गायत्री हसबनीस

कुणी तिच्यावरती समाजमाध्यमांवर टीका करत तिला ट्रोल करतं तर हिंदूी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीमुळे मोठय़ा प्रमाणावर तिला प्रेक्षकांकडून वाईटसाईट टोमणेही ऐकावे लागतात. तरीही  या सगळय़ाच्या पल्याड एक अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट या तरुण अभिनेत्रीने बॉलीवूडवर आपली पकड घट्ट केली आहे. दशकभराच्या कारकीर्दीत ‘स्टुडंट ऑफ द इअर’सारख्या तद्दन व्यावसायिक चित्रपटातून पदार्पण केलेल्या आलियाने हरतऱ्हेचे चित्रपट करत स्वत:ला यशस्वी अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा तिचा नवा चित्रपट भन्साळींच्या जादूगारीने साकार झाला आहे. या चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने गंगूबाई या भूमिकेविषयी, संजय लीला भन्साळींसोबत पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव तसेच अनेक किस्से, आठवणी सांगत आलिया भट्टने ‘लोकसत्ता’शी दिलखुलास संवाद साधला.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!
Reactions of Political Leaders of Maharashtra in Famous Dialogues in Hindi Cinema
बाइट नव्हे फाइट…
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

‘‘संजय लीला भन्साळींसोबतचा माझा हा पहिलाच चित्रपट,  त्यातून पूर्ण चित्रपटाची जबाबदारी माझ्यावर आहे.  नाही म्हटलं तरी करोनाचे सावट असलेल्या या अशा अनिश्चिततेच्या काळात चित्रपटाच्या यशाची तिकीटबारीवरची गणितं काय असतील? याबद्दल थोडं दडपण होतंच,’’ अशी भावना आलियाने व्यक्त केली. ‘गंगूबाई काठियावाडी’बद्दल बोलताना संजय लीला भन्साळींच्या नजरेतून कथा चित्ररूपात सुंदर दिसावी अशाप्रकारे ती प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन चार वेळा लांबले तेव्हा ओटीटीविषयी विचारणा होऊनही तो चित्रपटगृहातच प्रदर्शित व्हावा या विचारावर आम्ही ठाम होतो,’’ अशी माहितीही तिने दिली.

आलियाने गंगूबाई हरजीवनदास म्हणजेच गंगूबाई काठियावाडी या लोकप्रिय नावानेच प्रसिद्ध असलेल्या साठच्या दशकात वेश्यांसाठी कायदेशीररीत्या हा व्यवसाय व्हावा म्हणून प्रंतप्रधान नेहरूंपासून अगदी सामान्य लोकांपर्यंत लढा लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीची भूमिका केली आहे. गंगूबाई कामाठीपुरा भागात राहून वेश्यागृह चालवत होत्या. त्या काळात वेश्याविक्री करणाऱ्या या गंगूबाईचा बंडखोरपणा प्रसिद्ध होताच, परंतु तिचे आलिशान गाडय़ांतून फिरणे, नटणे व मुरडणेही लोकांच्या नजरेत भरायचे.  या श्रीमंत आणि  बिनधास्त गंगूबाईच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आलिया सांगते, ‘‘संजय लीला भन्साळींनी मला कथा सर्वप्रथम ऐकवली. त्यानंतर मी जेव्हा ही भूमिका समजून घेत होते त्यादरम्यान ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या लेखक हुसेन झैदी यांनी लिहिलेल्या पुस्तकातील गंगूबाईंवरील  प्रकरण  मी वाचले. मला त्या पात्रात जास्त रस असल्याने तो भाग मी अगदी मनापासून वाचला, परंतु विशेष गोष्ट ही होती की हुसेन झैदी यांना मला प्रत्यक्ष भेटता आले. तेव्हा त्यांनी मला गंगूबाईबद्दल जास्त माहिती दिली, कारण ते त्यांना प्रत्यक्ष भेटले होते. गंगूबाईंची एक बोलण्याची शैली होती ज्याच्यामुळे त्या खूप लोकांशी जोडल्या गेल्या होत्या तसेच लोकप्रियही होत्या. आम्ही चित्रपटात ते पात्र रेखाटण्यासाठी लेखक हुसेन झैदींकडून कशाप्रकारे गंगूबाईंनी बहुतांशी लोकांवर आपली छाप पाडली होती हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.’’

व्यक्तिचित्रणाला मी कथेपेक्षा प्राधान्य देते असं म्हणणारी आलिया मी वर्षांला एकच चित्रपट करेन अशी वल्गना करत नाही. तिला सतत नवं काम करण्याची आस लागून राहिली आहे हेच तिच्या बोलण्यावरून जाणवते. गंगूबाईबद्दल आणि केलेल्या कामाबद्दलही ती भरभरून बोलते. ‘‘कामाठीपुरा ही चित्रपटाची पार्श्वभूमी आहे, पण गंगूबाई या पात्राची त्या वेळी खासियत होती की त्या चार हजार महिलांचा आवाज बनल्या होत्या तेही त्यांच्या हक्काकरिता.  हा भाग या चित्रपटाच्या अग्रस्थानी आहे. असे अनेक भाग समाजात आहेत जिथून अनेकांना आपल्या हक्कासाठी लढावे हे लागतेच त्यापैकी जे स्वत:च इतरांसाठी लढतात तेव्हा अशांची कहाणी काय असते? हे या चित्रपटातून समोर मांडले आहे. आम्हाला गंगूबाईंबद्दल फार काहीच माहिती नव्हते. त्या मुंबईत आल्या, मग घरवाली झाल्या, मग बडी घरवाली झाल्या, त्यानंतर अध्यक्षपद मिळवले मग करीम लालाला भेटल्या. तसेच राजकारणात प्रवेश केला आणि नेहरूंची भेट घेतली. एवढंच काय ते आम्हाला माहिती होते. पण त्या कशा इथवर पोहोचल्या याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती.त्यामुळे काही प्रसंगांत नाटय़मयता आणण्यासाठी स्वातंत्र्य घेतले आहे,’’ असे तिने सांगितले.

भन्साळींनी कल्पकता आणि संशोधन यांच्या जोरावर अप्रतिम कलाकृती तयार केली आहे, अशा शब्दांत तिने आपल्या दिग्दर्शकाची स्तुती केली. त्यांच्यासोबत प्रथमच काम करण्याचा आपला अनुभव तिने सांगितला. ‘‘मी नऊ वर्षांची असल्यापासूनच संजय लीला भन्साळींच्या बॅनरखाली काम करण्यास उत्सुक होते. त्यांचं वैशिष्टय़ं हे की ते तुमच्याकडील कौशल्याला समृद्ध करण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करतात. आता या पात्राकरता जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा मी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होते, कारण मला काहीच कल्पना नव्हती की मी हे कसं करू? त्यातून मी इतकी तरुण होते तर ही व्यक्तिरेखा मी निभावू शकेन का?, याचाही मला काहीच अंदाज नव्हता. पण त्यांच्यासोबत काम केल्यानंतर नक्कीच भीतीतून तुम्ही अधिक घडत जाता याची जाणीव झाली आणि मला घेऊन चित्रपट करायचा हा विचार सर्वस्वी भन्साळी यांचा होता. आम्ही खरंतर याआधी दुसऱ्या चित्रपटासाठी एकत्र आलो होतो, परंतु तो चित्रपट काही दुर्दैवाने होऊ शकला नाही,’’ अशी आठवण तिने सांगितली. 

दिग्दर्शकाच्या अनुभवातूनच आणि त्यांच्या दृष्टिकोनातून गंगूबाईचे पात्र आणि कामाठीपुराचा पूर्ण भाग रंगवला गेल्याचे आलिया सांगितले, ती म्हणते की, ‘‘कामाठीपुरा खूपच बदलले आहे. जरी मी प्रत्यक्ष तिथे भेट देऊन आले नसले तरी मला मध्यतंरी अनेकांनी विचारले की, तुम्ही चित्रपटाच्या निमित्ताने कामाठीपुरा भागात का नाही गेलात? तसं पाहिलं गेलं तर त्या भागात जाऊन येण्याचा प्रयत्न केला नाही पण भन्साळींना हेच वाटतं होतं की आपल्या कल्पनेने तो भाग चित्रपटात उतरवूयात. ते लहापणापासूनच कामाठीपुरा भागात राहिल्याने तिथे कशा घडामोडी होत, याची पूर्ण कल्पना त्यांना आहे. मला त्यामुळेच हे समजलं की, पन्नास वर्षे सलग गंगूबाईंचा फोटो कामाठीपुरा भागातील महिलांच्या घराबाहेर लावलेला होता, इतक्या त्या पूजल्या गेल्या, याला कारण तेच होते की ती एकमेव बाई होती जी त्या सगळय़ा वेश्यांच्या हक्कांसाठी लढली,’’ असे आलिया म्हणते.

गंगूबाईचा आवाज..

‘‘एक किशोरवयीन मुलगी ज्या आवाजात बोलेल तसं बोलण्याची घाई करू नकोस तर आवाजात दम येण्यासाठी प्रौढ महिलेप्रमाणे आवाजाची मात्रा ठेव, अशी सूचना मला भन्साळींनी दिली होती. परंतु जेव्हा दोन वेण्यातील अगदी कोवळय़ा वयातील गंगूबाई मात्र मुलगी म्हणून ज्या आवाजात बोलते तशी ती बोलणार हेही विसरू नकोस, असेही त्यांनी मला सांगितले,’’ अशी आठवण आलियाने सांगितली. ‘‘एक असेही होते की, बोलण्याप्रमाणे चालण्याची पद्धत त्यांची वयोमानानुसार वेगळी होती. त्यामुळे ‘ढोलिडा’ या गाण्याची लकब पाहिली तर मी त्यात गंगूबाईंप्रमाणेच नाचते आहे. भन्साळींनी मला खूप बारकावे समजून सांगितले. जसं नाचताना जमिनीवरच आपल्या शरीराचे वजन ठेवून नाच, कारण ऊर्जा दाखवण्याच्या नादात जोरात उडय़ा मारायला गेलीस तर ती गंगूबाई वाटणार नाही, पण जेव्हा ती गंगा म्हणून झुमेरी गोरी या गाण्यात नाच करते तेव्हा ती पूर्ण ऊर्जेने नाचते हेही तितकंच ध्यानात ठेव, असंही त्यांनी सांगितलं होतं.’’

मीनाकुमारीची गाणी आणि आईचा ‘मंडी’

‘‘भन्साळी नेहमी मीनाकुमारींचा फोटो मला दाखवायचे. त्यांच्या चेहऱ्यात तो एक आकर्षक भाव आहे. राणीछाप ही दारू पिणाऱ्या गंगूबाईंच्या त्या डोळय़ात तो भाव आणण्यासाठी असे काही आकर्षक चेहरे शोधावे लागले. तो चेहरा पडद्यावर अधिक आकर्षक वाटावा, त्यातून स्त्री व्यक्तिरेखेतील ती शक्ती, आकर्षकता आणि तीव्रता कशी चेहऱ्याद्वारे आणली जाईल यासाठी खूप प्रयत्न केला आहे. केसांमध्ये फुलं, अंगावर दागिने घालून फिरणाऱ्या त्या बाईच्या डोळय़ातील तीव्रता कशी उमटेल हे दाखवण्यासाठी मीनाकुमारी आणि वहिदा रेहमान यांची खूप गाणी मी पाहिली. त्यातून पांढरी साडी आणि गडद लाल टिकली हे रूप काहीसे लताजींच्या प्रेरणेतून रंगवण्याचा प्रयत्न केला,’’ असा किस्सा आलियाने सांगितला. ‘मंडी’ चित्रपटात ज्याप्रकारे आपली आई अभिनेत्री सोनी राजदान यांनी साकारलेली व्यक्तिरेखा दरवाजापाशी भारतीय पोशाख परिधान करून उभी राहाते तोच भाग मी या चित्रपटातून गंगूबाईचे पात्र जेव्हा वेश्याविक्रीला दरवाजात उभे राहाते तिथे जुळवण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने सांगितले.