दिया मिर्झा दिग्दर्शकाच्या खुर्चीमध्ये

मध्यंतरीच्या काळामध्ये स्वत:च्या लग्नाच्या तयारीमध्ये गुंतलेल्या दिया मिर्झाने आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीपासून काही काळ विश्रांती घेतली होती.

मध्यंतरीच्या काळामध्ये स्वत:च्या लग्नाच्या तयारीमध्ये गुंतलेल्या दिया मिर्झाने आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीपासून काही काळ विश्रांती घेतली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निर्माता साहिल संघा याच्यासह लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी अभिनयापेक्षा निर्माती म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करण्याचा आपला मानसही तिने बोलून दाखविला होता. आता लवकरच ती दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.
गेल्या महिन्यातच दियाने तिचा नवरा साहिल संघा याच्यासोबत चित्रपटनिर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल टाकले होते. विद्या बालनचा ‘बॉबी जासूस’ हा तिच्या ‘बॉर्न फ्री’ या निर्मिती संस्थेचा पहिलाच चित्रपट होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारसा गल्ला जमविला नसला, तरी दियाच्या वेगळा विषय निवडीच्या धाडसाचे आणि विद्या बालनच्या अभिनयाचे समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून कौतुक झाले होते. दियाने या आधी राजकुमार हिराणी यांच्यासोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटादरम्यान संवादलेखन आणि दिग्दर्शनाचे धडे गिरविले होते. तसेच चित्रपटनिर्मितीच्या विविध अंगांचा अभ्यासही केला होता. त्याचा उपयोग तिने तिच्या निर्मिर्ती संस्थेंतर्गत चित्रपटाची निर्मिती करताना करून घेतला होता. ‘बॉबी जासूस’ चित्रपटानंतर ती स्वत:च्या लग्नाच्या तयारीमध्ये गुंतून गेली होती, पण लवकरच ती दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे.
‘बॉबी जासूस’च्या निर्मिती वेळेसच तिने आपला चित्रपट दिग्दर्शन करण्याचा मानस बोलून दाखविला होता. पण त्या वेळेस तिने स्क्रिप्टच्या शोधात असल्याचे सांगितले होते. शहरी भागातील कॉलेजवयीन तरुणांच्याप्रेमकथेवर चित्रपटाची कथा आधारित असून त्यासाठी सध्याच्या बॉलीवूडच्या नव्या फळीतील कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. सध्या दिया या चित्रपटाच्या कथेवर काम करत असून या वर्षी जून महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Diya mirza in a director shoe