हल्ली हॉरर सीरियल म्हटलं तर अनेक जण विविध मालिकांची नावं घेतील. कुणी ओटीटीवरची उदाहरणं देईल, कुणी हॉरर शो, आहट अशी नावं घेतील. पण ३७ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक सीरियल प्रसारित व्हायची. ही मालिका रात्री ११ वाजता लागायची ती सुरु झाली की भल्या भल्यांची भीतीने गाळण उडायची. आम्ही आज तुम्हाला त्याच मालिकेबाबत सांगणार आहोत.
दूरदर्शनवरची पहिली भीतीदायक मालिका
१९८० चं दशक होतं, दूरदर्शनवर ज्या मालिका लागायच्या त्या मर्यादित भागांच्या असायच्या. पण त्यांचा परिणाम गहिरा होता. १९८९ मध्ये अशीच एक मालिका दूरदर्शनवर लागायची. भारतीय दूरदर्शन विश्वातली ती पहिली हॉरर मालिका होती. ज्या मालिकेने अबालवृद्धांची झोप उडवली होती. होय तुम्ही ही मालिका जर पाहिली असेल तर तुम्ही बरोबर ओळखलंय. किले का रहस्य हीच ती मालिका होती. या मालिकेचा भाग आठवड्यातून एकदा लागायचा. रात्री ११ वाजता या मालिकेचा भाग लागायचा आणि संपताना एक प्रश्न मनात असायचा की पुढच्या भागात काय घडेल? किले का रहस्य ही हॉरर सीरियल विश्वातली पहिली हॉरर मालिका मानली जाते. शिवाय ही मालिका इतकी दहशत पसरवणारी होती की ती पाहताना घराघरांमध्ये सामसूम वातावरण असायचं. कुणी चॅनल बदलण्याचीही हिंमत करत नसे. एनटीडीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
किले का रहस्यची कथा किल्ल्याभोवती फिरणारी
‘किले का रहस्य’ ही मालिका एका रहस्यमयी किल्ल्याच्या भोवती फिरणारी होती. ये है अभिषक्त किला असं टायटल साँग होतं. रक्ताळलेला एक हात किल्ल्याच्या बुरुजावर उमटत असे. तसंच जो कुणी त्या किल्ल्यात जाई त्याच्या पाठीवर तो हात उमटलेला दिसत असे. त्यानंतर ज्याच्या पाठीवर हात उमटला आहे त्याचा मृत्यू होत असे अशी काहीशी कथा असलेली ही मालिका होती.
पियूष मिश्रा मुख्य भूमिकेत
किले का रहस्य या मालिकेत अभिनेता आणि कवी पियूष मिश्रा मुख्य भूमिकेत दिसला होता. तसंच वीरेंद्र सक्सेनाही या सीरियलमध्ये होता. या मालिकेचा ट्विस्ट असा होता ज्याची आपण प्रेक्षक म्हणून कल्पनाही करु सकत नाही. आजच्या घडीला व्हिएफएक्सचा वापर करुन तंत्रज्ञानाचा वापर करुन हॉरर सीरिज, मालिका, चित्रपट तयार केले जातात. मात्र किले का रहस्य ही मालिका आजही तिचा अपेक्षित परिणाम प्रेक्षकांच्या मनात राखून आहे. त्या काळात ज्यांनी ही मालिका पाहिली आहे त्या मालिकेची आठवण आली तर त्यांच्या अंगावर आजही काटा येईल यात शंका नाही.
