गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. नीट पेपेर लीक झाल्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यादरम्यान देशभरातील अनेक लोकप्रिय मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या. मनोरंजनविश्वातीलही अनेक कलाकारांनी याबद्दलचं त्यांचं मत व्यक्त केलं. काहींनी पाठिंबाही दिला आहे. अशातच आता लोकप्रिय गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने याबद्दल दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
दिलजीत दोसांझ अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याची देशभरात आणि देशाबाहेरही प्रचंड क्रेझ आहे. अशातच आता नुकत्याच घेतलेल्या इन्स्टाग्रामवरील लाईव्ह सेशनमधून त्याने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. ज्यावेळी त्याला अनेकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले पण, त्याचदरम्यान त्याला कॉकरोच जनता पार्टीबद्दलही विचारण्यात आलं. मात्र त्याने यावेळी त्याला यापासून दूर ठेवा असं म्हटलं आहे. यावेळी अभिनेत्याने यापूर्वीसुद्धा अनेकवेळा त्याला अशा वादग्रस्त प्रकरणात अडकवण्यात आल्यचं म्हटलं आहे. त्यामुळेच तो पुरेशी माहिती नसताना याबद्दल काहीही न बोलणं योग्य समजतो असं म्हणाला.
दिलजीत दोसांझची कॉकरोच जनता पार्टीबद्दल प्रतक्रिया
इन्स्टाग्रामवरील लाईव्ह सेशनबद्दल विचारल्यानंतर दिलजीत दोसांझ म्हणाला, “मला या सगळ्यापासून लांब ठेवा. मी कलाकार आहे राजकारणी नाही. तो पुढे म्हणाला, या जगात प्रत्येक गोष्ट परिपूर्ण किंवा प्रत्येक वेळी योग्य असू शकत नाही. प्रत्येक गोष्ट नेहमी बरोबरच असेल, असं कधीच होत नाही.”
यावेळी त्याने गुरू ग्रंथ साहिबमधील “नानक दुखिया सब संसार, सो सुखिया जिस नाम आधार.” अशी ओळ म्हटली आहे. तो पुढे म्हणाला, “अशा वादांमध्ये माझं नाव वारंवार घेतलं जातं. मात्र माझ्या शुभेच्छा दोन्ही बाजूंच्या लोकांबरोबर आहेत. या प्रकरणाची मला फारशी माहिती नाही, त्यामुळे यापेक्षा अधिक काही बोलणं योग्य ठरणार नाही.”
दरम्यान, दिलजीत दोसांझ अलीकडेच लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला. अभिनेत्री शर्वरी वाघ व अभिनेता वेदांग रैना यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाहसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. परंतु, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसला नाही.
