राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता आयुषमान खुराना नेहमीच चौकटीबाहेरचे विषय हाताळण्यास प्राधान्य देतो. ‘विकी डोनर’, ‘अंधाधून’, ‘शुभमंगल सावधान’, ‘बधाई हो’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याचं दमदार अभिनय कौशल्य पाहायला मिळालं. आता ‘ड्रीम गर्ल’च्या निमित्ताने पुन्हा एकदा आयुषमानचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजच्या डिजिटल विश्वात एकमेकांशी जरी संपर्क वाढला असला तरी वैयक्तिक आयुष्यात आपण किती एकटे आहोत हे या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारीसारखा मुद्दाही हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे.

छोट्याशा शहरात राहणारा कर्मवीर (आयुषमान खुराना) लहानपणापासूनच मुलींचा आवाज काढण्यात कुशल असतो. त्याचे वडील दिलजीत (अनू कपूर) मरणोत्तर पूजेच्या सामानाची विक्री करत असतात. बेरोजगारीने त्रस्त असलेल्या कर्मवीरला नाटकातील राधा किंवा सीता या भूमिका साकारायला मिळतात. त्यातूनच पुढे त्याला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळते. कॉल सेंटरद्वारे पूजा या नावाखाली तो मुलीच्या आवाजात लोकांशी संवाद साधत असतो. हळूहळू पूजा शहरात प्रसिद्ध होऊ लागते आणि तिथून मूळ कथेला सुरुवात होते. पूजाच्या प्रेमात बरेचजण वेडे होतात आणि त्यापुढे आयुषमानला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

दिग्दर्शक म्हणून राज शांडिल्य यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाच्या कथेवर त्यांची मजबूत पकड पाहायला मिळते. अभिनयाच्या बाबतीत आयुषमानने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. अनू कपूर यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाला चार चाँद लागले आहेत. एकंदरीत प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे.