गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये तरुणांचं आंदोलन सुरू आहे. काल २० जुलै रोजी या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. दिल्ली पोलिसांनी तरुणांवर लाठी चार्ज केल्याचे फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर अनेकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आणि तरुणांचा आवाज ऐकला पाहिजे ते देशाचं भविष्य आहेच असं म्हणत त्यांना पाठिंबा दिला. यामध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींचा समावेश आहे. अशातच आता लोकप्रिय गायक व अभिनेता दिलजीत दोसांझनेही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता-गायक दिलजीत दोसांझने मंगळवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. नीट परिक्षेदरम्यान झालेला गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी जंतर-मंतरसह देशातील विविध ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. दिलजीत दोसांझला काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने मी एक कलाकार आहे आणि मला यापासून वेगळंच ठेवा असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्याच्यावर टीकासुद्धा झाली. मात्र आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर दिलजीतने तरुणांचं समर्थन करत काळजी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्याने लोकांनी आधीच त्याला तो देशविरोधी असल्याचा टॅग दिला आहे असंही म्हटलं आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतर ते संसद असा ‘संसद चलो’ मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली. या आंदोलनाचे प्रमुख चेहरे असलेले सोनम वांगचुक हे उपोषणावर असून सध्या त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत दिलजीत दोसांझने विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, असं आवाहन प्रशासनाला केलं. तसेच, यापूर्वीप्रमाणेच या भूमिकेमुळे पुन्हा एकदा त्याला देशविरोधी ठरवलं जाईल, अशी शक्यताही त्याने व्यक्त केली. २०२०-२१ मधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर टीका आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागल्याचाही त्याने उल्लेख केला.

दिलजीत नेमकं काय म्हणाला?

दिलजीत दोसांझ इन्स्टाग्राम पोस्ट

दिलजीतने पोस्टमध्ये लिहिलं, “आज जे घडलं ते अत्यंत चुकीचं होतं. विद्यार्थ्यांना अशी वागणूक देणं योग्य नव्हतं. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. जनतेचा आवाज हाच देवाचा आवाज असतो.” पुढे तो म्हणाला, “यापूर्वीही मला अनेकदा देशविरोधी ठरवण्यात आलं आहे. यावेळीही मला तसंच म्हटलं जाईल, याची मला कल्पना आहे. शेतकरी आंदोलनानंतर मला मोठ्या प्रमाणात टीका आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला. त्या काळातील अनेक गोष्टींबद्दल आजही मी बोलू शकत नाही. बाकी सर्व काही देव पाहत आहे. बाबाजी सर्वांवर कृपा ठेवावी”.