Devoleena Bhattacharjee Post for Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील भेसळबाजांचे धाबे दणाणले आहेत. नामांकित हॉटेल्स आणि आउटलेट्सवर झालेल्या छाप्यांनंतर अन्नातील भेसळ आणि अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता ‘साथ निभाना साथिया’ फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने तुकाराम मुंढेंसाठी एक विशेष पोस्ट शेअर करत त्यांचे मनापासून कौतुक केले आहे. “एका प्रामाणिक अधिकाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे,” असे सांगत देवोलीनाने तुकाराम मुंढेंना एफडीए विभागात काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी आशाही व्यक्त केली आहे.
देवोलीना भट्टाचार्जीने एक्सवर पोस्ट करत तुकाराम मुंढे यांच्या प्रामाणिकपणाचं आणि धडक कारवायांचं कौतुक केलं आहे. त्यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रत्येक विभागात असते तर गुन्हेगारांनी कायदा मोडण्यापूर्वी विचार केला असता, असं तिने म्हटलंय. इतकंच नाही तर प्रामाणिकपणामुळे त्यांच्या आजवर झालेल्या बदल्यांचा उल्लेखही तिने या पोस्टमध्ये केला आहे. देवोलीना भट्टाचार्जी तुकाराम मुंढेंबद्दल काय म्हणाली, ते जाणून घेऊयात.
देवोलीना भट्टाचार्जीने तुकाराम मुंढेंसाठी केली पोस्ट
“कल्पना करा… एका प्रामाणिक अधिकाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडलाय आणि जनता त्यांच्या कामाचं कौतुक करत आहे. जर प्रत्येक विभागात त्यांच्यासारखे अधिकारी असते, तर गुन्हेगारांनी कायदा मोडण्यापूर्वी १०० वेळा विचार केला असता. दुर्दैवाने, न्यायव्यवस्थेनुसार अन्नात तीन झुरळं सापडणं हे परवाना रद्द करण्यासाठी पुरेसं कारण नाही. त्याचबरोबर तुकाराम मुंढे सरांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किती वेळा बदली झाली आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे.

पुढे देवोलीना म्हणाली, “बरेचदा प्रामाणिकपणाची खूप मोठी किंमत मोजावी लागते. या विभागातील सगळा कचरा कायमचा साफ करण्यासाठी त्यांना इथे पुरेसा वेळ राहू दिले जाईल, अशी आशा आहे,” अशी पोस्ट देवोलीना भट्टाचार्जीने केली आहे.”
दरम्यान, आदर्श व कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. मे २०२६ मध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक कडक कारवाया केल्या. यामुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अनेक ठिकाणी हॉटेलमधील अन्नाचा दर्जा सुधारला आहे. त्यांच्या या कारवायांबद्दल सामान्य लोकही व्हिडीओ शेअर करून त्यांचे आभार मानत आहेत.
