छोट्या पडद्यावरील मालिकेतील भूमिकांमधून आणि ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकाची लेखिका, अभिनेत्री म्हणून डॉ. श्वेता पेंडसे हिचा चेहरा घरोघरी परिचयाचा आहे. सध्या रंगभूमीवर ‘३८ कृष्ण व्हिला’ आणि ‘नकळत सारे घडले’ या दोन नाटकांतून श्वेता काम करत असून लवकरच ‘अ परफेक्ट मर्डर’ या विजय केंकरे दिग्दर्शित नाटकात इन्स्पेक्टर घारगेंच्या भूमिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या नाटकाचा ३४५ वा प्रयोग ऑपेरा हाऊसमध्ये रंगणार आहे. यानिमित्ताने, पुनरागमनापासून ते नाटकाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद अशा विविध मुद्द्यांवर श्वेताने मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकात श्वेताने याआधी मीरा ही व्यक्तिरेखा साकारली होती. सहा महिने या नाटकात काम केल्यानंतर वैयक्तिक कारणामुळे नाटकातूनच नव्हे तर अभिनय कारकीर्दीपासूनही काही काळ ती दूर होती. आता पुन्हा एकदा या नाटकात मीराच्या नव्हे तर मूळ पुरुष पात्र म्हणून लिहिल्या गेलेल्या इन्स्पेक्टर घारगे या व्यक्तिरेखेतून ती लोकांसमोर येणार आहे. मूळ पुरुष पात्र बदलून स्त्री पात्र म्हणून नव्याने साकारण्याच्या या प्रयोगात्मक संधीविषयी बोलताना मुळातच हे नाटक तिच्यासाठी खूप खास असल्याचं तिने सांगितलं. ‘अ परफेक्ट मर्डर’ हे माझं दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याबरोबर पहिलं नाटक होतं. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी, बदाम राजा प्रॉडक्शनसारखी निर्मितीसंस्था, पुष्कर श्रोत्री, सतीश राजवाडे, अभिजीत केळकर, सुबोध पंडे यांसारखे उत्तम कलाकार, नीरज शिरवईकरसारखा समवयस्क लेखक हे सगळं इतकं छान जुळून आलं होतं. त्यामुळे या नाटकातील मीराची भूमिका करणं ही प्रक्रियाच खूप सुंदर आणि शिकवणारी होती. मी नाटक सोडल्यापासून ती भूमिका अभिनेत्री प्रिया मराठे करते आहे, असं श्वेताने सांगितलं. खरंतर एका उत्तम कलाकाराकडे ही भूमिका सोपवल्यानंतर आता पुन्हा आपण त्या भूमिकेत शिरणार नाही हे ठाम ठरवून आपण पूर्णपणे या नाटकाला विराम दिला होता, असं सांगणाऱ्या श्वेताने हे नाटक नव्याने आपल्याकडे येताना मात्र एक वेगळं आव्हान घेऊन आल्याचं स्पष्ट केलं. हेही वाचा >>>छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकात पुनरागमन! खुनाचा कट उलगडण्यासाठी खाकी वर्दीत आपण आधी केलेल्या नाटकात जुन्या भूमिकेऐवजी प्रचलित पुरुष व्यक्तिरेखा बदलून स्त्री व्यक्तिरेखा साकारत पुनरागमन करण्याची संधी क्वचितच कुणाच्या वाट्याला आली असेल. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हा आव्हानात्मक प्रयोग करण्याची संधी आपल्याला दिली हीच भाग्याची, आनंदाची गोष्ट असल्याची भावना तिने व्यक्त केली. या नव्या प्रयोगासाठी केलेल्या तयारीविषयीही तिने भरभरून माहिती दिली. ‘शिरवईकरांनी लिहिलेल्या मूळ नाटकात इन्स्पेक्टर घारगेचं पात्र स्त्री पात्र म्हणून बदलताना माझ्या तोंडी वऱ्हाडी बोलीतील संवाद असावेत, असं ठरलं. त्याचं कारण ही भाषा मला माहिती आहे, माझ्या तोंडून वऱ्हाडी भाषा केंकरे यांनी याआधी ऐकलेली होती. आणि मूळ भूमिकेपेक्षा स्त्री पात्रं वेगळं असावं यासाठी भाषा, लहेजा असे बदल केल्याने आता नव्याने या भूमिकेची जी रंगावृत्ती आहे ती मी स्वत: केलेली आहे’, असं श्वेताने सांगितलं. ‘पोलिसांचं निरीक्षण करून भूमिका करण्याएवढा वेळ हातात नव्हता, केवळ दहा दिवसांतील तालमीत ही भूमिका बसवली आहे, असं तिने नमूद केलं.