रेश्मा राईकवार

एका विचित्र, अतक्र्य आणि अनपेक्षित घटनाचक्रात अडकलेल्या सर्वसामान्य माणसाचं काय होईल? बरं हा अनावस्था प्रसंग त्याच्या एरव्ही साध्या-सरळ मार्गाने जाणाऱ्या कुटुंबाचाच सर्वनाश करणार असेल तर? इकडे आड तिकडे विहीर अशा द्वंद्वात सापडलेला अत्यंत असहाय्य, चौथी शिकलेला विजय साळगावकर ज्या हुशारीने आपल्या कुटुंबाला संकटातून ओढून बाहेर काढतो ते दाखवणारा ‘दृश्यम’ प्रेक्षकांना आवडला होता. विजयच्या मूळ गोष्टीतच त्याचा दुसरा अंक लपला होता. खोटं कधी ना कधी उघडं पडतं या एका सूत्राच्या आधारे रचला गेलेला विजयचा ‘दृश्यम २’ आधीच्या चित्रपटाइतका उत्तम नसला तरी प्रेक्षकांची उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत

‘दृश्यम २’चा प्रभाव प्रेक्षकांवर पडतो तो खरंतर त्याच्या कथेमुळे. पहिल्या आणि आता या दुसऱ्या दोन्ही चित्रपटांची कथा जितू जोसेफ यांचीच आहे. त्यामुळे पहिल्या कथेपासून आवश्यक असलेली सुसूत्र मांडणी साधणं लेखकाला शक्य झालं आहे. अर्थात, पहिल्या भागात घडलेली घटना आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी विजयने रचलेला खेळ यात एक सहजता होती. दुसऱ्या भागात मात्र नायक आधीपासूनच हुशार आणि सावध असल्याने इथे डावपेच आहेत, खेळी आहे. जिने आपला मुलगा गमावला आहे अशी पोलीस अधिकारी मीरा (तब्बू) आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी धडपडणारा खंबीर मनाचा बाप विजय (अजय देवगण) या दोघांमधलंच खरंतर हे भावनिक युद्ध. मीराला पक्कं माहिती आहे की तिच्या मुलाला मारून विजयने प्रेत कुठेतरी लपवलं आहे, पण ते तिला सिद्ध करता आलेलं नाही. मात्र मुळातच ती सहजी हार मानणारी आई नाही, त्यामुळे प्रकरण बंद झालं असलं तरी ती शांत बसलेली नाही. तर जे घडलं ते विसरून पुन्हा पहिल्यासारखं जगण्याचा प्रयत्न करणारे विजय आणि त्याचे कुटुंबीय पूर्णपणे त्यातून बाहेर पडलेले नाही. शिवाय, आजूबाजूला होणारी कुजबुज, त्यांच्याविषयीच्या उलटसुलट चर्चा, टोमणे यामुळे घडल्या घटनांचा झाकोळ अजूनही त्यांच्या मनावर आहे. फक्त त्याविषयी कोणी काही बोलायचं नाही ही विजयची सक्त ताकीद वरवर सगळं आलबेल असल्यासारखं भासवते आहे. सत्य शोधून काढण्याचा मीराचा प्रयत्न आणि काही योगायोगाने घडलेल्या घटना जुळून येतात. यावेळी पुन्हा प्रकरण बाहेर उकरून काढलं जातं आणि कधी नव्हे ते विजय तुरुंगात पोहोचतो. एका साधा केबलचालक ते चित्रपटगृहाचा मालक असा प्रवास केलेल्या विजयच्या मते नायकाने तुरुंगात जाणं हा योग्य शेवट नाही. प्रेक्षकांनाही ते आवडणार नाही. त्यामुळे हा शेवट बदलण्यासाठी तो काय काय करतो याची गोष्ट म्हणजे ‘दृश्यम २’ असं म्हणता येईल.

पहिल्या चित्रपटातील सगळय़ाच व्यक्तिरेखा दुसऱ्या भागात आहेत. त्यामुळे सात वर्षांनंतर दुसरा भाग प्रदर्शित झाला असला तरी मूळ चित्रपटातील व्यक्तिरेखा, कलाकार आणि संदर्भ नव्या भागात सुसूत्रतेने लेखकाने पुढे नेले आहेत. कलाकारही सगळे तेच असल्याने दिग्दर्शकीय मांडणीतही ती सुसूत्रता दिसते. अर्थात, विजय आणि मीरातील संघर्ष अधिक गहिरा करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक तरुण (अक्षय खन्ना) हा तिसरा अतिशय चाणाक्ष असा अधिकारी नवा गडी म्हणून कथेत दाखल झाला आहे. तरुणची व्यक्तिरेखा आणि अक्षय खन्नाला त्या भूमिकेत पाहणं यासारखी पर्वणी नाही. त्याचा टोकदार अभिनय आणि तरुण-विजयची जुगलबंदी हा चित्रपटातील आकर्षक भाग आहे. मात्र मीराच्या भूमिकेला आई म्हणून जो पदर आहे तशा पद्धतीचं कोणतंही नैतिक अधिष्ठान तरुणच्या व्यक्तिरेखेला नाही. एक पोलीस अधिकारी आपल्या सहकाऱ्याची सोईनुसार तत्वं बदलत मदत करताना दिसतो. त्यामुळे अक्षयसारखा चांगला अभिनेता असूनही ही भूमिका काहीशी निष्प्रभ ठरते. इतर व्यक्तिरेखा विशेषत: आधीच्या भागात खंबीर झालेली काही पात्रं इथे त्यांच्या मुळ स्वभावानुसार कोलमडताना दिसतात.. परिणामी विजयने धीराने उभी केलेली गोष्ट उसवत जाते. हा कथाभाग आणि श्रिया सरन, अजय देवगण, तब्बू, कमलेश सावंत आणि रजत कपूर या कलाकारांनी पहिल्या भागाइतक्याच सहज ताकदीने साकारलेल्या भूमिकांमुळे चित्रपट उत्तरोत्तर रंगत जातो.

तरीही हा एका परिपूर्ण रहस्यपट आहे असं म्हणता येणार नाही. त्याचं कारण अर्थात दिग्दर्शकीय मांडणीत आहे. ‘दृश्यम’ निशिकांत कामतसारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाने अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. इथे हे शिवधनुष्यम् दिग्दर्शक अभिषेक पाठकने पेलले आहे. मात्र मुळ कथेनुसार चित्रपटाला जो वेग हवा तो इथे दिसत नाही. पूर्वार्ध फार संथपणे सरकतो, त्या तुलनेने उत्तरार्धात घटना वेगाने घडत जातात. शिवाय, काही फापटपसारा टाळता आला असता जो पहिल्या भागात नावालाही सापडत नाही. शेवटाकडे येताना पुराव्यांच्या बाबतीतला गोंधळ, पोलीस झ्र् न्यायाधीश यांच्या भूमिका या तार्किकदृष्टय़ा गोंधळात टाकणाऱ्या वा वास्तवाशी फारकत घेऊन मांडलेल्या अतिरंजित वाटतात. पण वर म्हटलं तसं हिरोची गोष्ट अशी नसते..त्यामुळे विजय साळगावकर आपली गोष्ट कशी बदलतो? आणि ती सुफळ संपूर्ण होते का?, हे कोडं चित्रपट पाहिल्यावरच उलगडेल.

दृश्यम २
दिग्दर्शक – अभिषेक पाठक
कलाकार – अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना, रजत कपूर, श्रिया सरन, ईशा दत्ता, कमलेश सावंत, योगेश सोमण, सौरभ शुक्ला.