|| रेश्मा राईकवार

लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात… हे अजूनही आपल्याकडे पदोपदी ऐकवलं जातं. विवाह ठरवताना किं वा जुळवताना के वळ लग्नाळू वर – वधूच नव्हे तर त्यांच्या घरच्यांच्या मनातही कु ठल्यातरी कोपऱ्यात ही बाब घर करून असते. स्वर्गात बांधल्या गेलेल्या या गाठी इथे प्रत्यक्षात जुळवताना नाकी नऊ येतात आणि योगायोगाने त्या गाठी बांधल्या गेल्या तरी त्या निभावण्याची कसरत ज्याची त्यालाच करावी लागते. एका लग्नाची कु ठलीही गोष्ट असली तरी त्यात येणाऱ्या अडचणी, पहिले प्रेमाचे चार दिवस सरल्यानंतर मनाशी मन जोडून ठेवताना उडणारी धांदल, एकमेकांना समजून घेताना होणारी दमछाक या सगळ्या गोष्टी प्रत्येकालाच या ना त्या प्रकारे अनुभवाव्या लागतात. ‘मीनाक्षी सुंदरेश्वार’ चित्रपटातही लग्नाची हीच गोष्ट सांगताना नवे काहीतरी सांगितल्याचा भासच निर्माण के ला गेला आहे.

‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘मीनाक्षी सुंदरेश्वार’ या विवेक सोनी दिग्दर्शित चित्रपटात मीनाक्षी आणि सुंदर या दोघांची लग्नकथा पाहायला मिळते. आजच्या पिढीचे प्रतिनिधी असलेले मीनाक्षी आणि सुंदर दोघेही हुशार आणि काळाचे भान असलेले आहेत. मदुराईचे सुप्रसिद्ध मीनाक्षी सुंदरेश्वार मंदिर आणि एकमेकांशी काहीही संबंध नसताना योगायोगाने एकत्र आलेले मीनाक्षी – सुंदर यांचा लग्नयोग दिग्दर्शकाने या चित्रपटासाठी जुळवून आणला आहे. मीनाक्षी आणि सुंदर दोघेही सुशिक्षित आहेत. सुंदरचे शांत, लाघवी आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्व मीनाक्षीला आवडते. तर मीनाक्षीला पाहताक्षणी प्रेमात पडलेल्या सुंदरलाही तिचा चुळबुळा स्वभाव प्रचंड आवडतो. घरच्यांच्या संमतीने आणि मीनाक्षी सुंदरेश्वार या जोडीला एकत्र यायलाच हवं या योगायोगातून यांची लग्नाची गाठ बांधली जाते. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री इतके  दिवस नोकरीच्या शोधात असलेल्या सुंदरला बंगळूरुच्या एका कं पनीत नोकरीची संधी चालून येते. लग्नानंतर मनाने एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी, मात्र नेमक्या त्याच वेळी सुंदर नोकरीसाठी बंगळूरुत दाखल होतो. एकीकडे नोकरीत स्थिरावण्याची धडपड आणि दुसरीकडे लांब राहून नातं जपण्याची कसरत या दोन्ही जबाबदाऱ्या सुंदरवर येऊन पडतात. तर सुंदरच्या अनुपस्थितीत त्याच्या घरच्यांबरोबर जुळवून घेत पुन्हा स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी आग्रही असलेली मीनाक्षीही आपल्या परीने यावर उत्तर शोधत राहते. एका क्षणी परिस्थितीने निर्माण के लेलं अंतर या दोघांच्याही नात्यावर परिणाम करतं, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे.

विवेक सोनींचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असला तरी त्यांनी याआधी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम के लेले असल्याने तांत्रिक बाबतीत चित्रपट कु ठेही कमी पडलेला नाही. त्यातही लग्नाच्या या गोष्टीला दाक्षिणात्य संस्कृ तीची जोड देत नवेपणा देण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्नही काही प्रमाणात यशस्वी ठरला आहे. पूर्णपणे तमिळ कु टुंबांची पाश्र्वाभूमी असल्याने अजूनही पारंपरिकपणा जपून असलेली जुन्या पद्धतीची घरं, तिथली संस्कृती, राहणीमान, खाण्यापिण्याच्या पद्धती अशा कितीतरी गोष्टी नव्याने या चित्रपटात आल्या आहेत. सुंदर निसर्गाबरोबरच साड्यांपासून मोठमोठ्या देवघरातील देवांच्या तसबिरी आणि फु लांपर्यंत तिथली रंगीबेरंगी संस्कृतीही प्रत्येक फ्रे ममधून झळकते. त्यातही बदल म्हणून नायक सुंदरच्या कामाच्या निमित्ताने कॉर्पोरेट जगत आणि सतत नवनवे अ‍ॅप घडवण्यासाठी धडपडणाऱ्या अभियंत्यांच्या विश्वात डोकावण्याची संधीही दिग्दर्शकाने दिली आहे. मात्र हे सगळं नवंपण जोड म्हणून आलेलं आहे, त्याने मूळ कथेत फार काही भर घातलेली नाही किं वा वेगळेपणाही साधलेला नाही.

भारतीय कु टुंब व्यवस्था, जुन्या वळणाची माणसे आणि नव्या पिढीचे नवे विचार यातील विसंवाद लक्षात घेऊनही नाती जपण्याचा असोशीने प्रयत्न के ला जातो. कधीकधी इथेही सूर बिघडतात, या सगळ्या गोष्टी दिग्दर्शकाने अधोरेखित के ल्या आहेत. मात्र लाँग डिस्टन्स रिलेशनशीप हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे हे लक्षात घेतलं तर त्यादृष्टीने चित्रपटात नवं काहीच सापडत नाही. नाही म्हणता या परिस्थितीचा वापर क रून घेत नायक एक नवीन अ‍ॅप विकसित करतो अर्थात तेही अर्धवटच आपल्यापर्यंत पोहोचतं. कारण नाही म्हटलं तरी एकमेकांपासून दूर जाणारे प्रेमी एवढ्याचवर विषय पुन्हा पुन्हा येऊन थांबतो. अभिनयाच्या बाबतीत विचार करता चित्रपटाची मुख्य जोडी फारशी प्रभावी ठरलेली नाही. मीनाक्षीच्या भूमिके त सान्या मल्होत्रा चपखल बसली आहे, अर्थात तिच्या आधीच्या काही भूमिकाही थोड्याफार अशाच पद्धतीच्या होत्या. त्या तुलनेत अभिमन्यू दासानी याचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यातही सुंदरच्या व्यक्तिरेखेलाच इतक्या मर्यादा आहेत की अभिमन्यूला एका मर्यादेनंतर काही करण्यासाठी फार वाव नाही. अनेकदा हा के वळ मीनाक्षीचा चित्रपट ठरतो, चित्रपटाचा शेवटही इतक्या झटपट गुंडाळण्यात आला आहे की कशासाठी हा अट्टहास हेच कळेनासे होते. नवेपणा आणण्यासाठी जोडण्यात आलेल्या गोष्टी अगदी मीनाक्षीचं रजनी फॅ न असणं हेही जोडकाम असल्याचं जाणवत राहतं. त्यामुळेच की काय नावीन्याचा के वळ भास असलेला ‘मीनाक्षी सुंदरेश्वार’ तितका सुंदर वाटत नाही.

मीनाक्षी सुंदरेश्वार

दिग्दर्शक – विवेक सोनी

कलाकार – सान्या मल्होत्रा, अभिमन्यू दासानी, शिवकु मार सुब्रमण्यम, सोनाली सचदेव, पुर्णेंदू भट्टाचार्य.