नीलेश अडसूळ

जुने जाऊ द्या मरणा लागोनी.. म्हणत करोनाकाळाकडे पाठ करून पुढचा पल्ला गाठण्यासाठी सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. असेच प्रयत्न नाटय़सृष्टीतही सुरू असून मोठय़ा कष्टाने आणि जोखमीने पुन्हा एकदा खेळ रंगवण्यात रंगकर्मी दंग झाले आहेत. नाटकाचा पडदा उघडल्यानंतर करोनाकाळात ठप्प झालेल्या कलाकृती रंगभूमीवर येतच आहेत. पण आशय – विषयाची नवता घेऊन नवी नाटकंही धाडसाने पुढे येत आहेत, हे विशेष. त्याच नव्या विषयांचा हा धांडोळा..

नवी नाटकं आणणे हे धाडसच म्हणावे लागेल. कारण एकीकडे अजूनही करोनाची डोक्यावर असलेली टांगती तलवार, प्रेक्षकांच्या प्रतिसादाबाबत अनिश्चिती, नाटक आवडेल का, चालेल का? असे प्रश्न आणि महत्त्वाचे म्हणजे आर्थिक जोखीम. तरीही काही निर्माते पुढे येऊन नव्या लेखक-दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत नवे विषय रसिक रंजनासाठी आणत आहेत. विनोदी, कौटुंबिक, वैचारिक असे विविध आयाम असलेली सहा ते सात नवी नाटकं सध्या येऊ घातली आहेत.

विनोदाच्या आतिषबाजीने घराघरातच नाही तर मनामनात पोहोचलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी निर्मितीत पाऊल ठेवले आहेत. ‘कुर्र्र्र’ हे त्यांचे पहिले नाटक. नुकताच या नाटकाचा शुभारंभ ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झाला असून पहिल्याच प्रयोगाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाला. विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे या चार दमदार कलाकारांची नावे समोर येतात तेव्हाच आपण खळखळून हसणार याची कल्पना येते. पण नाटकात केवळ विनोद नसून त्यातून एक विचार पोहोचवण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी केला आहे. ‘हा मातृत्वाचा विषय आहे. मातृत्व हे किती सुंदर आहे याची अनुभूती या नाटकातून येईल. ‘कुर्र्र्र’ या नावातच सारं काही दडलंय. आपल्याकडे बाळाच्या बारशात हा उच्चार केला जातो. या नाटकात नवरा – बायको, जावई – सासरा यांचे नातेसंबंधही अधोरेखित केले आहेत. ही गोष्ट प्रेक्षकांना भावणारी आहे,’असे विशाखा सांगतात.  

नव्या नाटकांमध्ये विनोदाचा टक्का काहीसा वर आहे. ‘यदा कदाचित’ या नाटकातून आणि विविध लोकनाटय़ातून महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या संतोष पवार यांनी ‘हौस माझी पुरवा’ हे नवे नाटक रंगभूमीवर आणले आहे. ‘नाटकाची संकल्पना आमचे निर्माते अजय विचारे यांनी मांडली. त्यानंतर हा विषय पुढे लिहिता झालो. आजवर हा विषय रंगभूमीवर आलेला नाही. नाटकाचे नाव जरी लोकनाटय़ाशी साधर्म्य साधणारे असले तरी हे नाटक पूर्णत: वेगळे आहे. प्रेक्षकांची हौस या नाटकातून पुरवली जाईल एवढे मात्र नक्की. मी, अंशुमन विचारे आणि इतर कलाकार प्रेक्षकांना भरभरून हसवतो खरे पण डोकं ताळय़ावर आणणरा हा विनोद आहे,’ असे संतोष पवार म्हणाले.

निर्माते राहुल भंडारे यांनीही दोन नव्या नाटकांची घोषणा केली आहे. ‘चार्ली’ आणि ‘वन्स मोअर तात्या’ अशी या नाटकांची नावे असून दोन्ही कलाकृती विनोदाचा बार उडवणाऱ्या आहेत. ‘वन्स मोअर तात्या’ हे मालवणी धुमशान नाटक असून प्रेक्षकांना अस्सल मालवणच्या गजाली पाहायला मिळणार आहेत. अन्न वस्त्र निवाऱ्यानंतर कला ही कोकणवासीयांची चौथी आणि महत्त्वाची गरज आहे. तीच गरज भागवण्यासाठी म्हणजे नाटक बसवण्यासाठी गावातील तरुण मंडळी एकत्र येतात. हे नाटक बसवताना ‘तात्या’ या पोरांना तिथल्या वास्तवाची जाणीव करून देतो. मिलिंद पेडणेकर स्वत: प्रमुख भूमिकेत असून त्यांनीच हे नाटक लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे,’ अशी माहिती भंडारे यांनी दिली

तर अरिवद जगताप लिखित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘चार्ली’ या नाटकविषयीही ते भरभरून बोलले. ‘चार्लीने आपल्याला कायम हसतमुख राहण्याची प्रेरणा दिली आहे. असाच एक चार्ली या नाटकात आहे, जो छोटय़ामोठय़ा कार्यक्रमात लोकांचे मनोरंजन करून आपली उपजीविका करतो आहे. ही त्याची आयुष्याची गोष्ट, व्यथा आहे पण ती विनोदाच्या अंगाने मांडली आहे. त्यामुळे हास्य विनोद यासोबत एक ‘विचार’ चार्ली प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे. या नाटकात भाऊ कदम प्रमुख भूमिकेत आहेत,’ अशा शब्दात त्यांनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये कायमच नातेसंबंधांना प्राधान्य देण्यात आले आहे. काळासोबत चालणारी, काळाच्या पुढची अशी विविध नाती आजवर प्रेक्षकांनी अनुभवली आहेत. असाच नव्या जुन्याचा मेळ साधणारे ‘मी स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक येऊ घातले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, विजय पटवर्धन, रश्मी अनपट, सुयश टिळक असे लोकप्रिय कलाकार या नाटकात आहेत. या नाटकात ‘मंजूषा’ हे पात्र साकारणाऱ्या निवेदिता सराफ सांगतात, ‘दोन पिढय़ा आणि त्यांचा नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन या नाटकातून प्रेक्षकांपुढे मांडला आहे. दोन्ही पिढय़ांनी एकमेकांकडून काहीतरी शिकले पाहिजे, त्या त्या पिढीचे विचार स्वीकारले पाहिजेत. तुमच्याआमच्या आयुष्याचा भाग असलेले हे नाटक असून आदित्य मोडक या नव्या लेखकाने ते लिहिले आहे. दिग्दर्शक नितीश पाटणकरही नव्या दमाचा दिग्दर्शक आहे. मी साकारत असलेली भूमिका माझ्या विचारांच्या पलीकडची आहे. म्हणूनच ही भूमिका मी आव्हान म्हणून स्वीकारली. विशेष म्हणजे निर्माते चंद्रकांत लोकरे यांनी या नाटकाला खरी सकारात्मकता दिली आहे.’

लेखक दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांच्याही दोन कलाकृती लवकरच प्रेक्षक भेटीला येतील. ‘प्लॅटोनिक लव्ह’ आणि ‘फॅमिली नंबर वन’ अशी नाटकांची नावे आहेत. ‘फॅमिली नंबर वन’ या नाटकात नयना आपटे प्रमुख भूमिकेत आहेत. तरुण पिढीमध्ये प्रेम, लग्न, शरीर संबंध यांच्या बदलत चाललेल्या संकल्पना आणि कुटुंबाच्या असलेल्या अपेक्षा याचे वास्तव मांडणारे हे नाटक आहे. हे नाटक शहरापासून ते गावखेडय़ापर्यंत कुठेही सादर करता येईल अशी त्याची रचना करण्यात आली असल्याचे म्हसवेकर यांनी सांगितले. तर ‘प्लेटोनिक लव्ह’ या नाटकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे नाटक एका विमानतळावर अडकलेल्या अनोळखी स्त्री पुरुषांतील नाते सांगते. त्या विमानतळावर त्यांची भाषा कळणारे, त्यांच्या गप्पा ऐकणारे त्यांच्या पलीकडे कुणीही नाही. अशा जागी आयुष्याचा जमाखर्च मांडताना ते एकमेकांचे कसे मित्र होतात,  त्यांच्यात नेमके काय घडते हे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे असेल,’ असेही ते म्हणाले.

‘गेट वेल सून’ या नाटकानंतर बऱ्याच अवधीने प्रशांत दळवी यांनी लिहिलेली ‘संज्या छाया’ ही एक दर्जेदार कलाकृती आहे. नाटकाची प्रक्रिया सुरू झाली असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात ते रंगभूमीवर येईल,’ अशी माहिती नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली. नाटकाचा विषय आणि कलाकार याबाबतचे तपशील मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले.

नव्या वर्षांत इतरही अनेक नाटय़कृती प्रेक्षकभेटीला येणार आहेत. त्यासाठी लेखक, दिग्दर्शक झाडून तयारीला लागले आहेत. नाटकाला पोषक वातावरण मिळाले तर साधारण येत्या दोन ते तीन महिन्यात आणखी चार ते पाच नाटकं रंगभूमीवर येतील. जुन्या नाटकांसह नव्या नाटकांच्या नांदीने तेजोमय झालेल्या या रंगभूमीला आता कसलेही गालबोट न लागो हीच कामना..