Dhanush Son Linga Viral Video : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने आपल्या दमदार अभिनयामुळे केवळ तमिळ सिनेसृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने अभिनेता, गायक, गीतकार, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून यशस्वी वाटचाल केली आहे. धनुषनं गेली दोन दशकं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं असून त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. धनुषच्या चित्रपटांसह त्याचा हटके अंदाज व स्टाईल चाहत्यांना आवडते. पण, सध्या धनुषसह त्याचा मुलगा लिंगा हा जोरदार चर्चेमध्ये आला आहे. सोशल मीडियावर धनुष आणि लिंगा राजा यांचा खास व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याने लिंगाची जोरदार चर्चा रंगली आहे.

अभिनेता धनुषने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत; त्यातील त्याचा ‘मारी २’ हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या सिनेमातील साई पल्लवी व धनुषच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्याने सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजला होता. २०१८ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमातील एका आयकॉन डायलॉगने तर सर्वांचे लक्ष वेधले होते. आता पुन्हा एकदा हा लोकप्रिय डायलॉग चर्चेमध्ये आला आहे. याचे कारण म्हणजे धनुषने त्याचा मुलगा लिंगाला उद्देशून त्याचा आयकॉनिक डायलॉग भन्नाट अंदाजात सादर केला आहे.

धनुषने मुलासमोर मारला आयकॉनिक डायलॉग

सोशल मीडियावर धनुष आणि त्याचा मुलगा लिंगा यांचा खास व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये धनुष त्याचा आयकॉनिक डायलॉग ‘इफ यु आर बॅड आयम युअर डॅड’ (If You Are Bad I Am Your Dad) म्हणाला आहे. या डॉयलॉगआधी त्याने ‘लिंगा बेटा…’ असा उल्लेख केल्याने उपस्थित सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यावेळी स्टेजवरच उपस्थित असलेला लिंगाने हसून प्रतिसाद दिल्याने हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर धनुषच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत प्रेम व्यक्त केले आहे.

नेटकऱ्यांनी केले वडील-मुलाच्या जोडीचे कौतुक

वडील धनुष व मुलगा लिंगाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी लिंगामध्येही त्याच्या वडिलांचीच झलक दिसत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये धनुष व लिंगा दोघांनीही सारखेच कपडे आणि स्टाईलिंग केले होते. त्यांनी गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा परिधान केल्या असून त्यांचा खास लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करीत एका नेटकऱ्यानं लिहिलं, ‘जसे वडील तसा मुलगा दिसतोय…’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, लिंगा तर खूपच क्युट दिसतोय, तर आणखी एका नेटकऱ्यानं, पुढचा धनुष तयार होतोय…’ अशा कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओनंतर धनुषचा मुलगा लिंगा हा जोरदार चर्चेमध्ये आला आहे.

धनुष व ऐश्वर्याचा घटस्फोट

धनुषच्या चित्रपटांसह त्याचे वैवाहिक आयुष्य चर्चेमध्ये आले होते. धनुषचे रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी लग्न झाले होते. २००४ मध्ये धनुष व ऐश्वर्या यांचा प्रेमविवाह झाला होता. या जोडप्याला दोन अपत्य असून मोठ्या मुलाचं नाव यात्रा आणि धाकट्या मुलाचं नाव लिंगा आहे. जवळपास १८ वर्षांचा संसार केल्यानंतर २०२२ मध्ये धनुष आणि ऐश्वर्या यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. दोघंही मिळून मुलांचा सांभाळ करीत असून अनेकदा लिंगा हा वडील धनुषबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये व चित्रपटांच्या प्रमोशनदरम्यान दिसून येतो. व्हायरल व्हिडीओमुळे लिंगा हा चर्चेमध्ये आला आहे.