सखी गोखले, अमेय वाघ, स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी आणि पुजा ठोंबरे.. आतापर्यंत अनोळखी असलेली ही नावं गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरू लागली आहेत. मित्रांच्या भेटीगाठींमध्ये यांचे दाखले दिले जाताहेत. अजूनही तुम्हाला ‘ही मंडळी कोण?,’ याचा अंदाज येत नसेल तर डोळ्यासमोर रेश्मा, कैवल्य, मीनल, आशू, सुज्या आणि अॅनाला आणा.. मग संदर्भ लक्षात येतील. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ म्हणजेच ‘डी३’ मधील ही मंडळी घराघरांत लाडकी झाली आहेत. त्यांच्याशी बोलायला गेलं की, सुरुवातीला सुजयच्या घरातील भाडेकरू मित्रांशी बोलतोय की त्यांना साकारणाऱ्या कलाकारांशी हा गोंधळ होतो खरा.. पण, काही क्षणातच हा गोंधळ नाहीसा होतो. कारण, खऱ्या आयुष्यातही मालिकेत साकारलेल्या व्यक्तिरेखा त्यांनी कुठेतरी, कधीतरी अनुभवलेल्या आणि तरीही अनोळखी आहेत, असं या सहा मित्रांचं म्हणणं आहे.
‘मालिका करायची की नाही?’, हा मूळ प्रश्न घेऊनच हे सहाजण या मालिकेच्या ऑडिशनला आले आणि त्यांची निवडही झाली. अमेयची ओळख काही नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांना होती. सखी अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आणि स्वानंदी अभिनेता उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची मुलगी ही या दोघींची ओळख होती. त्या तुलनेत सुव्रत, पुष्कराज आणि पूजा हे प्रेक्षकांसाठी अनोळखी होते. पण, काही महिन्यांच्या अवधीत या सहाजणांनी वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली आहे. ‘डी३’मधील त्यांची पात्रं आणि ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’सारखे संवाद लोकांच्या परिचयाचे झाले आहेत.
अर्थात, मालिकेतील पात्रं समजून घेताना आपल्याच स्वभावाची उजळणीही होत असल्याचं ते मान्य करतात. अमेय प्रत्यक्षात त्याच्यात आणि कैवल्यमध्ये असणारा फरक समजावून सांगतो. ‘कैवल्य शांत आहे, विचारी आहे, मी चलबिचल आहे. त्याच्यातला शांतपणा माझ्यात अजून आला नाही,’ असे अमेय म्हणतो. पण, संगीत कंपनीचा मालक त्याचे संगीत विकत घेऊन स्वत:च्या नावावर खपविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एक अभिनेता म्हणून भूमिकेच्या बदल्यात लाच मागण्याचा अनुभव आठवून तो कैवल्यच्या जवळ येतो. कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला चिपळूणचा पुष्कराज इंजिनीअर आहे आणि ‘सेटवर आम्हाला इंग्रजी उच्चार शिकवतो’, हे बाकीचे सांगतात तेव्हा साधासा, इंग्रजी न येणारा, गावाकडचा आशू ‘तूच का?’ हा प्रश्न पडतोच. त्याचे वाढलेले केस आणि दाढी हीसुद्धा ‘आशूची देण आहे का?’ हे विचारल्यावर ‘केसांचं माझ्या डोक्यावर स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यामुळे ते त्यांना हवं तेव्हा वाढतात आणि हवं तेव्हा निघून जातात. दाढीच्या वेगवेगळ्या स्टाइल्स करायला मला आधी आवडायचं. आशूमुळे ‘वाढलेली दाढी’ हीच काय ती स्टाइल बनली आहे,’ असं तो सांगतो. पण, ती दाढी इतरांना किळसवाणी वाटत असली तरी आशूप्रमाणे आपल्याला पण आवडते अशी प्रांजळ कबुली पुष्कराज देतो. आतापर्यंत शांतपणे ऐकत बसलेल्या सुव्रतक डे मोहरा वळविल्यावर ‘सुजय भलताच शिस्तबद्ध आहे. छान नोकरी, घर असं त्याचं आखलेलं आयुष्य आहे. पण, मी तसा नाही. पूर्वी मी आरामात उठा, हवं तेव्हा काम करा असं आरामाचं जीवन जगत होतो. मालिका सुरू झाल्यापासून सकाळच्या शिफ्टच्या वेळांचं गणित पाळावं लागतं,’ असे जाहीर करतो. पुण्याचा सुजय अभिनयाचे धडे घेण्यासाठी दिल्लीला गेला. त्यानंतर त्याने प्रायोगिक नाटकांमध्ये कामे केली. सध्या मुलींमध्ये सुजय भलताच लोकप्रिय असल्याची त्याला जाणीव आहे. त्यामुळे ‘सुजयकडे आयटीची नोकरी असल्याने तो ‘सुयोग्य वर’ विभागात बसतो. पण, मी नट आहे. आमच्या कामाची काहीच निश्चिती नसते, हे लक्षात असू द्यात,’ हे सूचकपणे सांगायचं तो विसरत नाही.
छायाचित्रकार असलेल्या सखीला भेटल्यावर तिच्यात आणि रेश्मात किती फरक आहे हे लक्षात येतो. ‘सुरुवातीला रेश्माला समजून घेणं मला कठीण गेलं. पण, त्यानंतर एखादा सीन माझ्या हातात आल्यावर रेश्माचे संवाद वाचल्यावर ‘असं मी वागले नसतेच’ हा विचार आला की, मी तो सीन करते. कारण, ती माझ्या विरुद्ध आहे. तिच्या जागी मी असते, तर नवऱ्याने फसविल्यावर मी लगेच त्याचा सोक्षमोक्ष लावला असता,’ हे सखी सांगत असतानाच बाकीचे तिला वास्तवात भांडणही करता येतं, असं सांगून मोकळे होतात. अॅना आणि स्वानंदीच्या बाबतीत मात्र बाकीचेच त्या दोघी प्रत्यक्षातही तशाच आहेत,’ हे सांगूनच टाकतात. तरी सेटवर मीनलइतकी स्वानंदीची दादागिरी चालते का?, हे विचारल्यावर ‘अजिबात नाही! इथे सर्वच दादालोक आहेत,’ असं तिच सांगून टाकते.
तसं पहायला गेलं तर ते साकारत असलेल्या पात्रांपेक्षा त्यांचे मूळ स्वभाव भिन्न आहेत. पण, त्यांच्यात आणि या व्यक्तिरेखांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे ‘स्ट्रगल’चा. जगण्यासाठी, स्वत:ची ओळख सिद्ध करण्यासाठी सतत धडपड करण्याचा ध्यास त्यांनाही आहे. स्वानंदीच्याच शब्दात सांगायचं झालं तर ‘साठीच्या म्हाताऱ्याचं पात्र साकारणं आम्हाला कदाचित सोप्पं गेलं असतं. कारण, त्याबाबत काही ठोकळेबाज नियम आहेत. पण, इथे ही पात्रं आमच्याच वयाची आहेत. आमच्यासारखीच वागतात. त्यामुळे लोकं सांगतात, तुम्ही तुमच्यासारखेच वागता. पण, त्याच वेळी मीनलमधून स्वानंदी झाकणार नाही, ही सध्या आमची धडपड आहे.’
बीडची पूजा ठोंबरे अभिनयात कारकीर्द करायची म्हणून पुण्यात आणि नंतर मुंबईत आली. त्यामुळे घरच्यांपासूनचा दुरावा तिला सतत जाणवतो. ‘मुंबईमध्ये आल्यावर घरं शोधण्यापासून माझा स्ट्रगल सुरू झाला. कित्येक दिवस राहायला घर नाही म्हणून मी मुंबई ते पुणे प्रवास करायचे. अभिनय क्षेत्रात काम करणारी एकटी मुलगी म्हणून कोणी भाडय़ाने घर देत नव्हतं,’ तोच आपला स्ट्रगल असल्याचं सांगते. पुण्यावरून दिल्ली मग मुंबई असा प्रवास केलेला आणि आठ नऊ वर्ष कामासाठी घरापासून दूर राहिलेल्या सुव्रतला मात्र ‘स्ट्रगल’ आवडतो. ‘एखादी गोष्ट मला येत नाही हे कळलं की, मी जगतोय असं वाटतं. ती गोष्ट जाणून घेण्याची धडपड मला जिवंत ठेवते.’ पुष्कराजसाठीही समोर आलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची धडपड म्हणजे स्ट्रगल आहे. त्यासाठी तो प्रकृतीने भिन्न असलेल्या आशूची मदतही घेतो. याबाबतीत ती कुठेतरी रेश्मासारखी असल्याचे सखी सांगते. ‘रेश्माप्रमाणे एखाद्याला माझ्या मनातलं सांगायला, माझा मुद्दा पटवून देण्यासाठी मला झगडावं लागतं,’ हे ती मान्य करते. अमेयच्या बाबतीत मात्र त्यांच्या पात्रात दिग्दर्शकाला अपेक्षित असलेली ‘ट्रू नोट’ किंवा योग्य भाव पकडण्याची धडपड त्याच्यातल्या कलाकाराचा ‘स्ट्रगल’ आहे. त्यामुळे सध्यातरी हे सहा मित्र आमच्यातले असूनही आमच्यापेक्षा अगदी वेगळे आहेत आणि त्यातूनच ही ‘दुनियादारी’ रंजक होत असल्याचं या सहाही जणांनी सांगितलं.



