* पूर्वी चित्रपटांच्या प्रसिद्धीची एकूणच पद्धत वेगळी होती. मात्र चित्रपट प्रसिद्धीला खरी सुरुवात ही राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’पासून झाल्याचे ठाकूर सांगतात. त्या वेळी राज कपूर यांच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीचे काम वसंत साठे यांच्याकडे होते. वसंत साठे स्वत: राज कपूर यांच्या चित्रपटांची कथा लिहीत असत. १९७० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पहिल्यांदा रेल्वेच्या डब्यांवर ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्याआधी रस्त्यांवर किंवा चित्रपटगृहांबाहेरच पोस्टर्स बघायला मिळायची. त्या वेळी प्रसिद्धीच्या तंत्राची एवढी हुकमत नसली तरी लोकांना कायम एक उत्सुकता असायची. हिंदी चित्रपटांच्या वाढत्या प्रसिद्धीची एकूणच पेरणी ही या चित्रपटापासून झाली होती, असं दिलीप ठाकूर यांनी सांगितलं.

* ‘बॉबी’ चित्रपट आला तेव्हा बाजारात बॉबी रुमाल, बॉबी टिकल्या, बॉबी कर्णभूषणे असं सगळंच बॉबी नावाने आणण्यात आलं होतं. बॉबी हा नायिकाप्रधान चित्रपट होता त्यामुळे स्त्रियांशी संबंधित सगळ्या वस्तू त्यावेळी ‘बॉबी’ या नावाने बाजारात आल्या होत्या. हा ट्रेंड काही काळ चालला.

* मग चित्रपटांच्या कथांशी संबंधित काही कथा मुद्दाम रचून त्या बाहेर पसरवायच्या हा सिलसिला सुरू झाला. तो मुख्यत: त्या वेळी यशराज प्रॉडक्शनकडून ‘दाग’ चित्रपटाच्या वेळी सुरू करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. ‘दाग’च्या सेटवर शर्मिला टागोर आणि राखी यांच्यात राजेश खन्नाबरोबर सर्वात जास्त दृश्ये कोणाची?, यावरून वाद सुरू असल्याची बातमी मुद्दाम पसरवली गेली. मग अशा प्रकारच्या प्रसिद्धीचं एकच पीक आलं पण तेव्हा या गोष्टी खोटय़ा असल्याचा संशयही कधी प्रेक्षकांना यायचा नाही.

ravi08* देव आनंद यांच्या ‘लूटमार’ चित्रपटात हिरा चोरीला जातो असं कथानक होतं. त्या चित्रपटात देवसाबनी सगळे खलनायक एकत्र केले होते. स्वत: देव आनंद, टीना मुनीम आणि सिंपल कपाडिया चित्रपटाच्या सेटवर असताना तिथे चोरी झाल्याची वार्ता पसरवण्यात आली. कुठेतरी चित्रपटाच्या कथानकाशी साधम्र्य असणाऱ्या गोष्टी निर्माण करून लोकांना सांगायच्या हा फंडा राबवला जाऊ लागला होता. त्यानंतर कलाकारांच्या अफेअर्सचीही खुलेआम चर्चा केली जाऊ लागली. नव्वदनंतर मात्र प्रसिद्धीतंत्र पुन्हा एकदा बदलले अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

* नकारात्मक प्रसिद्धी हीसुद्धा एक प्रकारे प्रसिद्धीच असते हेही बॉलीवूडचं खूळ जुनंच आहे. ‘खलनायक’च्या वेळी ‘चोली के पिछे’ गाण्यावरून झालेला वाद प्रसिद्धीसाठी वापरला गेला. आजही तो त्याच प्रकारे वापरला जातो.

* अगदी ‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या प्रदर्शनाअगोदर सेन्सॉर बोर्डाच्या कट्सवरून झालेला वादही जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी वापरण्यात आला, असे  महेश मांजरेकर यांनी एका कार्यक्रमात सांगितलं.

* ‘हम आपके है कौन’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आणखीन वेगळा प्रकार करण्यात आला होता. या चित्रपटातील साडय़ा, वस्तू सगळ्या बाजारात उपलब्ध करण्यात आल्या होत्या. आणखी एक गोष्ट त्या वेळी करण्यात आली ते म्हणजे हा चित्रपट पंधरा दिवस फक्त लिबर्टी चित्रपटगृहात दाखवण्यात आला. तुम्हाला ‘हम आपकें  है कौन’ बघायचा असेल तर लिबर्टीत यावं लागेल, अशी हवा करण्यात आली होती. थोडय़ा दिवसांनी मग चित्रपटाच्या प्रिंट्स वाढवण्यात आल्या. त्यावेळी फार विचारपूर्वक प्रसिद्धीचे नियोजन केले जात होते.