Sensodyne Advertisement Controversy : सोशल मीडियावर सध्या एका जाहिरातीच्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये एका महिलेच्या चेहऱ्यावर पान खाऊन थुंकल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा प्रकार महिलांचा अपमान करणारा असल्याची टीका होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर या जाहिरातीत झळकलेली मॉडेल व अभिनेत्री दिव्या उन्नी हिने तिची भूमिका स्पष्ट केली आहे. या वादावर भाष्य करताना तिने केवळ या जाहिरातीबद्दलच नव्हे, तर देशात महिलांवर होणाऱ्या गंभीर अत्याचारांबाबतही खंत व्यक्त केली आहे. तसेच आपल्या देशातील पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे.
‘सेन्सोडाइन’च्या या जाहिरातीचे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री दिव्या उन्नी हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिचे मत व्यक्त केले. पोस्टरवर थुंकण्याच्या या प्रकरणावर प्रतिक्रिया देत दिव्या म्हणाली, “अनेकांना मला याचे फोटो व व्हिडीओ पाठवले यामध्ये बाजूला इतर पुरुषांचेही फोटो आहेत. मात्र, फक्त माझ्या किंवा फक्त तिथे एका महिलेचा फोटो आहे, म्हणून यावर थुंकण्यात आले. मात्र, ते माझ्यावर दिव्या म्हणून थुंकले आहेत असा विचार करत नाही, यामुळे नक्कीच मला वाईट वाटले; पण तिथे फक्त महिला आहे म्हणून तसे करण्यात आले आहे. माझ्याजागी तिथे इतर कोणतीही दुसरी स्त्री असू शकते.”
देशामध्ये स्त्रियांबरोबर जे काही होतं त्यापेक्षा हे अगदीच नगण्य
पुढे ती म्हणाली, “तिथे फक्त दिव्या उन्नी आहे असे नाही, तर कोणत्याही स्त्रीचा चेहरा असता तरी हेच केले असते. त्या शेजारी इतर पुरुष राजकारण्यांचे फोटो आहेत, पण मुद्दाम स्त्रीच्या चेहऱ्यावर हे करण्यात आले आहे. त्यामुळे हे माझ्या चेहऱ्यावर पान खाऊन थुंकले आहे असे मी म्हणणार नाही. असा विचार केला तर तो फक्त मूर्खपणाचा ठरेल. या घटनेने वाईट आणि विचित्र नक्कीच वाटले, पण आपल्या देशामध्ये इतर स्त्रियांबरोबर जे काही होत आहे, अगदी लहान बाळापासून वृद्ध महिलांबरोबर जे काही घडतं आहे, त्यापुढे तर हे काहीच नाही. त्यांना ज्या हिंसाचाराचा आणि गैरवर्तणुकीचा सामना करावा लागतो, त्या तुलनेत हे अगदीच नगण्य आहे. हा केवळ थुंकणाऱ्या पुरुषांचा एक गट आहे.”
हे आपल्यासाठी काही नवीन आहे का?
दिव्या पुढे म्हणाली, “ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे, पण ही काही नवीन बातमी आहे का? भारतातील बहुसंख्य पुरुषवर्ग हा स्त्रियांचा आदर करत नाहीत. ते स्त्रियांच्या दृष्टिकोनाचा विचार करू शकत नाहीत. ते स्त्रियांना माणूस म्हणूनही मानत नाहीत. या देशात स्त्रियांसह जे घडत आहे, ज्या प्रकारे त्यांचा अपमान, अत्याचार आणि त्यांना दुखवले जाते, जे रोज आपण बघत आहोत, त्या विरोधात मला लढायचे आहे. हे विषय समोर आणून मला त्यावर चित्रपट बनवायचे आहेत आणि या गोष्टी समाजासमोर आणायच्या आहेत, जेणेकरून लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल होईल.
दिव्या म्हणाली, “ही एखाद्या व्यक्तीची नाही तर ही एका मानसिकतेची समस्या आहे, लहानपणापासून ज्या पद्धतीने वाढवले, त्याची समस्या आहे. पिढ्यानपिढ्यांची समस्या आहे. जोपर्यंत आपल्या देशातील पुरुषांना त्यांची विचारसरणी किती चुकीची आहे हे कळत नाही, आपल्या लहान मुलांचे योग्य संगोपन होत नाही, तोपर्यंत ही समस्या संपणार नाही. माझ्या पोस्टरबरोबर जे घडले ती काही फार मोठी गोष्ट नाही, हे तर काहीच नाही. पण, लहानपणापासून भारतामध्ये वाढलेली एक मुलगी म्हणून यापूर्वी कधीही इतके असुरक्षित वाटले नाही आणि मी माझ्या स्वतःच्या पद्धतीने ते बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व मुलींनीही याच पद्धतीने विचार करावा.”
