दिल्लीच्या तिहार कारागृहातून २०० कोटी रुपयांच्या वसुलीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चा तपास सुरु आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीने आज चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मते, नोरा केंद्रीय एजन्सीच्या चौकशीत सामील होणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. ईडीने अभिनेते नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिस यांना साक्षीदार म्हणून बोलावले आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वीच मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा जबाब नोंदवला होता. जॅकलीन फर्नांडिसची दिल्लीत चार तास चौकशी केल्यानंतर, तिचे निवेदन मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) साक्षीदार म्हणून रेकॉर्ड करण्यात आले. ज्यामध्ये सुकेश चंद्रशेखर, २०० कोटींपेक्षा जास्त फसवणूक आणि खंडणीचा आरोपी आहे. आता अभिनेत्रीची पुन्हा चौकशी केली जाईल.

त्यानंतर या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पाल तिहार कारागृहातून २०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. सुकेशने नोरा फतेहीलाही आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता.

नोरा फतेही एक कॅनेडियन मॉडेल-अभिनेत्री आहे. नोराने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य केले आहे. ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. नोराने स्ट्रीट डान्सर ३ डी, बाटला हाऊस सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

माध्यमांच्या वृत्तांनुसार, २०० कोटींच्या खंडणीचा मुख्य आरोपी सुकेश तिहार जेलमधून अभिनेत्री जॅकलिनला फोन करायचा. सुकेश तिहार जेलच्या आतून कॉल स्पूफिंग सिस्टीमद्वारे अभिनेत्रीला फोन करायचा. पण त्याने आपली ओळख उघड केली नाही. एजन्सींना सुकेश चंद्रशेखरचे महत्त्वाचे कॉल डिटेल्स मिळाले आहेत. याद्वारे तपास यंत्रणांना जॅकलिनसोबत झालेल्या फसवणुकीची माहितीही मिळाली.