पाकिस्तानमध्ये ‘नीरजा’ प्रदर्शित न झाल्याने सोनम कपूर निराश

या चित्रपटात पाकिस्तानबद्दल चुकीची बाजू दाखविली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोनम कपूर

अभिनेत्री सोनम कपूरचा ‘नीरजा’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मात्र, पाकिस्तानात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आल्याने अभिनेत्री सोनम कपूरने नाराजी जाहीर केली.
सोनम कपूरची प्रमुख भूमिका असलेला नीरजा हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आलीयं. या चित्रपटात पाकिस्तानबद्दल चुकीची बाजू दाखविली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, सोनमने या सर्व आरोपांचे खंडण केले. तिने ट्विटरद्वारे आपली नाराजी जाहीर करत लिहले की, ‘नीरजा’ हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न होणे हे निराशाजनक आहे. पाकिस्तानकडून नीरजाचा गौरव करण्यात आला होता आणि पुन्हा आता ते तिला मानवंदना देतील अशी मी अपेक्षा करते.
विमान अपहरण घटनेत नीरजाने पाकिस्तानी नागरिकांचे प्राण वाचवले होते आणि चित्रपटातही पाकिस्तानबद्दल कोणतीही चुकीची बाजू दाखविण्यात आलेली नाही. जगभरातून ह्या चित्रपटावर जेव्हा चांगल्या प्रतिक्रिया येतील तेव्हा नक्कीच हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होईल अशी मी अपेक्षा करते.
‘नीरजा’ हा चित्रपट १९८६ साली मुंबईहून न्यूयॉर्कसाठी रवाना झालेल्या पॅन एम ७३ विमान अपहरणाच्या सत्य घटनेवर आधारित आहे. या विमान अपहरणात ‘नीरजा’ या हवाईसुंदरीने आपले प्राण गमावून दहशतवाद्यांपासून विमानातील प्रवाश्यांचे प्राण वाचवले होते. याच शूरवीर ‘नीरजा’ची भूमिका सोनम कपूरने चित्रपटात साकारली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Disheartened that neerja not releasing in pakistan said sonam kapoor