“चांगला अभिनेता नाही झालास तरी चालेल पण….”, सुनील शेट्टीच्या मुलाचा वडिलांबद्दल खुलासा

“अभिनेता होण्यात मला फार रस नव्हता,” असेही त्याने सांगितले.

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीने मिलन लुथरिया यांच्या ‘तडप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच त्याने एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. यानिमित्ताने अहानने चित्रपटासह त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.

“तडप’ हा चित्रपट करताना माझ्यावर फार प्रेशर होते. पण मी घाबरलो नव्हतो. अभिनेता बनण्यासाठी लागणारी सर्व तयारी मी केली होती,” असे अहान शेट्टी म्हणाला. “तुझे वडील सुनील शेट्टी यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. मग त्यांनी सिनेक्षेत्रात येण्यासाठी काही खास टिप्स दिल्या का?” असा प्रश्न यावेळी अहानला विचारला.

त्यावेळी तो म्हणाला, “माझे वडील फार पूर्वी मी लहान असल्यापासून मला सांगतात की तुमची ओळख एक चांगला अभिनेता म्हणून नाही झाली तरी चालेल, पण तुमची ओळख एक चांगली व्यक्ती म्हणून झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे मी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. तसेच चित्रपटांशी निगडीत कोणताही सल्ला माझे वडील मला देत नाहीत. माझ्यापद्धतीने मला काम करुन देतात. त्या कामातून मी चुका कराव्यात आणि शिकावे, अशी त्यांची इच्छा असते.”

“मला घरातील चित्रपटासंबंधीच्या वातावरणाचा फार फायदा झाला. मी लहान असताना अनेकदा पप्पांच्या शूटींगला जायचो. त्यामुळे मला चित्रपट निर्मितीची समज मिळत गेली. पण त्यावेळी मी फार लक्ष द्यायचो नाही. अनेकदा चित्रपटाच्या सेटवर मी क्रिकेट खेळायचो, फिरायचो. विशेष म्हणजे मला सैन्यात भरती व्हायचे होते. अभिनेता होण्यात मला फार रस नव्हता,” असेही त्याने सांगितले.

अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांचा ‘तडप’ हा चित्रपट तेलुगू ‘आरएक्स १००’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून अहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आता अहान आणि ताराची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते की नाही हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Did dad suniel shetty give you special tips for bollywood debut son ahan shetty interview nrp

ताज्या बातम्या