scorecardresearch

मांजरेकरांच्या अडचणीत वाढ

‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत

मांजरेकरांच्या अडचणीत वाढ

‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवरून मांजरेकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) स्थापन विशेष न्यायालयाने शुक्रवारी माहीम पोलिसांना दिले.

चित्रपटातील अल्पवयीन मुलांवर चित्रित केलेल्या आक्षेपार्ह दृश्यांवरून भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी अ‍ॅड्. प्रकाश साळसिंगकर यांच्यामार्फत विशेष पोक्सो न्यायालयात धाव घेतली होती. तसेच मांजरेकर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. चित्रपटात मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप तक्रारदारीत करण्यात आला होता. तसेच भारतीय दंड विधानाच्या १५६(३) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली होती.

देशपांडे यांनी आधी माहीम पोलीस ठाण्यात मांजरेकर यांच्याविरोधात लेखी तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने देशपांडे यांनी विशेष पोक्सो कोर्टात धाव घेतली. देशपांडे यांच्या तक्रारीवर शुक्रवारी निर्णय देताना तक्रारीत तथ्य असल्याचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. शेख यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-02-2022 at 01:11 IST

संबंधित बातम्या