बालाजी टेलिफिल्म्सची सर्वेसर्वा एकता कपूर हिने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी आश्चर्यचकित करणारे वक्तव्य केले आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या बाळाला त्याचे वडिलच नाहीत असे म्हटले.

एकता कपूर सरोगसीच्या माध्यमातून सिंगल मदर झाली आहे. आई झाल्यानंतर तिचे संपूर्ण आयुष्य कसे बदलेले याबाबत तिने आपले अनुभव सांगितले. “भारत हा पुरुष प्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबात वडिलांना खुप महत्व असते. मात्र, या पारंपारिक विचारसरणीला झिडकारुन आता देशात सिंगल मदर म्हणून आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांचेही प्रमाण वाढत आहे. परंतु एकट्या स्रीने जगणे काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी पारंपारिक विचारसरणीच्या समाजाविरुद्ध जगण्याची मानसिक तयारी करावी लागते. लोक नेहमीच तुमच्या चारित्र्यावर संशय घेततात. परंतु त्यांच्या प्रश्नांना कणखरपणे उत्तर द्यावे लागते.”

“माझ्या बाबतीतही तेच घडले. सुरुवातीला माझ्या घरातही सिंगल मदर या संकल्पनेला विरोध झाला होता. परंतु मी त्या प्रतिकूल परिस्थितीला धिराने तोंड दिले. मी ठरवले आहे की माझ्या मुलाला त्याचा जन्म कसा झाला याबाबत पुर्ण माहिती देईन. तसेच त्याचे वडिल नाहीत याबाबतही त्याच्याशी चर्चा करेन. मला आशा आहे की तो माझी परिस्थिती समजू शकेल अशा प्रकारच्या संभाषणामुळे कुटुंबात कधीच गैरसमज निर्माण होत नाहीत.” असे एकता कपूर या मुलाखतीत म्हणाली.

तसेच “माझ्या मुलाचे मी इतर मुलांप्रमाणे पालन पोषण करणार नाही. त्याला परिकथा सांगून वाढवण्यापेक्षा समाजातील खरी परिस्थीती सांगून वाढवणे मी जास्त पसंत करीन” असेही एकता कपूर म्हणाली.