शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपट वाईट असूनही बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड मोडतो आहे. ‘हॅप्पी न्यू इअर’चे हे तथाकथित यश बॉलीवूडजनांनाही रुचलेले नाही. त्यामुळे पहिल्यांदा आमिरनेही या चित्रपटाचे नाव न घेता हल्ली सगळेच चित्रपट आपापले कमाईचे आकडे फुगवून सांगत असतात, अशी टीका केली होती. आता त्यात इम्रान हाश्मीचीही भर पडली आहे. इम्रान हाश्मीचा धर्मा प्रॉडक्शन निर्मित ‘उंगली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शंभर कोटीच्या तद्दन गल्लाभरू सिनेमांपेक्षा निवडक पण, चांगलेच चित्रपट करायचे ही आपली भूमिका कायम असल्याचे सांगत प्रेक्षकच मसालापटांना डोक्यावर घेतात, अशी टीका के ली आहे.
आत्तापर्यंत भट्ट कॅम्प, कुणाल देशमुख, दिबाकर बॅनर्जी अशा ठरावीक दिग्दर्शकोंबरोबरच प्राधान्याने काम करणाऱ्या इम्रान हाश्मीने ‘उंगली’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनबरोबर काम केले आहे. करण जोहर नंतर आता यशराजच्या वाटेने जाणार का, या प्रश्नावर मुळात करण जोहर काय किं वा यशराज काय.. त्यांच्या ‘रोम-कॉम’ सिनेमांच्या व्याख्येत बसणारा मी नाही, असे त्याने स्पष्ट केले. म्हणजे, ‘उंगली’साठी करण जोहरकडून विचारणा झाल्यावर त्याला होकार देण्याऐवजी याच्या चित्रपटात आपण काय काम करणार, याच प्रश्नाने पुरते छळले होते, असे तो सांगतो. मात्र, ‘उंगली’चे दिग्दर्शन हे रेन्सिल डिसिल्वा यांचे आहे आणि रेन्सिलने आजवर ‘रोम-कॉम’ केलेले नाहीत. मी ज्या पठडीचे सिनेमे करतो तसेच दिग्दर्शक म्हणून रेन्सिलने केले आहेत हे माहीत होते. त्यामुळे चित्रपटाला आपण होकार दिल्याचे इम्रानने सांगितले.
या चित्रपटात बऱ्याच वर्षांनंतर इम्रान आणि कंगना राणावत ही जोडी पडद्यावर एकत्र आली आहे. ‘‘हो..‘गँगस्टर’ हा आमचा पहिला चित्रपट होता. त्या वेळची कंगना आणि आत्ताची कंगना यात अभिनेत्री म्हणून फारच तफावत आहे,’’ असे तो म्हणतो. ‘गँगस्टर’मध्येही कंगनाच्या कामाचे कौतुक झाले होते. पण, एक अभिनेत्री म्हणून कंगना खूप पुढे गेली आहे. त्यामुळे आत्ता तिच्याबरोबर काम करताना खरे समाधान मिळते, असेही त्याने सांगितले. निवडक चित्रपटांची कास हट्टाने धरली असली तरी त्यांना तिकीटबारीवर कमाई करता आलीच पाहिजे, हा सिद्धांत त्यालाही चुकलेला नाही.. पण, मसालापटांना प्रेक्षक डोक्यावर घेतात आणि मग ‘अरे! काय वाईट होता रे..’ अशी टीकाही करतात. मी माझ्या कित्येक मित्रांना म्हणतो, ‘चांगल्या चित्रपटांना तुम्ही साथ देत नाही म्हणून ते कमाई करत नाहीत. तुम्हाला मनोरंजन हवे आहे ना घ्या..’ असे म्हणत त्याने अप्रत्यक्षरीत्या का होईना सलमान आणि शाहरुखच्या तथाकथित शंभर कोटी कमाई करणाऱ्या चित्रपटांवर टीका केली. कलाकार म्हणून मी हिंदी चित्रपट बघत नाही. मला हॉलीवूड साय-फाय पट बघायला जास्त आवडतात, असे तो म्हणतो. ख्रिस्तोफर नोलानच्या ‘इन्टरस्टेलर’सारखे चित्रपट हिंदीत करण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही, असे तो ठामपणे सांगतो.
‘उंगली’नंतर इम्रान पुन्हा एकदा भट्ट कॅम्पबरोबर ‘मिस्टर एक्स’सारखा साय-फायपट करतो आहे. शिवाय, विद्या बालन आणि हुमा कुरेशी यांच्याबरोबर ‘हमारी अधुरी कहानी’सारखा चित्रपट करतो आहे. ‘साय-फाय’पट करण्याचे आपले स्वप्न ‘मिस्टर एक्स’च्या निमित्ताने पूर्ण होत असल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केले.