मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे यशाच्या शिखरावर असताना हे जग सोडून गेले तर काहींच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामध्येसुद्धा अनेक चढ उतार आले. अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावं लागलं. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण आजही समोर आलेलं नाही. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री विजयलक्ष्मी.

सिल्क स्मिता यांचं खरं नाव विजयलक्ष्मी होतं. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील एका गावात झाला होता. आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने त्यांना चौथीनंतर शाळा सोडावी लागली. वयाच्या १४व्या वर्षी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाच्या पुरुषाशी केलं. सासरच्या घरात त्यांच्यावर छळ झाला. दोन वर्षांनी त्यांनी ते घर सोडलं आणि काहीही न घेता चेन्नई येथे आल्या. तिथे त्यांनी चित्रपटांच्या सेटवर ब्रश धुण्याचं आणि टच-अपचं काम सुरू केलं.

मनोरंजनविश्वात आल्यानंतर बदललं आयुष्य

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार एका दिग्दर्शकाने १९७९ मध्ये Vandichakkaram या तामिळ चित्रपटात त्यांना संधी दिली. या चित्रपटात त्यांनी ‘सिल्क’ नावाची भूमिका साकारली. चित्रपट मोठा हिट ठरला आणि त्या भूमिकेमुळे त्यांना नवी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव सिल्क स्मिता असं ठेवलं.

१८ वर्षांच्या कारकिर्दीत सिल्क स्मिता यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांतील ४५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. १९८३ या एका वर्षातच त्यांनी ४४ चित्रपट केले होते. तो एक विक्रम मानला जातो. त्यांनी कमल हासन, मोहनलाल आणि दक्षिणेतील अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं. पडद्यावर त्या खूप दमदार दिसायच्या, पण खऱ्या आयुष्यात त्या शांत स्वभावाच्या होत्या आणि त्यांचा मित्रपरिवारही खूप छोटा होता.

यशाच्या शिखरावर असताना सिल्क स्मिता यांनी एका डॉक्टरशी लग्न केलं. त्यांनी सिल्क स्मितांची सगळी कमाई चित्रपट निर्मितीत गुंतवली. मात्र ते चित्रपट फ्लॉप ठरले आणि त्यांनी कमावलेलं जवळपास सर्व काही गमावलं.

यानंतर त्यांनी स्वतः निर्माती होण्याचा प्रयत्न केला. पण ज्या उद्योगाने त्यांच्या नावावर मोठी कमाई केली, त्याच उद्योगाने त्यांना संधी दिली नाही. पैसा संपला, नाती तुटली आणि चित्रपटांच्या ऑफर्सही कमी होऊ लागल्या. त्या वेळी त्यांचं वय फक्त ३५ वर्षं होतं.

२२ सप्टेंबर १९९६ च्या रात्री सिल्क स्मिता यांनी त्यांची मैत्रीण अनुराधा हिला फोन केला. काहीतरी त्रास होत असल्याचं सांगत त्यांनी तिला घरी येण्यास सांगितलं. त्याच रात्री त्यांनी ज्येष्ठ अभिनेते रविचंद्रन यांनाही अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना सिल्क स्मिता यांच्या निधनाची बातमी समजली. त्या रात्री त्यांनी इतर काही लोकांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण कुणी फोन उचलला नाही किंवा त्या फोनमागचा अर्थ समजण्याआधीच खूप उशीर झाला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाला शाळेत सोडून अनुराधा घरी आल्या. तेव्हा त्यांनी सिल्क स्मिता यांना मृत अवस्थेत पाहिलं. घटनास्थळी एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली. त्यात लिहिलं होतं, “अभिनेत्री होण्यासाठी मी किती मेहनत घेतली, हे फक्त मलाच माहीत आहे. कुणीही माझ्यावर प्रेम केलं नाही. सगळ्यांनी माझ्या कामाचा फायदा घेतला.”

त्यावेळी त्यांचं वय फक्त ३५ वर्षं होतं. त्यांच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. २०११ मध्ये त्यांच्या आयुष्यावर प्रेरित The Dirty Picture हा चित्रपट तयार करण्यात आला.