सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात प्रदर्शित झालेल्या ‘घरौंदा’ या चित्रपटातलं ‘दो दीवाने शहर में’ हे गाणं लोकप्रिय झालं तेव्हा त्यातल्या नायक-नायिकांची कथा-व्यथाच वेगळी होती. मुंबईसारख्या मोठ्या शहरातल्या प्रचंड गर्दीत आपलं अस्तित्व निर्माण करणं, अन्न-वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टींची पूर्तता करणं हेच त्या प्रेमी युगुलाचं स्वप्न होतं. आज त्याच गाण्याच्या ओळींचा धागा घेऊन मुंबई शहरातील आधुनिक प्रेमींची आणि त्यांच्या प्रेमाची कथा रंगवण्याचा प्रयत्न ‘दो दीवाने सहर में’ या रवी उद्यवार दिग्दर्शित चित्रपटात करण्यात आला आहे. अर्थात, गेल्या अर्धशतकांत चेहरामोहराच पालटलेल्या या शहरांत कदाचित आबोदाना आणि आशियाना शोधणं हे तितकं अवघड स्वप्न राहिलं नसावं… त्यामुळे या नव्या चित्रपटातल्या प्रेमकथेचा सूर वेगळा आहे.
‘दो दीवाने सहर में’ या चित्रपटाचं शीर्षक आणि त्याची कथा ही एका वेगळ्या अर्थाने बदललेल्या शहरातील बदललेल्या मानसिकतेचा परामर्श घेते वगैरे असं काही आहे का? तर इतक्या खोलात जाणारी ही प्रेमकथा नाही. तुलनेने वरवरची आणि तरीही मुंबईच्या एका मधल्या, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या, महत्त्वाकांक्षेच्या स्पर्धेत धावणार्या आणि स्वत:ला लोकांच्या अपेक्षांच्या कसोटीवर खरंखोटं ठरवण्याची सवय जडलेल्या तरुण पिढीची गोष्ट आहे, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. एका नामांकित फॅशन मासिकासाठी काम करणारी रोशनी आणि वॉशिंग मशीन विकणार्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला असलेल्या हुशार शशांकची प्रेमकथा या चित्रपटात आहे. दोघांनाही त्यांच्या आयुष्याचा जोडीदार सापडत नाही आहे. काम-घर दोन्ही गोष्टींमध्ये व्यवस्थित असलेल्या रोशनी आणि शशांकचे आईवडील आता जगरहाटीप्रमाणे आपल्या मुलांनी लग्न करून स्थिरस्थावर व्हावं यासाठी त्यांच्या मागे तगादा लावून आहेत. याच धडपडीत शशांक आणि रोशनी दोघंही पाहण्याच्या कार्यक्रमासाठी एकत्र येतात. स्मार्ट, सुंदर आणि स्पष्टवक्ती रोशनी शशांकला पहिल्याच नजरेत आवडून जाते. रोशनी मात्र लग्नाला नकार देते. स्वभावाने साध्या-सरळ स्वभावाच्या आणि देखण्या शशांकमध्ये एकच कमतरता आहे. त्याला ‘श’ उच्चारता येत नाही, त्यामुळे इंग्रजी असो वा देवनागरी सगळीकडे तोंडून येणारा ‘स’ घोळ करतो. रोशनीने आपल्याला नकार का दिला? याचं उत्तर मिळवण्यासाठी शशांक सतत तिला भेटण्याचा प्रयत्न करत राहतो. त्याचा हा प्रयत्न सुफळ संपूर्ण होतो का? या प्रेमकथेत नेमकी अडचण कोणती? शशांकच्या ‘स…’मध्ये आणि रोशनीच्या चेहर्यावर असलेल्या मोठ्या फ्रेमच्या चष्म्यामध्ये या प्रेमकथेतले अडथळे लपलेले आहेत. हे अडथळे पार करून प्रेमाची धाव हे दोघं कशी पूर्ण करतात, त्याची कथा म्हणजे हा चित्रपट.
या चित्रपटात नायक आणि नायिका यांच्याबरोबरीने दिसणारं शहर हेसुद्धा एक पात्र आहे. आणि त्यामुळे कधी नव्हे ते चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यांमध्येच मेट्रोमधून प्रवास करणारे शशांक आणि रोशनी पाहायला मिळतात. या दोन्ही पात्रांना दिलेले व्यवसाय आणि त्या अनुषंगाने शशांकच्या कॉर्पोरेट कार्यालयातली चमकधमक, तर रोशनीच्या फॅशन मासिकातला झगमगाट, स्पर्धा, पगार, ‘एक्स’ फॅक्टरवर काम करत राहणं, बॉसला खूश ठेवणं या सगळ्याची झलक दिसत राहते. या दोघांच्या घराची रचनाही वेगळी आहे. शशांक मूळचा मुंबईतला नाही. त्याचं उत्तरेकड़च्या कुठल्याशा राज्यात मोठं घर आहे, बाबांचा व्यवसाय आहे, पण तो मात्र मुंबईत बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो आहे, त्याचा आलिशान फ्लॅटही खूप सुंदर आहे. तेच रोशनीचा छोटेखानी, जुन्या पद्धतीचं बंगलावजा घर आहे. आतून नीटनेटकं असलेलं हे घर विशेषत: रोशनीच्या खोलीकडे जाणारा जिना आणि तिथली सजावट आकर्षक आहे. दिग्दर्शक रवी उद्यवार यांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की, या चित्रपटाची मांडणी करताना पात्रांच्या आजूबाजूला दिसणारं शहर, पात्रांच्या कपड्यांची, ते जिथे राहतायेत त्या वास्तूची, तिथल्या वस्तूंची रंगसंगती यावर अधिक भर दिला गेला आहे. ही गोष्ट तंतोतंत खरी आहे. त्यामुळे हा चित्रपट देखणा झाला आहे. त्याचं श्रेय सिनेमाटोग्राफर कौशल शाह याच्यासह वेशभूषाकार आणि कलादिग्दर्शक यांनाही द्यायला हवं.
चित्रपटात उत्तम कलाकारांची फौज आहे खरंतर… पण सगळा जोर सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर या जोडीवर आहे. सिद्धार्थचा चेहरा मुळातच सालस, देखणा आहे आणि त्याचा योग्य उपयोग शशांकच्या व्यक्तिरेखेसाठी दिग्दर्शकाने करून घेतला आहे. तेच मृणाल ठाकूरच्या बाबतीतही म्हणता येईल. तिच्या अभिनयातली आणि एकूणच कॅमेर्यासमोर असलेला तिचा सहज वावर, आत्मविश्वास आणि चेहर्यावर असलेलं निखळ हास्य यामुळे तीही रोशनीच्या भूमिकेत चपखल बसली आहे. बाकी या दोघांचं प्रेम जुळतंय, जुळतंय म्हणत लांबवण्यातच दिग्दर्शकाने बराच वेळ खर्ची घातला आहे. त्यामुळे ते खुलताना काही पाहण्याचं सुख प्रेक्षकांच्या नशिबी नाही. बाकी जॉय सेनगुप्ता, आयेशा रझा, इला अरुण, अंचित कौर, मोना आंबेगावकर, संदीपा धर अशी नामी जुनी-नवी कलावंत मंडळी यात असली, तरी त्यांना फार वाव मिळालेला नाही. प्रेमकथेला खरंतर उत्तम गाणी आणि संगीताची जोड आवश्यक असते. इथे चित्रपट संपल्यानंतर ऐकू येणारं जुनं ‘दो दीवाने शहर में’ हे भूपेंद्र सिंग आणि रुना लैला यांच्या आवाजातलं गाणंच मनात रुंजी घालतं. बाकी देखणी, शहरी प्रेमकथा या पलीकडे फारसं काही हाती लागत नाही.
दो दिवाने सहर में
दिग्दर्शक – रवी उदयवार कलाकार – सिद्धांत चतुर्वेदी, मृणाल ठाकूर, जॉय सेनगुप्ता, आयेशा रझा, इला अरुण, अंचित कौर, मोना आंबेदावकर, संदीपा धर.
