Diljit Dosanjh Controversy and Abhijeet Deepke Apology: ‘आम्ही पंजाबी आहोत आणि पंजाबी लोकांना कसं लढावं हे कोणी शिकवू नये,’ अशा शब्दांत प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने नवी दिल्लीतील आपल्या कॉन्सर्टमधून सडेतोड प्रत्युत्तर दिले. नीट पेपरफुटीच्या आंदोलनावरून आणि ‘सतलज’ चित्रपटावरून करण्यात आलेल्या टीकेला दिलजीतने जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरील कॉन्सर्टमधून थेट उत्तर दिले. दिलजीतच्या या विधानानंतर त्याच्यावर निशाणा साधणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत जाहीर माफी मागितली असून “लहान भाऊ समजून विषय सोडून द्या,” अशी विनंती केली आहे.
दिलजीत दोसांझ काय म्हणाला?
शुक्रवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित मैफिलीदरम्यान दिलजीतने कोणत्याही पक्षाचे वा व्यक्तीचे नाव न घेता आपल्यावरील टीकेचा समाचार घेतला. उपस्थितांशी संवाद साधताना तो म्हणाला, “मी एक कलाकार आहे, त्यामुळे मी तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो. मी शांत आहे, तर मला शांतच राहू द्या. माझा तुम्हा सर्वांना पाठिंबा आहे; पण पंजाबी लोकांना कसे लढायचे हे शिकवू नका.”
आपल्या वादग्रस्त ठरलेल्या चित्रपटाचा उल्लेख करत दिलजीत पुढे म्हणाला, “ज्या चित्रपटाची तुम्ही व्यासपीठावरून खिल्ली उडवत आहात, तो जसवंत सिंह खालरा यांच्यावरील चित्रपट आहे. त्या चित्रपटासाठी आम्ही प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला. कोणी आमचा द्वेष करत असला तरी चालेल, पण मी मात्र सर्वांवर प्रेमच करत राहीन.”
अभिजीत दीपके यांची दिलगिरी
दिलजीतच्या या वक्तव्यानंतर अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट लिहून जाहीर माफी मागितली. त्यांनी लिहिले, “पाजी, जून महिन्यात जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो, तेव्हा तुमच्या विधानामुळे माझे मन दुखावले होते. तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणताही वैयक्तिक आकस नव्हता. तुम्ही नेहमीच महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका घेता, अशीच माझी धारणा होती. मी तुमचा पूर्वीही चाहता होतो आणि आजही आहे. मे महिन्यात भारतात परतण्यापूर्वी मी शिकागोमधील तुमच्या कॉन्सर्टला उपस्थित राहिलो होतो.”
दिलजीतचे कौतुक करताना दीपके यांनी पुढे नमूद केले, “तुम्ही ज्या धाडसाने भारतीय संस्कृती जागतिक स्तरावर नेली आहे, त्याबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. एका मतभेदामुळे किंवा गैरसमजामुळे हा आदर कमी होणार नाही. बाकी पाजी, लहान भाऊ समजून आता या विषयावर पडदा टाका (मिट्टी पाओ).”
वादाची पार्श्वभूमी काय?
हा संपूर्ण वाद जून महिन्यातील नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आंदोलनाशी संबंधित आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना, एका इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान चाहत्याने दिलजीतला या आंदोलनात सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर दिलजीतने, “मला या सगळ्यापासून दूर ठेवा. मी केवळ एक कलाकार आहे, राजकारणी नाही,” अशी भूमिका घेतली होती. तसेच गुरू ग्रंथसाहिबमधील पंक्तींचा संदर्भ देत, “जगात सगळेच काही योग्य असू शकत नाही,” असे म्हटले होते.
यावरून २०२० मधील शेतकरी आंदोलनात सक्रिय पाठिंबा देणाऱ्या दिलजीतने विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून अंतर का ठेवले? असा प्रश्न उपस्थित करत अभिजीत दीपके यांनी त्याच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला होता. तसेच मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या संघर्षावर आधारित ‘सतलज’ या त्याच्या चित्रपटाचा संदर्भ देत त्याच्यावर उपरोधिक टीका केली होती.
दरम्यान, सेन्सॉर बोर्डाच्या अडचणींनंतर ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला ‘सतलज’ चित्रपट अवघ्या दोन दिवसांत सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारच्या निर्देशानंतर काढून टाकण्यात आला होता. याच चित्रपटाची खिल्ली उडवल्याबद्दल दिलजीतने आता दिल्लीतील व्यासपीठावरून थेट नाराजी व्यक्त केली आहे.
