बॉलिवूडमधील मोजक्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर या अभिनेत्रीला पाहून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, अवघ्या १९ व्या वर्षी तिचा अपघाती मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे गूढ एखाद्या सिनेमातील थ्रील सारखेच आहे. मृत्यूचे कारण अद्यापही बॉलिवूडमधील एक गूढ आहे. ५ एप्रिल १९९३ मध्ये वर्सोवा मुंबई येथील रुग्णालयात दिव्याने अखेरचा श्वास घेतला. वर्सोवा येथील तुलसी नावाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या अपघाती मृत्यूनंतर संशयाची सुई तिचा पती आणि बॉलिवूड दिग्दर्शक साजिद नाडियादवाला याच्यासह तिच्या आईकडे होती. मात्र, पोलिसांनी १९९८ मध्ये दिव्याची केस बंद केली.

दिव्या भारतीने १४ व्या वर्षी रंगमच गाजविणाऱ्या दिव्याने १६ व्या वर्षी तेलगू चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नव्वदीच्या दशकात म्हणजे १९९२ मध्ये तिने ‘विश्वात्मा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील ‘सात समुदर पार मै तेरे…’ हे गाणे आज देखील प्रसिद्ध आहे. केवळ एका वर्षात तिने बॉलिवूडमधील तब्बल १४ चित्रपटात काम केले. त्यामध्ये गोविंदासोबतचा ‘शोला और शबनम’ आणि ऋषी कपूर यांच्यासोबतचा ‘दिवाना’ या लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे. ‘दिवाना’ या चित्रपटात बॉलिवूड बादशाह शाहरुखही तिच्यासोबत दिसला होता.

दिव्याच्या मृत्यूनंतर तिचा ‘शतरंज’, ‘रंग’, ‘थोल्ली मुद्धू’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनिल कपूरच्या ‘लाडला’ चित्रपटात दिव्या दिसणार होती. मात्र, मृत्यूनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण श्रीदेवीला घेऊन पूर्ण करण्यात आले. दिव्याने या चित्रपटातील बरेचसे चित्रीकरण केले होते. त्याचे काही फुटेज देखील इंटरनेटवर उपलब्ध आहेत. य़ाशिवाय ‘धनवान’ (करिश्मा कपूर), ‘मोहरा’ (रविना टंडन), ‘विजयपथ’ (तब्बू), ‘हलचल’ (काजोल), ‘आंदोलन’ (ममता कुलकर्णी), ‘कर्तव्य’ (जूही चावला), आणि ‘अंगरक्षक’ (पूजा भट्ट) हे तिचे नियोजित चित्रपट अडखळले होते. जे नायिका बदलून पूर्ण करण्यात आले.