प्रत्येक समाजाची एक सभ्यता, नैतिकता असते ती मुळापासून उखडून टाकत एरवी ग्लॅमरच्या वलयात हरवलेल्या चेहऱ्यांमागचा खरा चेहरा उलगडणारा शो म्हणून ‘बिग बॉस’ची ख्याती आहे. हिंदीत गेली काही वर्ष सातत्याने टीआरपीच्या गणितांत नंबर वन राहिलेला हा शो आपल्या मराठमोळ्या भाषेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसं पाहायला गेलं तर ‘बिग बॉस’ या संकल्पनेचे चाहते खूप आहेत. अनेकजण हा शो किती वाईट आहे… समाजासाठी हानिकारक आहे याच्या बाता मारत असतात. पण त्यातलेच अधिकहून लोक हा शो नित्यनियमाने पाहतात. मुळात हा शो चांगला की वाईट हा प्रश्नच नाही. एखादी मालिका, रिअॅलिटी शो लोकांना किती आवडतो हे त्याच्या टीआरपीवरुन स्पष्टच होतं. त्यामुळे तो शो चांगला आहे की वाईट हा वाद होऊच शकत नाही.

‘बिग बॉस’ मराठी सुरू झालं तेव्हा पत्रकार परिषदेत वाहिनीने ‘हिंदी बिग बॉस आणि मराठी ‘बिग बॉस’ची तुलना करु नका,’ असं ठाम उत्तर पत्रकारांच्या प्रश्नांना दिलं होतं. पण आता ‘बिग बॉस’ मराठीचे एपिसोड पाहता तुलना तर सोडाच पण ‘बिग बॉस’ हिंदीच्या ११ व्या सिझनची अक्षरशः कॉपीच वाटते. हिंदीच्या ११ व्या सिझनमध्ये जे टास्क देण्यात आले होते त्यातला प्रत्येक टास्क हा मराठीमध्ये जशाच्या तसा वापरलेला दिसतो. मराठीमध्ये काही वेगळं करू पाहणाऱ्यांना स्वतःच्या कल्पकतेतून एखादा टास्कही स्वतंत्रपणे तयार करता येऊ नये? तिथंही त्यांना कॉपीच करण्याची गरज का भासावी? असे प्रश्न सतत हा शो बघताना मनात येतात. या टीमला ‘क्रिएटिव्ह’ म्हणावं की नाही, असाच प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.

आतापर्यंत मराठी बिग बॉसमध्ये जे टास्क झाले मग ते अंडं वाचवण्याचं असो, पाळणा घराचं असो, बाबा गाडीचं असो किंवा नुकताच सुरू झालेल्या फ्रिझ- रिलीझचा टास्क असो हे प्रत्येक टास्क ‘बिग बॉस’ हिंदीच्या ११ व्या पर्वातला आहे. एकीकडे ‘धडक’च्या माध्यमातून मराठीची स्टोरी लाइन जशीच्या तशी उचललेली दिसत असताना दुसरीकडे ‘बिग बॉस’सारख्या मराठीतील पहिल्या वहिल्या प्रयोगात केलेली नक्कल नक्कीच खटकते.

मराठी प्रेक्षकांना मराठमोळंपण जपणाऱ्या गोष्टी पाहायला नक्कीच आवडल्या असत्या यात शंका नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी मंगळागौरीचे खेळ, लगोरी किंवा अगदी गोट्यांचा खेळ किंवा भौरा किंवा विटी दांडू असे खेळ अनोख्या पद्धतीने मांडता आलं असतं. आता यामध्ये अंग मेहनत किंवा पळापळ नाही असा आक्षेप घेतला तरी या खेळांच्या नियमांमध्ये ट्विस्ट आणून स्पर्धकांना आणि प्रेक्षकांनाही मज्जा घेता आली असती. मुळात हरवलेल्या मराठमोळ्या गोष्टी या निमित्ताने सापडल्या असत्या किंवा पुन्हा चर्चेत आल्या असत्या असं नाही का वाटतं तुम्हाला? मराठीत एक म्हण आहे की ‘पकडला जातो तो चोर’… त्यामुळे चोरी करतच आहात तर ती बेमालूमपणे करावी… पकडले जाऊ नये.

– मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@loksatta.com