Ravi Valecha childhood Abuse Story: ‘अमर अकबर अँथनी’, ‘कुली’ आणि ‘फकिरा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा प्रसिद्ध बालकलाकार रवी वलेचा याने स्वतःवर झालेल्या लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अवघ्या ८ वर्षांच्या वयापासून डबिंगच्या अंधाऱ्या खोलीत, कारमध्ये आणि आऊटडोअर शूटिंगदरम्यान सेक्रेटरी व इंडस्ट्रीतील वरिष्ठ व्यक्तींकडून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. तब्बल ३०० हून अधिक चित्रपटांचा जागतिक विक्रम नावावर असलेल्या या बालकलाकाराने भीतीपोटी वर्षानुवर्षे हे सत्य लपवून ठेवले होते. थेरपी घेतल्यानंतर त्याने या भयानक अनुभवावर मौन सोडले आहे.

रवी वलेचाने फिल्म इंडस्ट्रीला रामराम करून कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर केलं. आता तो एका यशस्वी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस बिझनेसचा संचालक आहे. रवी वलेचावर अवघ्या ८ वर्षांच्या वयापासून लैंगिक अत्याचार झाले. डबिंगच्या अंधाऱ्या खोलीत एकाने गैरवर्तन केलं होतं, तसेच सेक्रेटरीने कारमध्ये आणि आऊटडोअर शूटिंगदरम्यान चुकीचे स्पर्श केले होते. पण सांगितल्यावर आई-वडील विश्वास ठेवणार नाहीत किंवा सांगितल्यास वाद होतील या भीतीने, तसेच त्या काळी याबाबत फार बोललं जायचं नाही त्यामुळे तो गप्प राहिला.

रवी वलेचाने सांगितला पहिला प्रसंग

रवीने वयाच्या चौथ्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली होती. विविध भाषांमध्ये बालकलाकार म्हणून सर्वाधिक तब्बल ३०० चित्रपट त्याने केले. रवी अत्याचारांबद्दल म्हणाला, “चित्रपटसृष्टीत माझ्यासोबत असा प्रकार तीन वेळा घडला.” लैंगिक शोषणाच्या प्रत्येक प्रसंगाने आधीच्या जखमा आणखी वाढल्या. एक प्रसंग डबिंगच्या अंधाऱ्या खोलीत घडला. त्या खोलीत इंडस्ट्रीतील एका ज्येष्ठ व्यक्तीने आपल्याला मांडीवर बसायला सांगितलं होतं, असं रवी म्हणाला.

दुसरा प्रसंग दररोज शूटिंगसाठी सोबत जाणाऱ्या एका तरुण सेक्रेटरीशी संबंधित होता. “मी हे कोणालाही सांगू शकत नव्हतो… पण तरीही मला रोज त्या व्यक्तीसोबतच जावं लागायचं,” अशी आठवण त्याने सांगितली. एका आऊटडोअर शूटिंगच्या वेळी, त्याचे आई-वडील सोबत नसताना त्याला सेक्रेटरीबरोबर एकाच खोलीत राहावं लागलं. रवीचं वय त्यावेळी ११-१२ वर्षे होतं. त्याला रात्री कोणीतरी आपल्या अंगावर असल्याचं जाणवलं, पण तो शातं पडून राहिला. “मी आता काय करू?” असा विचार त्या वेळी मनात आला, असं त्याने सांगितलं.

रवी याबद्दल कोणीशीही बोलू शकला नाही. मनात सतत भीती असायची की घरी सांगितल्यावर ते विश्वास ठेवतील का? उलट आपल्यालाच दोष देतील किंवा हे सत्य बाहेर आल्यास परिस्थिती आणखी बिघडेल, असं त्याने सांगितलं. त्या काळी इंटरनेट नव्हतं. त्यामुळे गप्प राहणं हाच एकमेव सुरक्षित पर्याय वाटत होता असं त्याने नमूद केलं.

या घटनांचा वैयक्तिक आयुष्यावर झाला परिणाम

या मानसिक त्रासाचा परिणाम रोजच्या वागण्यात, वैवाहिक आयुष्यातही जाणवू लागला, असं रवीने नमूद केलं. “मनात ठेवलेल्या त्रासाचा परिणाम म्हणून मी रागीट स्वभावाचा झालो,” असं त्याने मान्य केलं. या सर्व गोष्टी घडून गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी दीड वर्षापूर्वी त्याने थेरपी घेण्यास सुरुवात केली. थेरपीदरम्यान सुरुवातीचे तीन ते चार आठवडे एक शब्दही बोलू शकलो नाही, असं रवी वलेचाने सांगितलं. हळूहळू, जवळपास एका महिन्यानंतर तो समुपदेशकाशी याबद्दल बोलला. “हे माझ्या मनात किती खोलवर रुजलंय, त्याची जाणीव मलाही नव्हतं. सगळं मी मनात ठेवलं होतं. पण सहा महिन्यांच्या थेरपीने सर्व गोष्टी बदलल्या. आज माझं मन खूप हलकं झालंय. आता मला याबद्दल कोणाशीही बोलताना अजिबात संकोच वाटत नाही,” असं रवी वलेचाने सांगितलं.

काही जुन्या आठवणींचे परिणाम अजूनही रवी वलेचावर आहेत. डबिंगच्या अंधाऱ्या खोलीतील वाईट आठवणींमुळे तो आजही एकटा सिनेमा पाहायला जात नाही. तो म्हणाला, “आजही मला राग आला, तर मी घरच्यांना सांगतो की माझ्याशी बोलू नका, मला शांत होण्यासाठी अर्धा तास द्या. मी १२ किंवा १३ वर्षांचा असतानाच थेरपी घ्यायला हवी होती.”

स्वतःच्या अनुभवातून सावरल्यावर रवीला पुरुषांसाठी आणि मुलांसाठी एक अशी जागा तयार करायची आहे, जिथे ते कोणत्याही भीतीशिवाय किंवा लाजेशिवाय लैंगिक शोषणाबद्दल बोलू शकतील. ही समस्या फक्त चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित नसून कॉर्पोरेट क्षेत्रासह इतर ठिकाणीही मोठ्या आहे, असं त्याला वाटतं.