‘छावा’च्या भव्यदिव्य यशानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक रूपेरी पडद्यावर दाखवणारा, आपल्या मातीतल्या कलावंतांची कथा हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून देशभर नेणारा चित्रपट म्हणून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘ईठा’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दादरच्या प्लाझा चित्रपटगृहात थाटामाटात प्रदर्शित करण्यात आला. यानिमित्ताने प्रेक्षकांशी संवाद साधताना, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘ईठा’ हा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा चरित्रपट नसल्याचे स्पष्ट केले. विठाबाईंच्या आयुष्यातील काही प्रसंगांवरून हा चित्रपट प्रेरित आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून एकाच वेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली लावणी आणि त्यामागे लपलेली तमाशा कलावंतांची वेदना दोन्ही मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे उतेकर यांनी सांगितले.

‘ईठा’ चित्रपटाची पहिलीवहिली झलक मराठमोळा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादरमधील प्लाझा चित्रपटगृहात रसिकांना दाखवण्यात आली. चित्रपटात विठाबाईंची शीर्ष भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर नऊवारी साडी आणि दागिने अशा पारंपरिक वेशात उपस्थित होती. चित्रपटाचे निर्माते मॅडॉक फिल्म्स प्रॉडक्शनचे दिनेश विजन, अभिनेता रणदीप हुडा आणि संगीतकार अजय-अतुल हेही या वेळी उपस्थित होते.

‘ईठा’ हा चित्रपट विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांना दाखवण्यात येणार का? असा प्रश्न दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी हा चित्रपट विठाबाईंचा चरित्रपट नाही. चित्रपटासाठी ‘तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा’ या योगिराज बागूल यांच्या पुस्तकाचा आधार घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे लोकसंगीत म्हणून नावाजलेल्या लावणीचे वैभव या चित्रपटात पाहायला मिळेल. या शृंगारिक लावणीकलेला जिवंत ठेवणाऱ्या कलावंतांच्या वेदना, त्यांचं पडद्यामागचं जगणंही चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असं त्यांनी सांगितलं.

‘ईठा’च्या भूमिकेसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर हेच नाव सुरुवातीपासून निश्चित होतं, असं सांगतानाच या चित्रपटाच्या चित्रीकरणाची प्रक्रियाही तमाशा कलावंतांच्या रोजच्या जगण्याशी मिळतीजुळती होती, असे त्यांनी सांगितले. चित्रीकरणादरम्यान आम्ही प्रत्यक्ष तमाशा कलावंतांबरोबरच होतो. तमाशाचा फड एका ठिकाणी स्थिर नसतो. एका गावात कार्यक्रम झाला की दुसऱ्या गावी फड उभा राहतो, अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत आम्ही चित्रीकरण केलं, अशी माहिती त्यांनी दिली.

‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’च्या यशानंतर श्रद्धा कपूर ‘ईठा’च्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटासाठी विचारणा झाली तेव्हा एका मराठी कलावंताची भूमिका स्वीकारण्यासाठी माझा विचार झाला, याचा आनंद वाटला, अशी भावना श्रद्धाने व्यक्त केली. तर माझे घराणेच मुळी कलाक्षेत्राशी जोडले गेलेले आहे. माझे आजोबा कलावंत होते. माझी मावशी, माझे वडील आणि स्वत: मी कलाक्षेत्रात आहोत. या क्षेत्रात वावरताना प्रत्येकालाच आपापला संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षातून ते पुन्हा कसे उभे राहतात, याचं चित्रण ‘ईठा’ या चित्रपटात आहे. केवळ तमाशा कलावंतांचा चित्रपट म्हणून तो मर्यादित नाही. तर कलावंतांचे जगणे लोकांसमोर आणणारा हा चित्रपट आहे आणि अशा चित्रपटाचा मी भाग आहे, याचा माझ्या आजीला निश्चितच आनंद होईल, अभिमान वाटेल, हाही विचार माझ्या मनात होता, असंही तिनं सांगितलं. लावणीनृत्य हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याच्या तयारीसाठी ज्येष्ठ लावणी नृत्यांगना शकुंतला नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी शकुंतलाबाईंनी श्रद्धाला सांगितलं होतं, ‘अगं नजरेच्या अदांनीच समोरचा घायाळ झाला पाहिजे, घुंगरू तर नंतर भुरळ घालतात’. त्यांनी दिलेला हा धडा श्रद्धाने पुरेपूर आपल्या अभिनयात उतरवला. तिने समर्पित वृत्तीने ही भूमिका केली आहे, असं कौतुकही उतेकर यांनी केलं.

अभिनेता रणदीप हुडा या चित्रपटात देखण्या पैलवानाच्या भूमिकेत असल्याची माहितीही त्यांनी दिली. आपली भूमिका नेमकी काय हे पूर्णपणे उघड करण्यात आलेले नाही, मात्र ‘ईठा’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. दिग्दर्शक म्हणून उतेकरांनी ‘छावा’ केल्यानंतर थेट ‘लावणी’चा इतिहास सांगणारा चित्रपट केला, याबद्दल कौतुक करताना सगळीच युद्धं हातात तलवार घेऊन लढली जात नाहीत, काही युद्धं प्रेमाने लढली जातात, असं सांगत या चित्रपटाचं वेगळेपणही त्याने अधोरेखित केलं.

नायिकाप्रधान चित्रपट ही संकुचित विचारसरणी…

अभिनेत्री म्हणून मी जाणीवपूर्वक नायिकाप्रधान भूमिकांची निवड करत नाही. कथा चांगली हवी, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा निकष असतो, असं श्रद्धा कपूरनं स्पष्ट केलं. आज आपल्या चित्रपटसृष्टीला चांगल्या कथा असलेल्या, सशक्त आशयाच्या चित्रपटांची गरज आहे. त्यामुळे चांगले चित्रपट कसे करता येतील, ते प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचतील हे मला महत्त्वाचं वाटतं. मला स्त्रीप्रधान भूमिका असलेले चित्रपट हवेत, ही संकुचित विचारसरणी मला पटत नाही. आपण संपूर्ण चित्रपट उद्योगाचा विचार केला पाहिजे, असं मत श्रद्धानं व्यक्त केलं.