काही चित्रपट आपल्या आशयघन कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, तर काही कलाकारांच्या अभिनयामुळे लक्षात राहतात. ५६ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच ‘इफ्फी’मध्ये जागतिक पातळीवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यश मिळवणाऱ्या ‘दृश्य अदृश्य’ या चित्रपटात आशयघन कथा आणि उत्तम अभिनय दोन्हींची अनुभूती मिळणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले असून येत्या १९ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आरएसटी कॅनव्हासनिर्मित ‘दृश्य-अदृश्य’ या रहस्यमय थरारपटाची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे. मिलिंद लेले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मराठी सिनेसृष्टीबरोबरच हिंदीतही काम केलेली अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. दृश्य आणि अदृश्य यांच्यामध्ये एक पुसटशी रेषा असते, जी कधीच दिसत नाही, पण त्यात खूप काही दडलेले असते. अशाच आशयाची, डोळ्यांना दिसणारे आणि सत्य यांच्या संभ्रमात गुरफटवून ठेवणारी कथा ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

‘दृश्य-अदृश्य’च्या दिग्दर्शनाबरोबरच कथा-पटकथा लेखनही मिलिंद लेले यांनी केले असून, पूजा सावंतसोबत अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी, केया इंगळे आदी कलाकार चित्रपटात आहेत. संवाद अस्मिता कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार आशीष मुजुमदार, देवदत्त बाजी यांनी संगीत दिले आहे. गायिका प्रियांका बर्वे आणि निधी हेगडे यांनी या चित्रपटातील गाणी गायली असून, नृत्य दिग्दर्शन दीपक देबनाथ यांनी केले आहे. महेश बराटे यांची रंगभूषा, तर कीर्ती जंगम-जोशी यांची वेशभूषा आहे. छायाचित्रण अमोल साळुंके यांनी केले असून, संकलनाची जबाबदारी सचिन वाघ यांनी पार पाडली आहे. नितिन बोरकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे.