आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखने लीगल टीमला मुद्देही काढून दिले, जामीन मिळाल्यानंतर तर…; मुकुल रोहतगींची माहिती

“शाहरुखने तर सर्व काम सोडून या प्रकरणात लक्ष घातलं होतं. तो यासंदर्भात बोलण्यासाठी…”; आर्यनची बाजू मांडणाऱ्या वकिलांचा खुलासा

Aryan Khan mukul rohatgi
रोहतगी यांनी उच्च न्यायालयामध्ये मांडली आर्यन खानची बाजू

आर्यन खान याला क्रूझवरील पार्टप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर त्याचे वडील म्हणजेच अभिनेता शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया काय होती यासंदर्भात न्यायालयामध्ये आर्यनची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी माहिती दिली आहे. आर्यनला जामीन मिळाल्याचं समजताच शाहरुखच्या डोळ्यात आनंदाश्रू होते असं रोहतगी यांनी म्हटलं आहे. तसेच आर्यन प्रकरणानंतर शाहरुखने त्याची सर्व कामे थांबवली होती आणि तो याच प्रकरणावर लक्ष ठेऊन होता असा खुलासाही रोहतगी यांनी केलाय.

“मागील तीन ते चार दिवसांपासून तो फार फार चिंतेत होता. मी जेव्हा त्याला भेटायचो तेव्हा तो चिंतेतच असायचा. तो जेवणही व्यवस्थित घेत असावा की नाही याबद्दल शंका आहे. तो केवळ कॉफी प्यायचा. त्याला फार चिंता वाटत होती. मात्र आता मी त्याला भेटलो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दिलासा मिळाल्याचे भाव दिसून आले. एका बापाच्या चेहऱ्यावरील ते भाव होते,” असं रोहतगी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे.

यापूर्वी आर्यनाला दोनदा जामीन नाकारण्यात आला. आर्यन हा ३ ऑक्टोबरपासून कोठडीमध्ये आहे. शाहरुख आणि गौरी हे कोणत्याही सुनावणीसाठी प्रत्यक्षात उपस्थित नव्हते. मात्र दुसऱ्यांदा जामीन नाकारल्यानंतर शाहरुखने आर्थर रोड तुरुंगात जाऊन २१ ऑक्टोबर रोजी आर्यनची भेट घेतली होती. आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज र्मचट व मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र जामिनाच्या अटींबाबतचा आदेश शुक्रवारी देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने २५ दिवसांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या आर्यन आणि त्याच्या मित्रांची शुक्रवारी किंवा शनिवारी सुटका होऊ शकेल, असं सांगण्यात येत आहे. आर्यनला दिलासा मिळाल्याने तो शाहरुखच्या वाढदिवसाच्या वेळी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी वडिलांसोबत असेल हे निश्चित झालं आहे.

“दूर्देवाने कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. त्यामुळे प्रकरण उच्च न्यायालयात आलं आणि यात जवळजवळ महिना गेला. त्याचे पालक फारच चिंतेत होते. त्यामुळेच ते या प्रकरणबद्दल बारीक सारीक माहिती जाणून घेत होते. शाहरुखने तर सर्व काम सोडून या प्रकरणात लक्ष घातलं होतं. तो यासंदर्भात बोलण्यासाठी कधीही उपलब्ध होता. इतकच नाही तर आर्यनची बाजू मांडणाऱ्या टीमला मदत करण्यासाठी शाहरुखने स्वत: काही नोट्स (मुद्द्यांची यादी) बनवल्या,” असंही रोहतगी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Drugs case india former attorney general mukul rohatgi talks about shah rukh khan involvement as aryan khan gets bail scsg

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या