मनोरंजनाची झगमगती दुनिया जेवढी सुंदर वाटते तेवढीच ती प्रत्येकवेळी असते असे नाही. इथे स्वतःचे नाव सिद्ध करण्यासाठी कित्येक वर्षांचा संघर्ष लागतो. हा संघर्ष काहींसाठी आपले काम सिद्ध करण्यासाठी असतो तर काहींचा जगण्यासाठी. ‘बिदाई’ फेम पारुल चौहान या अभिनेत्रीचे आयुष्यही संघर्षमयच होते. आज जरी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिले जात असले तरी याचे सारे श्रेय तिच्या संघर्षालाच जाते.
आज पारुलकडे पैसा, प्रसिद्धी सर्व काही आहे. पण, एक वेळ अशी होती जेव्हा पारुलला तिच्या सावळ्या रंगामुळे कुठेही काम मिळत नव्हते. अनेक ठिकाणी प्रयत्न करुनही तिचा रंग तिच्या करिअरच्या आड येत होता. संघर्षाच्या काळात हिंमत तुटली नसली तरी पैशांची चणचण मात्र जाणवत होती. तिच्याकडे फक्त एकवेळच्या जेवणाचे पैसै असायचे.
सावळ्या रंगाच्या मुलीला अभिनेत्री व्हायचे होते ही संकल्पनाच तेव्हा अनेकांच्या पचनी पडत नव्हती. पण पारुलने मात्र आपल्या जिद्दीने सावळ्या रंगाची मुलगीही अभिनेत्री होऊ शकते हे सिद्ध करुन दाखवले. तिच्या या कठीण प्रसंगात तिने कधी कोणासमोर हात पसरले नाहीत किंवा परिस्थितीसमोर हतबलही झाली नाही.
पारुलच्या कुटुंबाची अर्थिक स्थिती ठीक नव्हती. हॉस्टेलमध्ये असताना पैसे नसल्यामुळे ती एकाच वेळच जेवण मागवायची आणि त्यातल्या दोन पोळ्या दुपारी खाऊन दोन रात्रीसाठी वाचवून ठेवायची. चार महिन्यानंतर पारुलला एक छोटेखानी भूमिका करण्याची संधी मिळाली.

ऑडिशनवेळी तिचा अभिनय उपस्थितांना आवडला. तू खूप पुढपर्यंत जाशील असे भाकितही त्यांनी केले. थोड्याच दिवसांनी तिला ‘बिदाई’ ही मालिका मिळाली. या मालिकेमुळे ती प्रकाश झोतात आली आणि त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.