Jethalal Dilip Joshi Prashant Damle : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून घराघरांत पोहचलेले अभिनेते दिलीप जोशी यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या जेठालाल या भूमिकेने तर प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केले आहे. १८ वर्षांपासून या मालिकेमध्ये ते जेठालाल साकारत असून आज हेच पात्र त्यांची ओळख बनले आहे. सिनेमा आणि मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांच्या जेठालाल भूमिकेला प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिलं. त्यांची बोलण्याची खास शैली, विनोद आणि संवाद यामुळे जेठालाल पात्र प्रचंड लोकप्रिय ठरले. यानंतर आता दिलीप जोशी यांनी मराठी सिनेविश्वामध्ये काम करण्याबाबत मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी मराठी सिनेविश्वातील त्यांच्या आवडत्या कलाकारांचा आवर्जून उल्लेख केला आहे.
दिलीप जोशी यांनी मराठी सिनेविश्वाबद्दल आपुलकी व्यक्त केली असून मराठी भाषा आणि कलाकारांविषयी नेहमीच कौतुक वाटत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मराठीमध्ये उत्तर दिल्याने नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हिंदी सिनेविश्वामध्ये काम करणारे दिलीप जोशी यांना मराठी भाषा बोलता येत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी चांगली कथा आणि दमदार भूमिका मिळाली तर मराठी चित्रपटात काम करायला नक्की आवडेल, अशी इच्छा बोलून दाखवली आहे.
मराठीमध्ये अनेक मोठे कलाकार – दिलीप जोशी
दिलीप जोशी यांनी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मराठीमध्ये काम करण्याबाबत मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “मराठी कलाविश्वामध्ये खूप मोठे मोठे कलाकार आहेत. मराठी कलाविश्वात प्रशांत दामले यांच्यासारखे चांगले कलाकार आहेत. मला मराठी बोलता येतं, पण मराठी मालिकेत काम करण्यासाठी एकदम शुद्ध भाषा आली पाहिजे आणि माझी मराठी तेवढी शुद्ध नाही. भाषेचा मान राखला गेला पाहिजे. पण, मी अनेक मराठी नाटकं पाहिली आहेत.”
पुढे ते म्हणाले, “जेव्हा पण मला वेळ मिळतो तेव्हा मी मराठीतील काम बघत असतो. मराठीमध्ये अद्भूत काम केलं जातं. मी मध्यंतरी ‘देवभाबळी’ बघितलं होतं आणि अशी खूप चांगली नाटकं मराठीमध्ये आहेत. दिलीप प्रभावळकर हे माझं आवडते कलाकार आहेत. त्यांचं ‘हसवा फसवी’ हे नाटक मी जवळपास तीन ते चार वेळा पाहिलं आहे. खूप वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर एका मालिकेमध्ये कामसुद्धा केलं होतं. पण, दुर्दैवाने ती मालिका टेलिकास्ट झाली नाही. दिलीप प्रभावळकर आणि अमिता खोपकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली होती. मराठीमध्ये जर काही काम करण्याची संधी मिळाली किंवा एखाद्या भूमिकेची ऑफर मिळाली तर मी नक्की करेन.”
दिलीप जोशी यांनी केले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कौतुक
‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’चे कौतुक करीत दिलीप जोशी म्हणाले, “महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मी पाहत असतो. आम्ही त्यामध्ये सहभागीसुद्धा झालो होतो. त्यामध्येसुद्धा अप्रतिम कलाकार आहेत. त्यांचा विनोदाचा टायमिंग इतका अचूक आहे की आम्ही पोट धरून हसत होतो,” असे म्हणत दिलीप जोशी यांनी मराठी मनोरंजनविश्वातील सिनेमांचे आणि मालिकांचे कौतुक केले आहे. तसेच मराठीमध्ये भूमिका करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करेन, असे मत दिलीप जोशी यांनी व्यक्त केले.
