Fahadh Faasil calls wife Nazriya Nazim Child: दाक्षिणात्य सुपरस्टार फहाद फाझिल आणि त्याची अभिनेत्री पत्नी नझरिया नझीम यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा सोशल मीडियावर सतत रंगत असतात. मात्र, या अफवांकडे दुर्लक्ष करत फहाद फाझिलने एका कार्यक्रमात पत्नी नझरियाच्या स्वभावावर भाष्य केलं आहे. फहादने नझरियाचं कौतुक केलं आणि तिला लहान मुलगी म्हटलंय. नझरियाला सांभाळल्यामुळे मला लहान मुलांना हाताळण्याचा अनुभव आलाय, असं तो म्हणाला.

मी लहान मुलीशीच लग्न केलंय – फहाद फाझिल

नुकत्याच एका कार्यक्रमात फहादने नझरियासोबतच्या नात्यावर आणि तिच्या स्वभावावर भाष्य केलं. नझरिया एखाद्या लहान मुलासारखी वागते, तिला सांभाळल्यामुळे आता लहान मुलांना हाताळण्यात मी एक्सपर्ट झालो आहे, असं फहादने म्हटलं. ‘डोंट ट्रबल द ट्रबल’ या आगामी चित्रपटाच्या तामिळनाडूतील प्रमोशनदरम्यान फहाद फाझिल म्हणाला, “मी एका लहान मुलीशीच लग्न केलं आहे.”

माझ्या घरी लहान बाळ आहे – फहाद फाझिल

पुढे फहाद म्हणाला, “लोक मला म्हणतात की माझी लहान मुलांना सांभाळण्याची कौशल्ये आणि संयम खूप चांगला आहे. यावर मी म्हणतो, ‘माझ्या घरातच एक लहान बाळ आहे, मी तिलाच सांभाळत आलोय.’ पण पहिल्यांदाच मला असं एक लहान मूल भेटलं जे मला सांभाळू शकतं.” फहादने हे वक्तव्य त्याच्या चित्रपटाची बालकलाकार साराबद्दल केलं.

तो पुढे म्हणाला, “जेव्हा जेव्हा मी माझे डायलॉग विसरायचो, तेव्हा सारा मला सांगायची, ‘सर, मला वाटतं असा डायलॉग आहे.’ तिला माझेही डायलॉग पाठ झाले होते. मी इतका संयमी सह-कलाकार कधीच पाहिला नाही. सध्या ती माझी सर्वात आवडती सह-कलाकार आहे. चित्रपट बनवताना आम्ही खूप मजा केली. आम्ही जेवढी मजा केली, त्याच्या अर्धी जरी मजा प्रेक्षकांना चित्रपट पाहताना आली तरी आमच्यासाठी खूप आहे.”

दरम्यान, फहाद व नझरियाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी २०१४ साली लग्न केलं होतं. त्यावेळी नझरिया अवघ्या २० वर्षांची तर फहाद ३२ वर्षांचा होता. नझरिया फहादपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. त्यांनी २०१४ मध्ये बँगलोर डेज व २०२० मध्ये ट्रान्स सिनेमात एकत्र काम केलं होतं.