जगरहाटीचा व्यवहार आणि मानवी भावभावना यांचा ताळमेळ बसवण्यातच माणसाचं आयुष्य निघून जातं. सामान्य माणसाच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे, परिस्थितीनुरूप घडणाऱ्या घटना, येणारी संकटं आणि त्याचा सामना करत आपापल्या परीने मार्ग चोखाळत पुढे जाण्याचा प्रत्येकाचा प्रवास वेगळा खरा… बऱ्या-वाईटाचा विचार करून निर्णय घेताना नात्यांना झुकतं माप द्यायचं की आलेल्या संधीचा भविष्याच्या दृष्टीने विचार करत कधीतरी आपल्या माणसांना-नात्यांना मागे टाकून निवडलेल्या रस्त्यावर पुढे निघून जायचा व्यवहार जपायचा? ‘द्विधा’ या निलेश नाईक यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या चित्रपटात अशाच एका निर्णायक टप्प्यावर असलेल्या बाप-लेकीच्या नात्यातला कल्लोळ पाहायला मिळतो. अतिशय शांत, संथ आणि संयमी मांडणीतूनही हा भावनिक कल्लोळ पाहणाऱ्यापर्यंत पोहोचतो, हे या चित्रपटाचं वैशिष्ठय.
दैनंदिन आयुष्यात घडणारी प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट अत्यंत नाट्यमय पद्धतीने पडद्यावर घडताना पाहण्याची सवय हिंदी चित्रपटांनी आपल्याला कैक वर्षं लावली आहे. त्यामुळे जरा वेगवान मांडणी आणि नाट्यमय शैलीला सोडचिठ्ठी दिलेल्या चित्रपटाला आपण कलात्मक चित्रपटाचं लेबल डकवून मोकळं होतो. पण, कधीतरी एखादी गोष्ट जशी आपण ऐकली आहे, पाहिली आहे किंवा सुचली आहे ती त्याच सहजतेने आणि अकृत्रिम पद्धतीने मांडण्याचा मोह एखाद्या कथाकाराला होऊ शकतो. तसा तो गेली अनेक वर्षे माध्यम क्षेत्रात असलेल्या दिग्दर्शक नीलेश भास्कर नाईक यांना झाला.
संकलन आणि प्रोमो दिग्दर्शनाचा दीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या नीलेश यांनी ‘द्विधा’ या चित्रपटासाठी कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि संकलन अशी चौफेर जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या संकलन कौशल्याची प्रचिती ‘द्विधा’ पाहताना येते, तसंच दिग्दर्शन क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे चित्रपटात कुठेही पहिलेपण जाणवणार नाही इतकी सफाईदार मांडणी त्यांनी केली आहे. त्यामुळे ‘द्विधा’ चित्रपटाची गोष्ट ही कुठल्याही जगावेगळ्या घटनेवर आधारित नाही किंवा अनवट विषयाला हात घालणारी नाही. पण, त्यातल्या पात्रांवर ओढवलेली परिस्थिती, त्यातून घट्ट बांधली गेलेली बापलेकीच्या नात्याची वीण आणि आयुष्याच्या दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या या दोघांभोवती रेंगाळणारा निर्णायक क्षण अशी भावभावनांची एक सुरेख वीण या चित्रपटात पाहायला मिळते.लग्नानंतर चार वर्षांनी अचानक न कळवता अमेरिकेतून वसईत आपल्या वडिलांना भेटायला आलेल्या श्रावणीपासून या गोष्टीची सुरुवात होते. श्रावणी गर्भवती आहे, आधी दोन वेळा तिला गर्भधारणेतील गुंतागुंतीमुळे बाळ गमवावं लागलं असल्याने तिसऱ्या वेळी तिने अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र, वडिलांच्या प्रकृतीची चिंता सतावत असल्याने ती अचानक भारतात येऊन त्यांना भेटण्याचा निर्णय घेते. लहानपणीच आई गमावलेल्या श्रावणीसाठी तिचे ‘दादा’ हेच सर्वस्व आहेत.
लहानपणी कधीतरी एका अवघड भावनिक क्षणी तिने त्यांना मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही, असं वचन दिलं आहे. अमेरिकेवरून पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या श्रावणीला वडिलांच्या आजारपणाबद्दल कळतं आणि मग आजवर आपल्यासाठीच जगलेल्या वडिलांना किमान त्यांच्या अखेरच्या दिवसांत साथ द्यायची की पोटच्या मुलाच्या भविष्यासाठी परदेशात परतायचं? हे द्वंद्व तिच्या मनात सुरू होतं.‘द्विधा’ ही वरवर पाहता बापलेकीच्या नात्याची गोष्ट वाटत असली तरी त्याला अनेक भावनिक पदर आहेत जे आजच्या सामाजिक वास्तवाशी जोडले गेलेले आहेत. परदेशात नोकरीनिमित्त गेलेले, तिथेच स्थायिक झालेले तरुण-तरुणी आणि इकडे भारतात एकटे उरलेले त्यांचे जन्मदाते यांच्यात निर्माण झालेल्या विचित्र तणावाची गोष्टही चित्रपट सांगतो. आई-वडील आजारी असले, मृत्यूशय्येवर असले तरी कित्येक मुलं त्यांना पाहण्यासाठी मायदेशात येत नाहीत.
पैसे देऊन त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी नियोजन करण्यापलिकडे आईवडिलांच्या भावनांचा विचारच केला जात नाही. तर अनेकांना घरी परतायची इच्छा असूनही विविध कारणांमुळे त्यांना ते शक्य होत नाही. भावना विरुद्ध व्यवहार अशी नात्यांची ही विचित्र कोंडी गेली अनेक वर्षे अनेक घरांमधून अनुभवली जाते आहे. घराघरांत दाटलेल्या ज्येष्ठांच्या शांततेतला हा कल्लोळ दिग्दर्शकाने ‘द्विधा’ चित्रपटातून बोलका केला आहे. मात्र, हे करत असताना परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेणाऱ्या सगळ्या तरुण पिढीला सरसकट भावनाशून्य ठरवणंही का योग्य नाही, याचीही वास्तव मांडणी त्यांनी केली आहे. या चित्रपटाच्या कथेला अनुरुप अशी मांडणी करताना वसईसारखं उत्तम चित्रीकरण स्थळ, देखण्या छायाचित्रणातून बोलक्या होत गेलेल्या जागा आणि सुरेल अशा पार्श्वसंगीताची दिलेली जोड त्यामुळे एका लयीत चित्रपट पाहिल्याची अनुभूती मिळते. नेहमीच्या कलाकारांपेक्षा वेगळे चेहरे हीसुद्धा चित्रपटाला ताजेपणा देणारी बाब ठरली आहे.
अभिनेत्री मानसी कुलकर्णी हिने चित्रपटात श्रावणी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. श्रावणीच्या मनातली सारी घालमेल, तिच्या मानसिक गुंतागुंतीसह मानसीने यथार्थपणे साकारली आहे. सतीश पुळेकर यांनी तिच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यांचा सहजअभिनय ही पर्वणीच आहे. रेणूका दफ्तरदार, आस्ताद काळे यांच्याही भूमिका छान जमून आल्या आहेत. मानसीच्या भावाची भूमिका अभिनेता निमिष कुलकर्णीने खूप सहज साकारली आहे, त्याला आणि एकूणच भावा-बहिणीच्या या नात्याला अजून वाव मिळायला हवा होता. गीतकार मंदार चोळकर यांनी या चित्रपटासाठी लिहिलेलं ‘कल्लोळ’ हे गाणं म्हणजे या चित्रपटाचा आत्मा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कधीकधी माणसावर परिस्थितीच अशी येते की त्याला मनाविरूध्द निर्णय घ्यावे लागतात, हे चित्रपटाचं घोषवाक्य आहे. या निर्णयाच्या अल्याड-पल्याड असताना माणसाच्या मनात उमटणारा भावनांचा कल्लोळ, शांततेतूनही व्यक्त होणारा अंतर्नाद अनुभवण्याची संधी ‘द्विधा’ हा चित्रपट देतो.
दिग्दर्शक – नीलेश भास्कर नाईककलाकार – मानसी कुलकर्णी, सतीश पुळेकर, रेणूका दफ्तरदार, आस्ताद काळे, निमिष कुलकर्णी.
