Actor Jayam Ravi Wife Aarti Separated:‘पोन्नियिन सेल्वन १’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन २’ यासह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा प्रसिद्ध तामिळ अभिनेता जयम रवीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. ४३ वर्षांचा जयम पत्नी आरतीपासून विभक्त झाला आहे. जयम व त्याची पत्नी आरती यांचा १५ वर्षांचा संसार मोडला आहे. जयम रवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे.
अभिनेता जयम रवीने आज (९ सप्टेंबर रोजी) पोस्ट करून पत्नी आरतीपासून विभक्त होत असल्याची माहिती दिली. त्याने तामिळ आणि इंग्रजी दोन्ही भाषेत स्टेटमेंट दिले आहे. हा निर्णय काळजीपूर्वक विचार करून घेण्यात आला आहे. या कठीण काळात दोघांच्या प्रायव्हसीचा आदर केला जावा, असंही त्याने म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी, आरतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटरून जयमबरोबरचे फोटो हटवले होते, त्यामुळे हे जोडपं विभक्त झाल्याच्या चर्चा होत होत्या. या चर्चा खऱ्या निघाल्या आहेत.
जयम रवीची पोस्ट
“जड अंतःकरणाने मी तुम्हा सर्वांशी एक अत्यंत खासगी अपडेट शेअर करत आहे. खूप विचार आणि चर्चा केल्यानंतर मी आरतीबरोबरचं माझं लग्न मोडण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्ही घाईने घेतलेला नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे आणि हा निर्णयच सर्वांसाठी योग्य आहे असं वाटतंय. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आणि आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या गोपनीयतेचा आदर करा. या प्रकरणी कोणीही अफवा पसरवू नये, आरोप करू नये आणि हे प्रकरण खासगी राहू द्यावे,” अशी विनंती त्याने पोस्टमध्ये केली आहे.
दरम्यान, जयम रवी आणि आरती यांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर २००९ मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुलं आहेत. जयम रवीने आतापर्यंत ‘पेरणमाई’, ‘एम कुमारन सन ऑफ महालक्ष्मी’, ‘दीपावली’ आणि ‘थानी ओरुरवन’ यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’च्या दोन्ही भागात त्याने मुख्य भूमिका केली. तो शेवटचा ॲक्शन ड्रामा ‘सायरन’मध्ये दिसला होता. लवकरच त्याचे ‘बोर्थर’, ‘जिनी’ आणि ‘काधलिक्का नेरमिलाई’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.