गेले काही दिवस ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्यावरून सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा सुरू आहेत. चित्रपटाच्या समर्थनार्थ बॉलिवूडमधील सर्व चित्रपट कलाकार पुढे आले असून त्यांनी प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. ‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री करीना कपूरनेही सोशल मीडियावर लोकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. त्याचवेळी, आता चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बहिष्काराच्या ट्रेंडवर प्रतिक्रिया देत करीना कपूरच्या आवाहनाचा समाचार घेतला.

आणखी वाचा : ‘रॉकेट्री’ चित्रपटाची निर्मिती करताना आर माधवनने गमावले आपले घर? अभिनेत्याने केला खुलासा

विवेक अग्निहोत्री म्हणाले, “जेव्हा ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चांगल्या आशयाचे कमी बजेट असलेले चित्रपट येतात आणि त्यांना विरोध केला जातो, तेव्हा कोणीही त्या चित्रपटाचे समर्थन का करत नाही? जेव्हा या इंडस्ट्रीतील स्वतंत्र चित्रपट निर्माते एक कमी बजेटचा चित्रपट बनवतात आणि तो प्रदर्शित होतो, तेव्हा बॉलिवूड माफिया चित्रपटावर बहिष्कार टाकतात. जेव्हा त्यांचे शो मल्टिप्लेक्समधून काढून घेतले जातात, तेव्हा हीच मंडळी कमी बजेट असलेल्या चित्रपटांविरोधात गटबाजी करतात. मग तेव्हा त्या चित्रपटासाठी मेहनत घेणाऱ्या २५० गरीब लोकांचा कोणीच विचार का करत नाही.”

हे सगळं बोलत असताना ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात ‘भाजपा’ने त्यांना मदत केली, याबद्दलही काही महत्वाचे खुलासे केले. ते म्हणाले, “‘द काश्मीर फाईल्स’ सारख्या चित्रपटाद्वारे एखाद्या ठराविक गोष्टींचा प्रचार होतो, असं अनेकदा म्हटलं जातं. अशा चित्रपटांना ‘प्रपोगांडा फिल्म्स’ असंही वाईट अर्थाने म्हटलं जातं. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात भाजपाने आम्हाला मदत केली, त्यांनीही आमच्या चित्रपटाचं प्रमोशन केलं, असा अनेकांचा समज आहे. पण तसं अजिबात काही झालेलं नाही.”

हेही वाचा : ‘द कश्मीर फाईल्स’ला ऑस्करपासून दूर लोटायचा बॉलिवूडचा डाव : विवेक अग्निहोत्री अनुराग कश्यपवर भडकले

या चित्रपटाच्या प्रमोशनला आम्ही नोव्हेंबरमध्ये सुरुवात केली. भारतात या चित्रपटाची होर्डिंग्स लागण्याआधी अमेरिका, युरोप येथे त्याची जवळपास ३० स्क्रीनिंग्स झाली. परदेशात काही हजार प्रेक्षकांनी ‘द काश्मीर फाईल्स’ बघितला होता आणि त्याचं कौतुक केलं होतं. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मिडियावर सगळीकडे प्रेक्षकच हा चित्रपट बघण्याचं आवाहन करत होते. चित्रपट भारतात प्रदर्शित झाल्यावर त्याला मिळणारं यश बघून राजकारणी आणि मीडियाचे लक्ष आमच्या चित्रपटाकडे वळले.”