‘पोन्नियिन सेल्वन’ फेम अभिनेता रवी मोहन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटाची घोषणा करणाऱ्या रवी मोहनने त्याच्या कथित गर्लफ्रेंडबरोबर एका लग्नाला हजेरी लावली. रवीने शुक्रवारी चेन्नई येथे निर्माते इशारी गणेश यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली. त्याच्याबरोबर त्याची कथित प्रेयसी, गायिका केनिशा फ्रान्सिस देखील होती. या दोघांनी सोनेरी रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केलं होतं. दोघांचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
रवी (Ravi Mohan Viral Video) व केनिशाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका क्लिपमध्ये, दोघे लग्नात एकत्र बसलेले दिसत आहेत, पाहुणे येत आहेत आणि त्यांचे स्वागत करत आहेत. रवीने धोतीसह पारंपरिक शर्ट घातला होता, तर केनिशाने भरतकाम केलेली एक सुंदर सोनेरी रंगाची साडी नेसली होती.
रवी मोहन व केनिशाचा व्हिडीओ व्हायरल
रवी मोहन व केनिशा फ्रान्सिस यांनी अद्याप त्यांच्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिलेली नाही. पण आता ट्विनिंग करत लग्नाला हजेरी लावल्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांचे अंदाज खरे होते, असं नेटकरी म्हणत आहेत. “अरे देवा, त्या अफवा खऱ्या होत्या का?? रवी केनिशा फ्रान्सिससोबत,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर लोकांचा या दोघांबद्दलचा अंदाज खरा ठरला, असं एका युजरने म्हटलंय.
रवी मोहनबद्दल काय म्हणाली होती केनिशा?
दरम्यान, केनिशाने डीटी नेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत रवीबरोबरच्या अफेअरच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. आरती आणि तिच्या कुटुंबाने रवी मोहनला त्रास दिल्याचा आरोप केनिशाने केला होता. “आमच्यात कोणतेही संबंध नाही. आम्हाला आमच्या मर्यादा माहीत आहे. मी सेल्फ-मेड आहे. माझे आई-वडील आता हयात नाहीत,” असं केनिशा म्हणाली होती.
रवी मोहनने केलेली घटस्फोटाची घोषणा
“जड अंतःकरणाने मी तुम्हा सर्वांशी एक अत्यंत खासगी अपडेट शेअर करत आहे. खूप विचार आणि चर्चा केल्यानंतर मी आरतीबरोबरचं माझं लग्न मोडण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्ही घाईने घेतलेला नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे आणि हा निर्णयच सर्वांसाठी योग्य आहे असं वाटतंय. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आणि आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या गोपनीयतेचा आदर करा. या प्रकरणी कोणीही अफवा पसरवू नये, आरोप करू नये आणि हे प्रकरण खासगी राहू द्यावे,” अशी पोस्ट रवीने केली होती.
रवीने नोव्हेंबरमध्ये चेन्नई फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. रवी आणि आरती यांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर १५ वर्षांपूर्वी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुलं आहेत. रवीने आतापर्यंत ‘पेरणमाई’, ‘एम कुमारन सन ऑफ महालक्ष्मी’, ‘दीपावली’ आणि ‘थानी ओरुरवन’ यासह अनेक हिट चित्रपट केले आहेत. मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’च्या दोन्ही भागात त्याने मुख्य भूमिका साकारली होती.