March 2026 Theatrical Releases Full List : फेब्रुवारीमध्ये अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले, तर काही प्रदर्शित होणार आहेत. या महिन्यात मृणाल ठाकूर, शाहिद कपूर यांसारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. अशातच आता मार्चमध्ये काही बड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
मार्च महिन्यात मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. चला तर जाणून घेऊयात या यादीमध्ये कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे. मार्च महिन्यात कौटुंबिक, थ्रिलर आणि गुप्त हेरपट असे विविध धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
मार्च महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट
मार्चमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील पहिलं नाव आहे ‘तिघी’ या चित्रपटाचं. जीजिविषा काळे दिग्दर्शित लिखित ‘तिघी’ हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी या तीन अभिनेत्री प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्नील भंगाळे, नेहा पेंडसे बायस यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
धुरंधर २ – आदित्य धर लिखित-दिग्दर्शित ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. रणवीर सिंह व अक्षय खन्ना अभिनीत या चित्रपटाने जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमावला. मार्चमध्ये आता याचा सीक्वल रिलीज होणार आहे. पहिल्या भागानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. १९ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टॉक्सिक अ फेरी टेल – दाक्षिणात्य अभिनेता यशची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. हा चित्रपटसुद्धा १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘धुरंधर २’ आणि ‘टॉक्सिक’च्या तारखा क्लॅश होणार आहेत. ‘टॉक्सिक’ ही एक गँगस्टरची गोष्ट आहे. यामध्ये तारा सुतारिया, कियारा अडवाणी, नयनतारा, रुक्मिणी वसंत यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहेत.
माइसा (mysaa) – रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शक रवींद्र पुले यांचा बहुचर्चित ‘माइसा’ हा चित्रपटसुद्धा मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणांमुळे चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता २० मार्चला हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित होत आहे. परंतु, अद्याप रिलीज डेटबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.
रोजी – द सेफ्रॉन चॅप्टर – पलक तिवारी आणि मल्लिका शेरावत यांचा हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. गुरुग्राम येथील सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. २६ मार्च रोजी तो प्रदर्शित होणार आहे.

