सिनेमा
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, @chaijoshi11

प्रचंड गाजलेल्या प्रादेशिक सिनेमाचा हिंदी रिमेक बनवणं तसं आपल्याकडे काही नवीन नाही. प्रत्येक वेळी अशा सिनेमांबाबत बरीच उत्सुकता असते. अशीच उत्सुकता होती ‘सैराट’च्या हिंदी रिमेकबद्दल. त्यातच करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार म्हटल्यावर या उत्सुकतेत थोडी भरच पडली. या हिंदी सिनेमाबाबत गेलं वर्षभर बरीच चर्चा रंगली. गेल्या आठवडय़ात या सिनेमाचा ट्रेलर आला आणि पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात झाली.

‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्ये कोणते कलाकार असणार, त्याचं हिंदी नाव काय असेल, करण जोहर त्यात त्याचा नेहमीचा फिल्मी ड्रामा आणेल का, अजय-अतुलच त्या सिनेमाला संगीत देणार का, मग ‘सैराट’मधल्या गाण्यांच्याच चाली यात असणार का; हे सगळे मुद्दे त्या चर्चेत होते. शेवटी त्यातल्या परश्या आणि अर्चीची जागा भरली आणि इशान खट्टर, जान्हवी कपूर हे दोन चेहरे प्रेक्षकांसमोर आले. यासह सिनेमाचं नावही घोषित झालं; ‘धडक’!

सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्सुकतेत वाढच झाली. गेल्या आठवडय़ात सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या अभिनयाची एक झलक यात बघायला मिळाली. पण या ट्रेलरनंतर अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर त्याबद्दलच्या टीकेचा पाऊस पडायला सुरुवात झाली. ट्रेलर न आवडणाऱ्यांमध्ये मराठी प्रेक्षकांची संख्या अधिक आहे. ‘सैराट’ची सर ‘धडक’ला नाही असं ठाम मत असणाराही वर्ग आहे. त्या आशयाचे हॅशटॅगही दिसून आले. तसंच अनेक विनोदी पोस्ट, मेसेजही फिरू लागले.

करण जोहर हा व्यावसायिकदृष्टय़ा विचार करणारा निर्माता आहे. हे त्याच्या सिनेमांवरून याआधीच सिद्ध झालं आहे. त्याने ‘धडक’ची निर्मिती करतानाही हेच केलं. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या दोन अभिनयाची कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेल्या कलाकारांना सिनेमात घेतलं. शिवाय ‘सैराट’ ज्या प्रकारे ग्रामीण भागात घडला होता तसा ‘धडक’ला त्याने राजस्थानी-मेवाडी टच दिला. राजस्थानी बाज असल्यामुळे त्यात साहजिकच राजवाडे, मोठे महल दाखवणं हे ओघाने आलंच. गाण्यांच्या बाबतीतला व्यावसायिक भाग ‘सैराट’मध्ये देखील होता; तो ‘धडक’मध्येही आहेच. ट्रेलरमध्ये दोन गाण्यांची झलक दिसतेय. त्यापैकी एक ‘झिंगाट’ आहे, तर दुसरंही पहिल्या झलकमधून तरी चांगलं आणि श्रवणीय वाटतंय. ती कदाचित ‘याडं लागलंय’ची हिंदी आवृत्ती असावी. ‘सैराट’देखील व्यावसायिक दृष्टिकोन ठेवूनच बनवला होता, पण त्यातले चेहरे फार ग्लॅमरस नव्हते किंबहुना त्यांना तसं बनवलं नव्हतं. ‘धडक’मध्ये मात्र ते दिसून येतं. जान्हवीचं हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण आहे. इशानने याआधी दोन-तीन सिनेमांत काम केलं आहे. शिवाय याच वर्षी त्याचा मजीद मजिदी दिग्दर्शित ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण व्यावसायिक सिनेमा म्हणून ‘धडक’ हा इशानचा पहिलाच सिनेमा म्हणावा लागेल. जान्हवी कपूर ही श्रीदेवी-बोनी कपूर या प्रसिद्ध सिनेकलाकार जोडीची मुलगी असल्यामुळे आणि इशान पंकज कपूरचा मुलगा आणि शाहिद कपूरचा भाऊ असल्यामुळे नेहमी स्पॉटलाइटमध्ये असत. ग्लॅमरस दुनियेची त्यांना ओळख होतीच. तसंच प्रेक्षकांनाही या ना त्या कारणाने त्यांच्या चेहऱ्याची ओळख होती. त्यामुळे प्रेक्षकांसाठी एका सिनेमातले नायक-नायिका म्हणून ते चेहरे नवे असले तरी ‘सैराट’मधल्या अर्ची-परशासारखे अगदीच अनभिज्ञ आहेत असंही नाही. त्यामुळे अर्ची-परशाप्रमाणे जान्हवी आणि इशानला प्रेक्षकांची मान्यता कितपत मिळतेय हे बघावं लागेल.

सिनेमाच्या ट्रेलरवरून जान्हवी आणि इशानच्या अभिनयाबाबतही चर्चा झाली. जान्हवीपेक्षा इशान अनेकांना उजवा वाटला. त्याला तिच्यापेक्षा अभिनयाचा अनुभव थोडा जास्त असल्यामुळे त्याला कॅमेऱ्याशी पटकन जुळवत घेत असल्याचं ट्रेलरमधून दिसून आलं. तर काहींना जान्हवीमध्ये आई श्रीदेवीची झलक दिसून येतेय. तिच्या हिंदी बोलण्यावरही काहीशी टीका झाली आहे. हे सगळं असलं तरी दोघांकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जात आहेत. खरं तर या दोघांकडेही अभिनयाची कौटुंबिक पाश्र्वभूमी असल्यामुळे त्यांच्यावर चांगलं काम करायची जबाबदारी आहे. ती प्रत्येक ‘स्टार किड’वर असतेच. पंकज कपूर, शाहिद कपूर या मुरलेल्या कलाकारांच्या घरातला आणखी एक कलाकार उदयास येताना त्याच्या डोक्यावर आधीच्या पिढीने केलेल्या कामाचं ओझं नक्कीच असणार. तर तिकडे जान्हवीच्या मागे श्रीदेवीसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीच्या कारकीर्दीची यादी आहे.

सिनेमाची बरीच चर्चा होत असताना अचानक ट्रेलर प्रदर्शित झालं पण त्याबाबतची दोन मतं निर्माण झाली. ही चर्चा रंगली असली तरी लोकप्रिय कलाकारांची मुलं, करण जोहरची निर्मिती, अजय-अतुलचं संगीत अशा अनेक कारणांमुळे ‘धडक’ला तुफान प्रतिसाद मिळणार यात शंका नाही!
सौजन्य – लोकप्रभा