“भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे आणि…” गायक राहुल देशपांडेचं ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर

राहुल देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या प्रीमियरवेळी एक वक्तव्य केले होते.

“भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे आणि…” गायक राहुल देशपांडेचं ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर
photo rahul deshpande (instagram)

राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळत असतो. पण नुकत्याच त्यांनी केलेल्या लाल सिंग चढ्ढा चित्रपटाबद्दलच्या एका पोस्टमुळे त्यांना ट्रोलिंगचा चहूबाजूने सामना करावा लागत आहे. या ट्रोलिंगवर राहुल देशपांडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

राहुल देशपांडे यांनी नुकतीच लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली. हा चित्रपट पाहिल्यावर त्यांनी एक वक्तव्य केले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. त्या कमेंट्स पाहून त्यांनी काही वेळाने आणखी एक पोस्ट शेअर करत यावर स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा : आर. माधवनने रचला नवा विक्रम, सलमान खान, शाहरुख खान यांनाही टाकले मागे

राहुल देशपांडे काय म्हणाले?

“नमस्कार रसिक मित्रहो !! लाल सिंग चढ्ढा ह्या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेस मी व्यक्त केलेल्या विधानातून पूर्णतः अनपेक्षित संदेश जातोय, असं मला वाटतंय. त्या प्रिमीयरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून, मी त्या चित्रपटासाठी परिश्रम घेतलेल्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्वांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. ह्याचा अर्थ चित्रपटातील कलाकारांनी ह्यापूर्वी केलेल्या कुठल्याही कृतीचे वा त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असे मुळीच नाही.”

“आपणां सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनांतही प्रबळ आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करून घेऊ नये, अशी आपणां सर्वांकडे नम्र विनंती ! लोभ आहेच. वृद्धिंगत व्हावा !!” असे त्यांनी यात म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘मी वसंतराव’चा प्रवास खूप काही शिकविणारा – राहुल देशपांडे यांची भावना

दरम्यान लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रीमियर शोला राहुल देशपांडे यांनाही आमंत्रित केले गेले होते. हा चित्रपट पाहिल्यावर त्यांनी एक फोटो शेअर केला होता. त्यात राहुल देशपांडे, त्यांची पत्नी व आमिर खान दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी चित्रपटाचे आणि चित्रपटातील कलाकारांच्या कामाचे कौतुक केले. पण लालसिंग चढ्ढा या चित्रपटाला विरोध होत असल्याने राहुल देशपांडे यांनी चित्रपटाचे केलेले कौतुक नेटकऱ्यांना खटकले. त्यानंतर राहुल देशपांडे यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जेव्हा अक्षयच्या आई समोर नग्नावस्थेत आला नातेवाईक, ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी