आपल्या अवतीभोवती साठी ओलांडलेले असे अनेक जेष्ठ नागरिक राहतात जे एकटेच राहून आपलं उर्वरित आयुष्य जगत असतात. काही वेळा आयुष्याचा जोडीदार निघून गेल्यामुळे किंवा मुलांनी दुर्लक्ष केल्यामुळे या वयस्कर लोकांना मरणाची वाट बघत आपलं आयुष्य घालवावं लागतं. अशा वेळी जर माणसाला इच्छामरण मिळालं तर मरणाची वाट पाहात एकाकी आयुष्य घालवण्याच्या या दुर्दैवातून तरी त्यांची सुटका होईल. इच्छामरणाची गरज कोणाला कधी भासू शकते? आणि जर वयाची साठी ओलांडलेल्या व्यक्तीने स्वत:हून इच्छा मरणाची मागणी केली तर ती पूर्ण करावी का? अशा विषयांवर विचार करायला भाग पाडणारा ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले असून दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोळकर असे दमदार कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अनंत महादेवन आणि जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर तसेच अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देऊन मनमोकळया गप्पा मारल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डलास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण चित्रपट महोत्सव, शारजा फिल्म प्लॅटफॉर्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॉर्ड यांसारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Shivrayancha Chhava Movie Review : अतिरंजक शौर्यगाथा

या चित्रपटाची कथाकल्पना कशी सुचली याबद्दल बोलताना दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी करोनाकाळात ही संकल्पना आपल्याला सुचल्याचं सांगितलं. करोनाकाळात आपल्या माणसांना गमावण्याचं दु:ख अनेकांनी अनुभवलं. त्या कठीण काळात एकाकी असलेल्या अनेक जोडप्यांना जगणं नकोसं झालं होतं. ज्या शांततेत आपण आजवर जगलो आहे, तीच शांतता आणि आनंद अनुभवत आपण हे जग सोडून का जाऊ शकत नाही? असा विचार अनेक वृद्ध जोडप्यांमध्ये आहे हे सांगणारं एक सर्वेक्षण समोर आलं होतं. तिथून मला ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाची कल्पना सुचली आणि मी कामाला लागलो, असं महादेवन यांनी सांगितलं. माझा नेहमीच नवीन आणि आव्हानात्मक विषयांवर काम करण्याचा प्रयत्न असतो. एका विवाहित जोडप्याकडून या विषयाबद्दल प्रेक्षकांना मनोरंजनात्मक पद्धतीने समजलं पाहिजे अशा प्रकारची पटकथा आम्ही या चित्रपटासाठी लिहून घेतली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘आता वेळ झाली’ या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेते दिलीप प्रभावळकर म्हणाले, अनंतने ‘इट्स टाईम टू गो’ ही इंग्रजीमध्ये पटकथा लिहून काढली होती. पण मुळात त्याला मराठी चित्रपटांची आणि त्यात रमण्याची आवड असल्यामुळे महेंद्र पाटील याने पटकथेचा मराठीत अनुवाद केला. विशेष म्हणजे त्याला नेहमी त्या पात्राला न्याय देणारे कलाकार भेटतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर ‘मी सिंधुताई सकपाळ’, ‘बिटर स्वीट’ या चित्रपटासाठी उत्तम मराठी कलाकार त्याच्याबरोबर होते. त्यामुळे हा चित्रपटही अनंतने मराठीतच करायचा ठरवला, अशी माहिती दिलीप प्रभावळकर यांनी दिली. ‘मला नेहमी नवीन काहीतरी करून पाहायचं असतं. एका साच्यातील भूमिकेपेक्षा काहीतरी नवीन करून पाहण्याची मला इच्छा असते. पण मी जेव्हा या चित्रपटाची कथा वाचली तेव्हा काही काळ ही कथा समजायला मला थोडी कठीण गेली. अजून या विषयाबद्दल माहिती करून घ्यायला हवी असं मला वाटलं. या पटकथेत अनेक विषयांचे पदर आहेत आणि संभाव्यता आहेत. मी शशिधर हे पात्र साकारलं आहे. हा गृहस्थ रंजना या आपल्या पत्नीसोबत आजपावेतो समाधानाने जगला आहे. तर या जोडप्याला त्याच समाधानाने आपल्या आयुष्याची अखेर व्हावी असं वाटतं आहे. पण त्यांना तसा निर्णय घेण्याचा अधिकार नाही, या विषयावर हा संपूर्ण चित्रपट गुंफण्यात आला आहे’ असं प्रभावळकर यांनी स्पष्ट केलं.

वैचारिक आणि हलकीफुलकी मांडणी

वैचारिक चित्रपट असूनही अतिशय खेळकर पद्धतीने त्याची मांडणी केली असल्याने कोणीही तोंड पाडून चित्रपट पाहणार नाही. खऱ्या अर्थाने एका समाधानी जोडप्याची गोष्ट या चित्रपटातून अनुभवायला मिळेल, असा विश्वास प्रभावळकर यांनी व्यक्त केला.

‘इच्छामरण या विषयाबद्दल मला थोडीफार माहिती होती, काही वाचनात आलं होतं, पण चित्रपटातून हा विषय मांडण्यात येतो आहे आणि आपण त्याचा भाग आहोत याचा आनंद अधिक वाटला’ असं अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितलं. या चित्रपटात मी रंजना नामक शिक्षिकेचं पात्र साकारलं आहे. तिचा नवरा इच्छामरण या विषयाबद्दल तिच्याशी बोलतो, तेव्हा तिलासुद्धा तो विचार पटतो. एक साधी आणि प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचेल, अशी ही गोष्ट आहे. अनंत महादेवन यांनी एवढे वेगवेगळया विषयांवर उत्तम चित्रपट दिले आहेत, त्यात ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाची भर पडली आहे, असं त्यांनी सांगितलं. 

सामाजिक विषयांवरील चित्रपटांना शो कमी.. 

काही विषय हे काही ठरावीक प्रेक्षकांना लक्षात घेऊन केलेले असतात. ‘आता वेळ झाली’ सारख्या सामाजिक विषयांवरील चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग मर्यादित असल्याने सुरुवातीलाच खूप जास्त चित्रपटगृहातून लावण्यात काही हशील नाही. हळूहळू प्रेक्षकांचा प्रतिसाद बघूनच शो वाढवले पाहिजेत, असं मत अनंत महादेवन यांनी व्यक्त केलं. ‘चित्रपट करतानाच त्याचा प्रेक्षक कोण असेल हे लक्षात घेणं गरजेचं असतं. मी काही दिवसांपूर्वी ‘मॉन्स्टर’ हा जपानी चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटाचे मुंबईत फक्त ४ ते ५ शो होते, मी लवकर चित्रपटाचं तिकीट नाही घेतलं तर शो रद्द होईल, अशी भीता मला वाटली होती. प्रत्यक्षात अर्ध्याहून अधिक चित्रपटगृह भरलेलं होतं. हळूहळू का होईना प्रेक्षक सामाजिक विषयांवरील चित्रपटांकडे वळू लागले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे’ अशी भावना महादेवन यांनी व्यक्त केली. 

म्हणून मी समाजमाध्यमांवर नाही..

सामाजिक माध्यमांबद्दल आपल्याला तुलनेने कमी माहिती आहे, मात्र त्याचे दुष्परिणाम ज्यांना भोगावे लागलेत अशा काही व्यक्ती माझ्या परिचयात आहेत. मला माझं व्यक्तिगत आयुष्य माझ्यापर्यंतच ठेवायला आवडतं, मी कधी केव्हा काय करतोय याची सविस्तर माहिती सगळयांनाच असावी असं मला वाटत नसल्यानेच मी समाजमाध्यमांवर नाही, असं दिलीप प्रभावळकर यांनी सांगितलं. मात्र समाजमाध्यमांमुळे अनेक चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं सांगतानाच ‘आता वेळ झाली’ सारखे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यात समाजमाध्यमांची मोलाची भूमिका राहिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director ananth mahadevan actor dilip prabhavalkar actress rohini hattangadi in loksatta office for movie aata vel zaali promotion zws
First published on: 18-02-2024 at 06:37 IST