अधिकारी झाल्या. पण १३ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.