‘त्रिज्या’, ‘स्थलपुराण’ यांसारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा दिग्दर्शक अक्षय इंडीकर याचा फेसबुक अकाऊंट हॅक झाला आहे. अक्षयने स्वत: फेसबुकवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. त्याचसोबत संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नका असं आवाहनंही त्याने चाहत्यांना केलं.

‘माझं फेसबुक अकाऊंट हॅक झालं असून त्याचा गैरवापर केला जात आहे. अयोग्य फोटो अपलोड केले जात आहेत आणि माझ्या फ्रेंड लिस्टमधील लोकांना चुकीचे मेसेज पाठवले जात आहेत. गैरवर्तन करणाऱ्या आणि पैसे विचारणाऱ्या संशयास्पद मेसेजला प्रतिसाद देऊ नका’, असं त्याने त्याच्या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.

याविषयी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना तो म्हणाला, “प्रेक्षकांसोबत, चाहत्यांसोबत जोडलं जाण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. त्यासाठीच आम्ही नेमाडे, फिरता सिनेमा यांसारखे पेज चालवून मराठी सिनेरसिकांची समज वृद्धिंगत व्हावी म्हणून प्रयत्न करत असताना अशा प्रकारे पेज हॅक करून अयोग्य कंटेंट पसरवल्याने आम्हाला दुःख होत आहे. तसंच फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखी समाजमाध्यमं किती सुरक्षित आहेत यावरही पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.”

अक्षयने ‘त्रिज्या’, ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘स्थलपुराण’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यातील ‘स्थलपुराण’ यंदाच्या ब्राझील सिनेमा महोत्सवात झळकणार आहे. सिनेविश्वात या महोत्सवाला अतिशय मानाचे स्थान आहे. या महोत्सवात झळकणारा स्थलपुराण हा पहिला मराठी सिनेमा ठरणार आहे. सिनेमावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सिनेरसिकासाठी ही आनंदाची बाब आहे. याआधी बर्लिनसह जगभरातल्या २० हून अधिक मानाच्या सिनेमा महोत्सवात अक्षयचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.