रेश्मा राईकवार

आठ वर्षांपूर्वी जेव्हा मोहित सुरी नामक दिग्दर्शकाने एरवीचा त्याचा यशस्वी प्रेमपटांचा मार्ग सोडून ‘एक व्हिलन’सारखा चित्रपट दिग्दर्शित केला तेव्हा त्यात प्रेमाचा अंश नव्हताच असं नाही. प्रेमावर विश्वास असलेल्याला सगळं जग प्रेममय भासतं म्हणतात, तसंच त्याही चित्रपटात प्रेमकथा होतीच. पण तरीही ती खऱ्या अर्थाने नायकाची नव्हे, खलनायकाचीच गोष्ट होती. कथा, दिग्दर्शन आणि अभिनय तिन्ही बाबतीत सरस असलेल्या या चित्रपटाचा पुढचा भाग आता प्रदर्शित झाला आहे. नावात व्हिलन रिटर्न्‍स असा स्पष्ट उल्लेख असला तरी संपूर्ण चित्रपट मुळात खलनायक कोण? तू का मी?, यावर खल करण्यातच खर्ची पडला आहे.

dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या
ravichandran ashwin profile
व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन

‘एक व्हिलन’ची मांडणी अगदी साधी-सरळ होती. हिंदी चित्रपटांना नायक म्हटला की खलनायक लागतो आणि खलनायकाची गोष्ट सांगायची असली तरी त्याचं खलपण सिद्ध करणारा कोणी एक नायक लागतो. आणि ही दोन टोकं जुळवून आणायला नायिकाही लागते. पहिल्या चित्रपटात लेखकानेच ते गणित उत्तम जुळवलं होतं. साचेबद्ध चौकटीत न बसणारा प्रकाश महाडकर नामक खलनायक खरोखरच किमान अंगावर काटा उभा करणारा होता. गेल्या काही वर्षांत मुळात प्रत्येकातच नायक आणि खलनायक दोन्ही प्रवृत्ती असतात, त्यामुळे कोणतीही व्यक्तिरेखा नुसती काळी-पांढरी म्हणून पाहायची नाही, हा मुद्दा इतका ठसला आहे की आता सगळय़ाच व्यक्तिरेखा गोंधळवून टाकणाऱ्या ठरू लागल्या आहेत. ‘एक व्हिलन रिटर्न्‍स’च्या बाबतीत तर हा गोंधळ तीव्रतेने जाणवल्याशिवाय राहात नाही. गौतम मेहरा हा गर्भश्रीमंत नायक, प्रेमभंगामुळे दु:खी झाल्यावर तो रडत बसत नाही तर भर मंडपात जाऊन प्रेयसीला त्याची किंमत मोजायला लावतो. ‘मरण आलं तरी चालेल, पण हरणार नाही’, हा त्याचा खाक्या त्याच्यातल्या चांगल्या माणसाला वर येऊच देत नाही. तर दुसरीकडे भैरव नावाचा एक साधा टॅक्सीचालक आहे. कधीही कोणाला वाईट न बोलणारा, मनातलं धड कोणाला सांगूही न शकणारा असा भैरव पहिल्याच प्रेमात माती खातो.. आणि मग एरव्ही साध्या-सज्जन वाटणाऱ्या या माणसाच्या आतला दुर्जन उफाळून वर येतो. इथे दोन नायक नव्हे खलनायक आहेत, त्यामुळे प्रत्येकी एक या हिशोबाने त्यांना प्रेयसीही आहे. दोघांच्याही प्रेमाच्या गोष्टीचे विविध पदर गाणी-प्रसंगानुरूप उडत राहतात. त्यांचा जेव्हा जांगडगुत्ता होतो तेव्हा खरा खलनायक कोण? हा वाद आणि शोधही सुरू होतो.

एकाप्रकारे माणसाच्या काही मूलभूत स्वभाव प्रकारानुसार आतून शांत-बाहेरून अशांत आणि बाहेरून शांत-आतून अशांत अशा दोन टोकाचे स्वभाव असलेल्या व्यक्तींची परिस्थितीनुरूप पडणारी गाठ आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथाबीज उत्कंठा वाढवणारं नक्कीच आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीला दिसणारा तपास अधिकाऱ्यांच्या चर्चेचा वा समजून घेण्याचा भाग म्हणून अशाप्रकारे ठराविक पद्धतीने हत्याकांड करणाऱ्यांची मानसिकता काय असते, हे उलगडण्याचा दिग्दर्शकानेही या चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केला असावा असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात तसं होत नाही. आपल्याकडे सगळय़ाच प्रकारच्या कथांना मिळणारा प्रेमकथांचा तडकाच इतका जास्त असतो की मूळ पदार्थाची चवच कळू नये. चित्रपटाची कथा दिग्दर्शक मोहित सुरीने लेखक असीम अरोरा यांच्याबरोबर मिळून लिहिली आहे. त्यामुळे बहुधा प्रेमकथेची मात्रा अधिक झाली असावी. चोर-पोलीस पाठलाग यातही आहे. मात्र इथेही दोन दोन ‘खलह्णनायक असल्याने पोलीस व्यक्तिरेखांना फारसे काम नाही. त्यातल्या त्यात ’सत्याह्ण फेम अभिनेता जे. डी. चक्रवर्ती हा खूप काळाने हिंदीत दिसला आहे. इथे तो या अशाप्रकारे हत्यासत्रात अडकलेल्या गुन्हेगारांची मानसिकता समजून घेऊन काम करणाऱ्या एसीपी गणेशनच्या भूमिकेत दिसला आहे. मात्र तो काहीतरी भरीव करण्याच्या आतच मध्यंतरानंतर त्याच्या हुशारीला थेट फासच लावून दिग्दर्शक मोकळा झाला आहे.

बाकी कलाकार मंडळींमध्ये दोन मुख्य कलाकार तेही अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम. दोघेही आडदांड आहेत. अभिनयाच्या बाबतीतही दोघांमध्ये फारसं डावं-उजवं करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्या दोघांची काही सेकंदाची मारामारी हा काही नवलाने पाहण्याचा विषय नाही. त्यांच्या नायिका अनुक्रमे तारा सुतारिया आणि दिशा पटानी. दोघींचाही अभिनयापेक्षा वलयांकच अधिक आहे, त्यातल्या त्यात एकीला काही वेगळी छटा देण्याचा प्रयत्न झाला आहे, पण त्यालाही लेखकाने काल्पनिकतेचा सुरुंग लावला आहे. त्यामुळे इतका वेळ जे पाहात होतो ते काय.. चित्रपट जितका पुढे सरकत जातो तितके डोके अधिक भणभणत जाते. बरं आपल्याकडे किमान शेवटाला खऱ्या खलनायकाला मारायची प्रथा आहे. इथे तर तोही जिवंत राहतो आणि त्याला पहिला येऊन भेटतो. आता हा पहिला कोण? हे एरव्हीच हॉलीवूडपटी पूर्वार्ध-उत्तरार्ध अशा पद्धतीची चित्रपट मालिका पाहून हुशार झालेल्या आपण सगळय़ाच प्रेक्षकांसाठी फार मोठे कोडे राहिलेले नाही. असो.. आपला ‘एक व्हिलन’ भाऊ नव्या भागात परतला तर आनंदच आहे.

एक व्हिलन रिटर्न्‍स

दिग्दर्शक – मोहित सुरी

कलाकार – अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, दिशा पटानी, तारा सुतारिया, जे. डी. चक्रवर्ती, नेहा शितोळे.