जागतिक पातळीवरील सिनेरसिकांच्या मनात रहस्यपटांचे एक वेगळे स्थान आहे. कित्येकदा समाजात घडणार्या काही हृदयस्पर्शी घटनाच सिनेमाचे रूप घेऊन रुपेरी पडद्यावर दाखवल्या जातात, पण त्यातील रहस्य कायम रसिकांची उत्सुकता वाढवत राहते. मराठी चित्रपटसृष्टीला अशा रहस्यपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. ‘दृश्य-अदृश्य’ हा चित्रपट याच वाटेवरील अतिशय महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. ५६ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) कौतुकाची थाप मिळवणारा ‘दृश्य-अदृश्य’ हा चित्रपट १९ जून रोजी महाराष्ट्रातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘सुभेदार’, ‘शेर शिवराय’ आणि ‘सापळा’ चित्रपटांच्या निर्मात्यांची भेट असलेल्या ‘दृश्य-अदृश्य’ या रहस्यमय चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
रहस्यमय कथा मराठीत मोठ्या संख्येने पाहायला मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘दृश्य-अदृश्य’ची रहस्यमय कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असेल, असं या चित्रपटाचा ट्रेलर पाहून लक्षात येतं. नवर्याबरोबर झालेला आर्थिक व्यवहारांबद्दलचा संवाद आणि त्यानंतर दुसर्याच दिवशी आपल्या मुलीचे गायब होणे या प्रकाराने गोंधळलेल्या आणि सगळ्या प्रकरणाचा माग घेणार्या तन्वीची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
पोलिसांचा तपास, कोण खरं बोलतंय-कोण जाळं विणतंय ही गुंतागुंत आणि भास-आभासाचा हा खेळ तन्वीबरोबर खेळला जातो आहे की तिनेच हा खेळ रचला आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिलिंद लेले दिग्दर्शित ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटातून मिळणार आहे.
मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपटात तन्वीच्या भूमिकेत दिसणार आहे. पूजाने साकारलेली तन्वी आजवरच्या तिच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. तिच्याबरोबर अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी, केया इंगळे आदी मराठीतील आघाडीचे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत.
अमोल साळुंके यांनी छायालेखन केले असून, संकलन सचिन वाघ यांनी केले आहे. रंगभूषा महेश बराटे यांनी, तर वेशभूषा कीर्ती जंगम-जोशी यांनी केली आहे. गीतकार वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या गीतरचनांना संगीतकार आशीष मुजुमदार, देवदत्त बाजी यांनी संगीतसाज चढवला आहे, तर गायिका प्रियांका बर्वे आणि निधी हेगडे यांनी गाणी गायली आहेत. दीपक देबनाथ यांचे नृत्य दिग्दर्शन, कला दिग्दर्शन नितीन बोरकर यांनी केले आहे.
निर्माते प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी आरएसटी कॅनव्हास या बॅनरखाली ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अस्मिता कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे.
