सिडनीत ‘चारचौघी’चा देखणा प्रयोग

नाटककार प्रशांत दळवीलिखित आणि संजय लेले दिग्दर्शित ‘चारचौघी’ या नाटकाचा देखणा प्रयोग अलीकडेच ऑस्ट्रेलियात सिडनी येथील स्थानिक कलाकारांनी ‘मराठी असोसिएशन, सिडनी मासी’तर्फे सादर केला.

सिडनीत ‘चारचौघी’चा देखणा प्रयोग
प्रतिनिधिक छायाचित्र

नाटककार प्रशांत दळवीलिखित आणि संजय लेले दिग्दर्शित ‘चारचौघी’ या नाटकाचा देखणा प्रयोग अलीकडेच ऑस्ट्रेलियात सिडनी येथील स्थानिक कलाकारांनी ‘मराठी असोसिएशन, सिडनी मासी’तर्फे सादर केला. १९९० साली मराठी रंगभूमीवर अतिशय गाजलेले ‘चारचौघी’ हे नाटक कालौघात रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरले. स्त्रीवादी भूमिकेची सशक्त मांडणी करणाऱ्या या नाटकाने त्याकाळी वादळ निर्माण केले होते. आज ३२ वर्षांनी ऑस्ट्रेलियात सादर झालेल्या या नाटकाच्या प्रयोगानेही इथल्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवले, हे या नाटकाचे आणि कलाकारांचे यश म्हणावे लागेल.

या नाटकात प्रचलित लग्नसंस्थेची चौकट झुगारून कुणाच्या तरी आयुष्यातील दुसरी स्त्री हे नाते धाडसाने स्वीकारणारी, मुख्याध्यापिका असलेली खंबीर स्त्री ललिता कानेटकर यांनी अतिशय ताकदीने उभी केली. घरातील अशा मोकळ्या वातावरणात वाढलेल्या तिच्या तीन मुलींच्या भूमिका धनश्री करंदीकर, मानसी गोरे आणि मृगजा करंदीकर यांनी इतक्या सशक्तपणे साकारल्या की जणू काही त्या खऱ्याखुऱ्या मायलेकी आहेत असे वाटावे.

आत्मनिर्भर, कणखर, सडेतोड विचारांची, पण आपल्या छोटय़ा मुलीच्या आठवणीने व्याकूळ होणारी हळवी विद्या- धनश्री करंदीकर यांनी अप्रतिम साकारली. तर मानसी गोरे यांनी वैजूची अगतिकता प्रेक्षकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवली. मृगजा करंदीकर विनीच्या भूमिकेत रंगमंचावर इतकी सहज वावरत होती, की त्यातून तिच्या व आईच्या नात्यातील वीण किती घट्ट आहे हे जाणवत होते. चारचौघींसारख्या दिसणाऱ्या, पण चारचौघींहून अतिशय वेगळे आयुष्य जगणाऱ्या या चारही जणी मनाला चटका लावून गेल्या.

आज २०२२ मध्येदेखील स्वत: काहीही न करता केवळ वंशाचा दिवा वाढवण्यात धन्यता मानणारे अनेक मदनाचे पुतळे आपल्या आजूबाजूला आढळतात. अशा मदनाच्या पुतळ्याचे प्रतिनिधित्व केले साईप्रसाद कुलकर्णी यांनी! त्याची ही खुशालचेंडू वृत्ती प्रेक्षकांपर्यंत अचूक पोहोचली. विनीचे दोन मित्र.. प्रकाश हा बुद्धिवादी, तर विरेन हा व्यावहारिक दृष्टिकोन असलेला. सचिन भावे आणि सौरभ दातार या दोन नवोदित कलाकारांनी या दोन वृत्ती आणि त्यांच्या स्वभावातील भिन्न पैलू यथार्थतेने दाखविले. स्त्रीमुक्ती आणि स्त्री-समानतेच्या प्रवासावरील ही दर्जेदार नाटय़कृती लेखक प्रशांत दळवी यांनी संहितेतून जितक्या समर्थपणे मांडली आहे, तितक्याच तोलामोलाने संजय लेले यांनी आपल्या दिग्दर्शनातून त्यातला आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला. वास्तवदर्शी नेपथ्य, तसेच प्रसंगानुकूल रंगभूषा, वेशभूषा, ध्वनी आणि प्रकाशयोजना करणाऱ्या कुशल तंत्रज्ञांनी ‘चारचौघी’च्या प्रयोगाला चंदेरी झालर तर लावलीच; पण विशेष उल्लेख करायला हवा तो केदार माळगावकर या युवा संगीतकाराने दिलेल्या पार्श्वसंगीताचा! व्यावसायिक नाटकाच्या तोडीचा असा हा नाटय़ानुभव खचितच संस्मरणीय ठरला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अजूनही बंधनात मी..
फोटो गॅलरी