आपलंच वास्तव बघायला लोक अजूनही घाबरतात – नागराज मंजूळे

‘सैराट’ची कथा मी फार आधी लिहिली होती. एका क्षणानंतर खूप कंटाळा आला म्हणून लिहिणं सोडून दिलं.

नागराज मंजुळे नावाच्या मराठमोळ्या माणसाचे दिग्दर्शन असलेली तिसरी कलाकृती, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे एरव्ही चित्रपटातील नायक-नायिकांच्या फुटपट्टीत कुठेही बसले नसते असे दोन नवोदित कलाकार, अजय-अतुलचे संगीत आणि प्रेमकथा एवढाच जामानिमा घेऊन आलेला ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे विचारांचं एकच सैराट वादळ सुरू झालं. या चित्रपटाने समाजातील सगळ्याच स्तरांतून एक संवाद सुरू केला. मात्र त्याहीपेक्षा चित्रपटाची लांबी, गाणी, ग्रामीण संवाद आणि धक्कादायक शेवट असे सगळे मुद्दे पार करून जेव्हा या चित्रपटाने तिकीटबारीवर ८५ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली तेव्हा हे ‘सैराट’ वादळ हिंदीतही घुसलं. इतकी छोटी शिदोरी घेऊन आलेला एखादा मराठी चित्रपट हिंदीला टक्कर देईल, अशी कल्पना त्यांनीही केली नव्हती आणि खुद्द नागराजनेही केली नाही. मात्र हे अद्भुत घडलं आहे. ‘सैराट’मुळे एकूणच नागराजचं बदललेलं जीवन, या चित्रपटावरून सुरू झालेले अनेक वादविवाद, चित्रपटाच्या नायक-नायिकेपासून ते त्याच्या शेवटापर्यंत तयार झालेल्या दंतकथा या सगळ्यांवर नागराज मंजुळेशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाच्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या व्यासपीठावरून मिळाली. नागराजच्या या कधी गंभीरपणे, कधी मिश्कील चिमटे घेत समजावून सांगितलेल्या ‘सैराट’ गप्पा..

‘फँ ड्री’नंतर जेव्हा ‘सैराट’च्या तयारीला सुरुवात झाली, तेव्हाच कथेच्या पातळीवरच हा चित्रपट लोकांना आवडणार, असा विश्वास आपल्याला वाटला होता, असं नागराज यांनी सांगितलं. सुरुवातीला मी अनेकांना ही क था ऐकवली होती आणि प्रत्येकाकडून मला हे भारी आहे, असा प्रतिसाद यायचा. त्यांना कथा आवडते आहे हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं. मग रफ कट आल्यानंतर तो खास दाखवला. म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे मोठमोठय़ाने गाणी लावायला वगैरे परवानगी नाही. पण हा रफ कट दाखवल्यानंतर अनेक चांगल्या व्यक्ती तेव्हाही गाण्यांवर थिरकल्या होत्या. बर्लिन चित्रपट महोत्सवातही जेव्हा अतिशय कडक शिस्तीच्या म्हणवल्या जाणाऱ्या जर्मन लोकांनी भाषाही माहिती नसताना ज्या पद्धतीने सलग तीन तासांचा हा चित्रपट पाहिला. या सगळ्या गोष्टींचा विचार करता तेव्हाच हा चित्रपट लोकांना आवडणार याची खात्री झाली होती. पण तो एवढी विक्रमी कमाई करेल, अशी काही कल्पना केली नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं. याआधी ‘एस्सेल व्हिजन’ने ‘नटसम्राट’ किंवा ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटांची जोरदार प्रसिद्धी केली होती. त्या तुलनेत ‘सैराट’चे प्रदर्शनाआधी प्रसिद्धी कार्यक्रम फार झाले नव्हते. असं असतानाही चित्रपट इतका तुफान चालण्यामागचे कारण काय? असे विचारताच हा चित्रपट करतानाच तो माऊथ पब्लिसिटीवर जास्त चालणार याची खात्री होती, असं नागराजने सांगितलं. खरं तर, चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच काही लोकांनी ५० ते १०० कोटी रुपयांची कमाई करणार, असा अंदाज व्यक्त केला होता. फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपवरही लोकांनीच चित्रपटाला चांगली प्रसिद्धी दिली, असं त्यांनी सांगितलं.
‘फँ ड्री’च्या यशात त्याच्या गाण्यांचा खूप मोठा वाटा आहे. पहिल्यांदाच व्यावसायिकतेची सगळी गणितं लक्षात घेऊन मुद्दाम गाण्यांचा वापर केला गेला का? या प्रश्नावर ‘फँ ड्री’च्या वेळी प्रेक्षकांच्या ज्या तक्रारी होत्या त्यात गाणी नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त के ली होती, असं सांगत नाच-गाण्यांपासून आपल्या चित्रपटांची सुटका कधी होणार? याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
‘मला विचाराल तर ‘फँ ड्री’ खूप लोकांनी पाहायला हवा होता, अशी माझी इच्छा होती. खूप साधा-सरळ, विषयामध्ये किंवा मांडणीतही कुठलीच क्लिष्टता नसणारा असा तो चित्रपट होता, पण त्यात गाणी नाहीत म्हणून लोकांनी तो पाहिला नाही. म्हणजे त्यात एकच गाणं होतं जे प्रसिद्धीसाठी करण्यात आलं असल्याने चित्रपटात समाविष्ट नव्हतं. मला हे कळत नाही की गाणी तुम्हाला स्वतंत्रपणे आल्बम म्हणून पाहता येतात, ऐकता येतात. तरीही चित्रपटातच ती पाहण्याचा अट्टहास का? गेल्या शंभर वर्षांमध्ये चित्रपटात गाणी पाहिजेत हा संस्कारच लोकांवर करण्यात आला आहे. त्यामुळे ‘सैराट’ करतानाच मी माझी कहाणी लोकांच्या भाषेतच सांगेन. तुमच्या स्टाईलने सांगेन, पण शेवटी माझ्याच गोष्टीवर तुम्हाला आणेन, असं ठरवूच हा चित्रपट केला आहे,’ असं त्यांनी आग्रहाने सांगितलं. ‘सैराट’ची कथा तुम्हाला क शी सुचली? हा कित्येकांना पडलेला प्रश्न इथेही नागराजसमोर आला. मुळात जो लिहितो तो लेखक असा आपल्याकडे गैरसमज आहे. लेखक हा विचार करतो. तो विचार आपल्या लेखनातून लोकांसमोर आणतो. ‘सैराट’ची कथा मी फार आधी लिहिली होती. एका क्षणानंतर खूप कंटाळा आला म्हणून लिहिणं सोडून दिलं. त्या दरम्यान ‘पिस्तुल्या’, ‘फँड्री’ पूर्ण केली. मग पुन्हा विश्वासाने कथा लिहायला सुरुवात केली त्या वेळी खूप बारीक-सारीक संदर्भ, तपशील कुठे, कसे पेरायचे याचा पूर्ण विचार करून ती लिहिली. शर्टाचं बटण लावताना एक चुकीचं बटण लागलं की पुढची सगळीच बटणं चुकतात. त्यामुळे लेखकाला ते भान ठेवून लिहायला लागतं. म्हणजे त्यात तपशीलही आले पाहिजेत, पण त्यात गोष्ट मरता कामा नये, हा पूर्ण विचार करून मी कथा लिहितो. लिहून झाल्यावर ती वाचतो आणि जेव्हा त्याबद्दल विश्वास वाटेल तेव्हाच त्याच्या चित्रपटाची तयारी सुरू करतो, असं सांगणाऱ्या नागराजने चित्रीकरणापेक्षाही लिखाणाची प्रक्रिया आपल्याला जास्त भावते, असं सांगितलं.
‘फँ ड्री’तला जब्याने भिरकावलेला दगड आणि ‘सैराट’मधली शेवटाची लहानग्या मुलाची रक्ताने माखलेली पावले असा कडवा, धक्कादायक शेवट हा मंजुळेंच्या चित्रपटाचं वैशिष्टय़ ठरत चाललंय. कित्येकांनी शेवट पचत नाही म्हणून चित्रपट पाहिलेला नाही. नेहमी असाच दु:खद शेवट गरजेचा आहे की नाही यावर थेट न बोलता आपलंच वास्तव आपण बघायला घाबरतो याबद्दल नागराज यांनी आश्चर्य व्यक्त केलं. ‘सैराट’मध्ये आर्ची आणि परशाची प्रेमकथा दाखवताना लिखाणातच आपल्या अनुभवांचा मोठा भाग आहे. शेवटी तुमच्या अनुभवांच्या आधारे कथा लिहिताना त्यात तुम्ही कल्पनेचे रंग भरता. तशीच ती प्रेमकथा लोकांपर्यंत पोहोचली. कित्येकांनी परशाची प्रेमकथा माझीही आहे, असं सांगितलं. मात्र शेवट सोडून.. तो आपला नाही, असं म्हणणारेही कित्येक जण भेटले, पण त्यामुळे वास्तव लपवता येत नाही, नाकारून चालत नाही, असं प्रतिपादन ते करतात. आपल्याकडे जातिवाद अजूनही आहे, शहरांमधूनही आहे, फक्त त्याच्या अभिव्यक्तीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण लोकांना ते मान्य होत नाही. मग अशा लोकांसाठी त्यांच्याच भाषेत सांगत सांगत हळूच आपली गोष्ट त्यांच्या गळी उतरवावी लागते जे ‘सैराट’मध्ये आपण साध्य केले असल्याचेही नागराज यांनी सांगितलं.
‘सैराट’मध्ये पहिल्यांदाच शेतातून पळणारा नायक दिसतो, आपल्याच नादात हरवलेला, नाचणारा नायक दिसतो याकडे लक्ष वेधल्यावर चांगलंच आहे ‘सरसोंच्या’ शेतावर फक्त हिंदीचीच मक्तेदारी नाही, हे कळलं आहे लोकांना.. अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. शेतं तर आमच्याकडेही आहेत, पण शेवटी चित्रपट हे माध्यम खोटेपणाचंच आहे, तुम्ही त्यात कल्पनेचे रंग जास्त भरता. त्यामुळे या सगळ्या कल्पिताचा वापर करूनही तुम्ही लोकांपर्यंत काय पोहोचवता हे खूप महत्त्वाचं असतं, असं त्यांनी सांगितलं. चित्रपटांवर नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी ‘एफटीआयआय’, ‘एनएसडी’सारख्या संस्थांमधून शिकून आलेल्यांचा वरचष्मा राहिलेला आहे. पण अशा मूठभर लोकांचा वरचष्मा नागराजना मान्य नाही. तुमची कलाकृती चांगली असेल तर तिचं कुठेही कौतुकच होतं.
एखादी गोष्ट शिकल्यानंतर फार तर ती तुम्ही योग्यपणे करता म्हणजे कथा चांगली असू शकते, पण पटकथा चांगली करता आली नाही तर चित्रपट फसतो. इथे तुमची कला तुमच्या शिक्षणापेक्षा जास्त महत्त्वाची ठरते, असं त्यांनी सांगितलं. आता चित्रपटांच्या निमित्ताने नाही म्हटलं तरी शहरांमध्येही १० वर्षांपेक्षा जास्त वास्तव्य झालं असल्याने कदाचित पुढच्या चित्रपटांमधून त्याचे प्रतिबिंब उमटू शकते, असं आश्वासन देतानाच आपल्याकडे चांगल्या क थांची पोतडी तयारच आहे. त्या काढून चित्रपटांतून लोकांपर्यंत पोहोचवणं हाच ध्यास असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘मला विचाराल तर ‘फँ ड्री’ खूप लोकांनी पाहायला हवा होता, अशी माझी इच्छा होती. खूप साधा-सरळ, विषयामध्ये किंवा मांडणीतही कुठलीच क्लिष्टता नसणारा असा तो चित्रपट होता. पण त्यात गाणी नाहीत म्हणून लोकांनी तो पाहिला नाही. म्हणजे त्यात एकच गाणं होतं जे प्रसिद्धीसाठी करण्यात आलं असल्याने चित्रपटात समाविष्ट नव्हतं. मला हे कळत नाही, की गाणी तुम्हाला स्वतंत्रपणे आल्बम म्हणून पाहता येतात, ऐकता येतात. तरीही चित्रपटातच ती पाहण्याचा अट्टहास का? गेल्या शंभर वर्षांमध्ये चित्रपटात गाणी पाहिजेत हा संस्कारच लोकांवर करण्यात आला आहे. त्यामुळे ‘सैराट’ करतानाच मी माझी कहाणी लोकांच्या भाषेतच सांगेन, तुमच्या स्टाइलने सांगेन, पण शेवटी माझ्याच गोष्टीवर तुम्हाला आणेन, असं ठरवूनच हा चित्रपट केला आहे.’
– नागराज मंजूळे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Director nagraj manjule speaks about sairat

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या